फोर्थ इंजिनियर , थर्ड मेट, कॅप्टन, स्टीवर्ड, मोटरमन , एक ए बी आणि मी पकडून असे एकूण सात जण मनौस शहरात सकाळी दहा वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास परत आलो होतो. सकाळी जहाजावरुन जाताना छोट्या स्पीड बोट मध्ये पायलट लॅडर ने सगळे एका मागोमाग उतरले. पायलट लॅडर म्हणजे दोन दोरांच्या मध्ये लाकडाच्या तीन इंची फळ्या लावून केलेली एकप्रकारची शिडी असते जीचा वापर करून झाल्यावर ती वर जहाजावर ओढून गुंडाळून ठेवता येते.
मनौस शहर हे अमेझॉन आणि रिओ निग्रो या दोन नद्यांचा संगम आहे तिथे वसले आहे. जहाज मनौस शहरात आले की रिओ निग्रो या नदीच्या पात्रात नांगर टाकून उभे केले जाते. पाण्याचा रंग डार्क ब्राऊन किंवा जवळपास काळाच असल्याने तिला रिओ निग्रो असे बोलले जाते. छोट्या स्पीड मध्ये बसून रिओ निग्रो चे पात्र ओलांडून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लहानशा धक्क्यावर जायला साधारण वीस एक मिनीटे लागतात. तिथे उतरल्यावर जो तो एकटा किंवा दोन तीन जणांच्या ग्रुप मध्ये जाऊन शहरात फिरून खरेदी वगैरे करत असे. शहर तसे फार मोठे नव्हते परंतु एक मोठा मॉल आणि बाजारपेठा यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील गावातले लोकांनी नेहमी गजबजलेले असायचे. रस्त्यावर बिफ, पोर्क आणि चिकन चे बार्बेक्यू मांडलेले असायचे त्यातून निघणारा धूर आणि वासामुळे आपण महमद अली रोडवर असल्याचा भास व्हायचा. ब्राझीलच्या लोकांचे खाणे, पिणे, गाणे आणि नाचणे याशिवाय आयुष्यात काही नाही याचा प्रत्यय शहरात संध्याकाळी पाच नंतर यायला लागायचा. मोठ मोठे रेस्टॉरंट आणि रस्त्यावरील छोट्या स्टॉल वर तीन चार कलाकार मिळून एखाद्या बँड सारखे गाणी बोलत असलेले दिसायचे मग त्यांच्या समोर जवळपास सगळ्याच पिढ्यातले स्त्री आणि पुरुष बियर चे घोट घेत रंगून गेलेले दिसत.
संध्याकाळी सहा वाजता पुन्हा जहाजावर परतायचे असल्याने सगळे जण धक्क्यावर साडे पाच वाजता जमा झाले. थर्ड मेट केरळ मधील एका छोट्या खेड्यातून आला होता. माझ्याच वयाचा असल्याने त्याचे माझ्याशी चांगले पटायचे इतर सगळे अधिकारी त्याला मल्लू मल्लू करायचे पण मी ज्युनियर असल्याने त्याला तीन साब बोलायचो. तो तसा कोणाला त्रास वगैरे देत नव्हता पण खूप कमी बोलायचा कदाचित केरळी लोकांची बोलण्याचा टोन मुळे त्याला कोणी हसू नये म्हणून पण असावे. कॅप्टन आणि ए बी एकत्र गेले होते ते पण आले बोट येऊन थांबली होती पण फोर्थ इंजिनियर म्हणजे आमच्या इंजिन डिपार्टमेंट चा चार साब आला नव्हता पण फक्त पाचच मिनिटांत तो धक्क्या कडे घाई घाईत येताना दिसल्यावर सगळे जण बोट मध्ये बसायला लागले. बोट जहाजाच्या जवळ आल्यावर सगळ्यांच्या हातात असलेल्या पिशव्या एकत्र करून क्रेनला असलेल्या बास्केट मध्ये टाकून जहाजावर उचलल्या गेल्या. मग एक एक करून सगळे जण शिडी वरून वर चढायला लागले. त्या शिडीवरून खाली उतरताना काही वाटत नाही पण वर जवळपास पंचवीस फूट चढताना त्रास पण आणि पडण्याची भीती सुद्धा वाटत असते. सगळे जण एका मागोमाग एक चढले. सगळ्यात शेवटी तीन साब ने शिडी पकडली आणि चढू लागला तसा बोट वाला मागे फिरून वेगाने जाऊ लागला. आम्ही आत जात असताना शिडी जवळ जोरात आवाज आला आणि मल्लू पाण्यात पडला अशी आरोळी ऐकायला मिळाली. चार पाच पायऱ्या चढल्यावर तीन साब चा हात निसटून तो पाण्यात पडला होता. त्याला पोहता येत होते पण रिओ निग्रो चे पाणी वाहते होते आणि प्रवाहाचा वेग सुद्धा जास्त होता. जहाजावरील ड्युटी एबी ने प्रसंगावधान राखून शिडी पाण्याच्या लेव्हल पर्यंत क्षणाचाही वेळ न घालवता खाली सोडली. तीन साब ने शिडी दोन्ही हातानी पकडून ठेवली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता पण अचानक तीन साब मोठ्याने किंचाळला. सूर्य मावळतीला आला होता आणि अंधार दाटायाला सुरुवात झाली होती. तीन साब च्या किंचाळण्याने सगळे जण चक्रावले. शिडी पकडून शांतपणे काही सेकंद स्थिरावलेला तीन साब एकदम हात पाय झाडायला लागला होता आणि जोर जोराने किंचाळत होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरभर वेदना दिसायला लागल्या होत्या. ड्युटी ए बी ने लगेच एक दोरी बांधलेला लाईफ बॉया त्याच्याकडे फेकून दिला. मल्लू लाईफ बॉया के अंदर से सिर और दोनो हात निकाल दो म्हणून कॅप्टन त्याच्या दिशेने ओरडला. तीन साब जोर जोरात हात पाय हलवत होता तरीसुद्धा त्याने त्या अवस्थेत गोल लाईफ बॉया पकडला आणि त्यातून डोके आणि हात बाहेर काढले. एव्हाना जहाजावरील सगळे अधिकारी आणि खलाशी येऊन पोचले होते. कॅप्टन स्वतः लाईफ बॉयाला बांधलेली दोरी ए बी च्या मदतीने ओढू लागला. त्याला मदत करायला अजुन दोघे जण गेले. हळू हळू तीन साब चे शरीर पाण्या बाहेर येवू लागले वेदनेने विव्हळत त्याचे किंचाळणे सुरूच होते. जसं जसं त्याची बॉडी बाहेर येऊ लागली तस तस त्याच्या शरीरातून खाली पाण्यात रक्ताचे थेंब पडत असल्यासारखे दिसू लागले. नदीच्या काळया पाण्यात तर रक्त मिसळल्याचे समजून सुद्धा येत नव्हते. अवघ्या काही मिनिटांत हे काय घडते आहे आणि ते बघताना सगळ्यांचाच थरकाप उडत होता. तेवढ्यात ब्रीज वरून कॅडेट ने सर्च लाईट चा प्रकाश झोत तीन साबला वर खेचून घेतले जात होते तिकडे फिरवला. तीन साब च्या कमरेखालील भागातून शरीराचे मांस लटकत असल्याचा भास झाल्यासारखे वाटले. जसं जसे त्याचे शरीर पूर्ण पणे पाण्याबाहेर येऊ लागले तसं तसे जहाजावर असलेला प्रत्येक जण भीतीने ओरडायला लागला, अरे देवा हे काय झाले. तीन साब वेदनेने आणि किंचाळून तडफडून तडफडून शांत झाला होता. त्याच्या दोन्ही पायाची फक्त हाडे शिल्लक असल्याचे दिसत होते. खाली पाण्यामध्ये हाताच्या पंजा एवढे असंख्य माणसाचे मांस खाणारे पिरान्हा मासे वर जाणाऱ्या बॉडीच्या मांसाचे लचके तोडण्यासाठी तोंडातील तीक्ष्ण दात काढून पाण्या बाहेर उड्या मारत होते. हे भयानक दृष्य बघून सगळे स्तब्ध झाले. कॅप्टन ने आणखी काही सेकंदात जिवाच्या आकांताने जोर लावून तीन साब ला लाईफ बॉया सकट वर ओढून घेतले. लाईफ बॉया मध्ये आता फक्त तीन साब चे डोके आणि दोन्ही हात पूर्ण अवस्थेत होते. छाती खालचा भाग टोचे मारल्या प्रमाणे आणि कमरेखाली लचके तोडल्या सारखा दिसत होता. तर दोन्ही पायाची फक्त रक्ताळलेली लाल हाडे तेवढी दिसत होती. जहाजावर खचलेले त्याचे निष्प्राण आणि कुरतडलेले शरीर पाहिले आणि मल्लु तेरे घरवालो को क्या बताऊ अशी मोठ्याने बोंब ठोकली.
त्याची बोंब ऐकून की काय कोण जाणे पण मला त्या क्षणी त्या भयानक स्वप्नातून जाग आली. संपूर्ण अंगाला कंप सुटला आहे असे वाटायला लागले होते आणि नेमके तेवढ्यात फोन ची रिंग वाजली. पलीकडून चीफ इंजिनिअर किनाऱ्यावर जायचे आहे ना असे विचारत होता.
सकाळी चार ते आठ वॉच करून संडे असल्याने नऊ ते बारा या वेळेत सुट्टी मिळाली होती त्या सुट्टीत स्मोक रूम मध्ये पिरान्हा नावाचा हॉलिवुड मधील मनुष्य भक्षी माशांचा पिक्चर बघितला होता. पिक्चर संपल्यावर नेहमी प्रमाणे संडे ची बिर्याणी खाऊन झोप लागली होती. झोपेत पडलेले ते भयानक स्वप्न आठवले की आज सुद्धा दहा वर्षा पूर्वी ब्राझीलच्या अमेझॉन नदीचे सौंदर्य तिची विशालता तिच्या खोऱ्यातील मनमोहक सृष्टी आणि तिच्याशी निगडित असलेल्या रिओ निग्रो आणि त्यांच्या कथा व दंत कथा आठवल्या शिवाय राहत नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply