“सगळ्यांचे लाडके “ऋषी कपूर” यांचा आज प्रथम स्मृतिदिन !! गेल्यावर्षी त्यांना “”आगळी वेगळी आदरांजली”” देण्याचा एक प्रयत्न केला होता… तो आज पुन्हा पोस्ट करतोय !! वयाचं “६८ वं वर्ष”” सुरू असताना आपल्याला सोडून गेलेल्या या चिरतरुण अभिनेत्याला त्यांच्याच “चित्रपटांची ६८ नावं” वापरून माझ्याकडून ही शब्दपुष्प आदरांजली.
“” ऋषी कपूर “” एक “ झिंदा दिल “ व्यक्तिमत्व दोन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आलेला त्यावेळच्या सगळ्या “कपूर अँड सन्स” मधला एक “अनमोल” असा हिरा नावापुढे कपूर “घराना” असलं आणि गाठीशी पिढीजात “धन दौलत” असली तरीही त्यावेळेस फिल्म इंडस्ट्रीत अनेक प्रस्थापित “गुरुदेव” मंडळी होती , त्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करणं , “घर कि इज्जत“ राखणं आणि स्पर्धेत टिकून रहाणं हा मार्ग खरोखर “अग्निपथ” होता … पण तरी देखील हे आव्हान स्वीकारून “चला मुरारी हिरो बनने” म्हणत आपलं “नसीब” आजमावायला ऋषीजी निघाले … या झगमगत्या फिल्मी “मुल्क“ मधला चमकता सितारा कुणी “दुसरा आदमी” असला तरी मलाही “जमाने को दिखाना है” हा ध्यास त्यांनी घेतला . या प्रवासात आणि या स्पर्धेत लढण्यासाठी त्यांच्याकडे महत्वाचं “हथियार” होतं ते म्हणजे नसानसात भरलेलं अभिनयाचं “बारूद”.. त्याला अर्थातच जोड होती ती म्हणजे सदैव पाठीशी असणारा त्यांचा “घर परिवार” आणि “मेरा नाम जोकर” म्हणत सगळ्यांना कायम हसत ठेवण्याचा आणि स्वतःही नेहमी हसतमुख राहण्याचा त्यांचा मनमोकळा स्वभाव. या सगळ्याच्या जोरावर आणि अपार मेहनतीनी त्यांनी या इंडस्ट्रीला त्यांची दखल घ्यायला लावली आणि “अनजाने मे” दर्दी रसिक प्रेक्षक सुद्धा म्हणू लागले “कुछ तो है” इस बंदे मे . अगदी “खेल खेल मे” त्यांनी या स्पर्धेत “विजय” मिळवला आणि “दुनिया मेरी जेब मे” अशा थाटात भल्याभल्यांना “रफू चक्कर” करत सिद्ध केलं , की या सगळ्या मांदियाळीत सुद्धा “हम किसीसे कम नही”. तगडी कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही हे यश कष्टानी कमावलेलं होतं … उगाच काहीतरी “ईना मीना डिका” करत “लक बाय चान्स” मिळालेलं नक्कीच नव्हतं .
तत्कालीन प्रेक्षक वर्गाला एका चॉकलेट हिरोची “खोज” होतीच . “ये ईश्क नही आसान“ असं वाटणाऱ्या मंडळीना तर त्यांनी चक्क “प्रेम रोग” दिला आणि त्यांच्या चाहत्यांचा एक “नया दौर” सुरु झाला . आता मात्र ही जनता “आप के दिवाने” झाले नसते तरच नवल !!! “अमीरी गरिबी” बाजूला सारत तेव्हाचे युवक आपल्या प्रेमाला “सलाम मेमसाब” म्हणत अक्षरशः “प्रेम ग्रंथ “ लिहू लागले . खरंच तुमचा “ये है जलवा”!! … लोकांना प्रेम करायला लावता लावता तुम्हालाही “प्यार के काबिल” कोणीतरी सापडावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती आणि तसंच घडलं. “अमर अकबर अँथनी” मधल्या अँथनीलॉजिक प्रमाणेच ज्यांना बघून त्यांच्या मनातही एक “सरगम” वाजू लागली त्या नीतूजींबरोबर बरोबर त्यांचा ही “प्रेम योग” जुळून आला … सारी “दुनिया” आता उत्सुक होती ती या “लैला मजनू” च्या जोडीला बघण्यासाठी . “श्रीमान आशिक” तर तयार होतेच. कोणाचीही असली तरी शेवटी “घर घर की कहानी” सगळ्यांची सारखीच . अखेर हे “दो प्रेमी” एकत्र आले , लग्न बंधनात अडकले , “हम दोनो” झाले आणि नीतुजी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील “बॉबी” बनल्या पुढे परिवारात रिद्धिमा आणि रणवीर या दोन कपूरांच्या प्रवेशानी “दो दुनी चार” झाले आणि जोडप्याने काळानुरूप “बदलते रिश्ते” देखील अनुभवले . मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या . वडिलांच्या निधनानंतर अर्धवट राहिलेला “हीना” पूर्ण करण्याचं आव्हान त्यांनी लीलया पेललं तर कधी सगळं काही “All is well” असताना आणि हा सगळा “कारोबार “ सांभाळताना बदलत्या व्यावसायिक गणितांचा आढावा घेत ; भविष्यातील “कर्ज” वाढू नये म्हणून त्याच वडिलांनी उभा केलेला स्टुडीओ काळजावर दगड ठेवून त्यांना विकावा लागला … कदाचित त्यांना वाटत असेल की आपल्या हयातीतच याची वासलात लागावी कारण “कल किसने देखा.” बहुधा त्या स्टुडीओच्या नशिबातही तेच लिहीलं असेल ..म्हणतात ना ..“नसीब अपना अपना” … पण या सगळ्यात त्यांचा परिवार सुद्धा इतका “बडे दिलवाला “ की एकमेकांच्या नात्यात कधी “दरार” येऊ दिली नाही. “रिश्ता हो तो ऐसा”
अशा “कुछ खट्टी कुछ मिठी” आठवणींतूनच दशकं लोटली . आधीच्या पिढीला “दिवाना” बनवणाऱ्या या वल्लीने सध्याच्या तरुणाईच्या बदललेल्या “लव आज कल” च्या ट्रेंड मध्येही ; कधी मार्मिक उपदेश करत तर “कभी कभी” हसत खेळत “ बेवकुफीया” करत आजच्या पिढीतल्या तरुण युगुलांना सुद्धा “शुद्ध देसी रोमान्स” करायला शिकवलं. दोन पिढ्यांना आपलसं करणारा हा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतला एक “अजूबा”…
आज तुम्ही आम्हाला सोडून गेला असलात तरी समस्त चाहत्यांतर्फे तुम्हाला “ये वादा रहा” की तुमच्यावरचा प्रेमाचा “सागर” कधीही ओहोटीला लागणार नाही . अगदी हिंदी सिनेमाच्याच भाषेत सांगायचं तर तुमच्या नावाची एक “चांदनी” एव्हाना आकाशात अस्तित्वात आली असेल. पण आम्हा रसिकांच्या मनात मात्र तुम्ही नेहमीच चिरतरुण रहाणार … कायम “102 Not Out” !!!!
©️ क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply