“दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी वाचित जावे” ह्या समर्थ रामदासांच्या उक्तीचा आज अर्थ वर्गात सांगितला गेला काय आणि अचानक माझ्यातला लेखक आणि वाचक लगेच जागृत झाला. मराठीचा शेवटचा तास दररोज मला घरची वाट दाखवत असतो कधी एकदा त्या बर्वे सरांच दाराबाहेर पाऊल पडतंय आणि आम्ही सुटतोय अस होत.अर्थात सरांनी कितीही चांगलं शिकवलं तरी शेवटचा तास हा बाहेरच्याच विचारात दंग असायचा पण, आज मात्र माझं मन ह्यामध्ये कधी गुंतल ते समजलंच नाही आणि मग आधी लेखन? की आधी वाचन ? हा प्रश्न डोक्यात घोळू लागला.मग जर आधी लेखन म्हटलं तर काय काय लिहावे म्हणजे एखादी लघु कथा लिहावी?,लघु लेख लिहावा?, की डायरेक्ट एखादी कादंबरीच लिहून पूर्ण करावी? किंवा मग एखादी पाडगावर, खेबुडकर ह्यांच्यासारखी नावलौकिक वाली कविताच करावी का?पणं जर लेखन करायच फायनल झालंच तर मग वाचनाचं काय? ते तर बाजूलाच राहील ना?मग आधी वाचन ठरवलं तर मग एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी… की डायरेक्ट एखादी युगंधर,
मृत्युंजय सारखी कादंबरी च वाचून काढावी ?ह्या चिंतनात घरची रोजची वाट कधी संपली ते कळलंच नाही.घरी हातपाय,तोंड धुवून आई ने गरमागरम चहाचा कप हातात दिला खरा पण डोक्यातील वाचनाचा आणि लेखनाचा किडा डोकं पोखरायच काही केल्या सोडे ना.जगातील वेगवेगळ्या साहित्यिकांच अफाट साहित्य कधी वाचून पूर्ण करायचं आणि पुन्हा आपलं लेखन केव्हा सुरू करायच ह्या विचारात हातातला चहा एव्हाना पूर्णपणे थंड झाला होता.
नेहमी शाळेतून आल्यावर खेळायला धावणाऱ्या पावलांना कोणीतरी बांधून ठेवावं आणि अभ्यासाच्या खोलीत बंदिस्त करावं त्याप्रमाणे काहीस झालं होतं. ह्यापूर्वी सातवीची स्कॉलरशिप वगळता अस कधी झाल्याचं मला आठवत नाही.म्हणजे अधूनमधून मस्ती केल्यावर आई किंवा बाबा कोंडून ठेवायचे तो भाग निराळा पण मी माझं माझं अस करण्याची ही दुसरी च वेळ होती.डोक्यात सारखा एकच विचार आधी वाचन की आधी लेखन? बर रोज लिहायचं झालं तरी काय लिहावं? आणि वाचायचंच झालं तरी काय वाचावं? कारण टीव्ही मध्ये दाखवतात त्याप्रमाणे काही आमच्या कुटुंबात पुस्तकांचा ढीग नव्हता? शाळेची पुस्तके,लोकमत चा पेपर ह्याखेरीज वाचण्यासारखं ही काहीही नव्हत.म्हणून मग आधी लेखन करावं ह्या दृष्टीने एक कोरी वही त्यावर वरती मस्तपैकी “माझं लेखन” अस मोठ्या अक्षरात पेपर च नाव लिहितात त्या प्रमाणे लिहिलं खर पण खाली हेडलाईन आणि त्याची सविस्तर बातमी लिहायला कोणता विषय घ्यावा ह्या विचारात जवळजवळ रात्रीच्या जेवणाची हाक कानावर येऊन पडली. बराच वेळ एकदा उजव्या हातात,डाव्या हातात,तोंडात अशारितीने पेनाच्या जागा बदलत राहिल्या पण विषय मात्र काही सुचला नाही.एव्हाना हाकेचा स्वर मंद्र सप्तकातून एकदम तार सप्तकात लागलेला पाहून वही-पेन मिटून मी जेवायला गेलो.आज जेवणात सुद्धा तितकस लक्ष नव्हतं भाजी ऐवजी लोणचंच जास्त ताटात पडे आणि शेवट तर दह्यात साखरे ऐवजी मीठ पडलं आणि अखेर माझं काहीतरी बिनसल्याच घरात समजलं पण मी तत्क्षणी तिथून माझ्या रूम मध्ये जाण्यासाठी काढता पाय घेतला आणि विषयाला मझ्याबाजूने पूर्णविराम दिला.अखेर लिखाणातल काही न जमल्यामुळे माझं संपूर्ण कपाट उघडून एखाद पुस्तक वाचायला मिळत का ते पाहायला सुरुवात केली.माझ्या गेल्या वाढदिवसाला माझ्या पुस्तक प्रिय एका मित्राने मला गिफ्ट म्हणून कसलतरी पुस्तक दिल्याचं माझ्या स्मरणात आलं पण मी ते कुठे टाकलं हे शोधण्यात पुढचा एक ते दीड तास खर्ची पडला.जेवताना झालेल्या प्रकारामुळे चिंतेत असणारी आई हळूच माझ्या रूम मध्ये डोकावून गेली.पण त्या वेळी हातातलं पुस्तक वाचताना पाहून तिची चिंता मिटल्याच माझ्या ध्यानात आलं.आणि कोणत्याही प्रकारचा संवाद न होता आम्ही दोघे आपापल्या कामात व्यस्त झालो.इतक्या वर्षात प्रथमच इतक्या कुतूहलाने मी पुस्तक वाचायला सुरुवात केली खरी पण त्या कामातून अखेर सकाळी आठ वाजता आईने हाक मारल्यावर च मी मोकळा झालो.थोडक्यात हे ही काम मला नीट जमलेलं नव्हतं त्यामुळे आपल्याला दोन्ही पैकी काहीच न जमल्याच दुःख उराशी कवटाळून मी शाळेत गेलो.झालेला सारा प्रकार बर्वे सरांच्या कानावर घेतला आणि सर मात्र जोरजोराने हसू लागले.मला काहीही कळेना,एकतर कधी नव्हे तो मी ह्या तासाच्या आणि बर्वे सरांच्या बाबतीत सिरीयस झालो आणि सर अस वागतात ह्यामुळे मला सरांचा जरा रागच आला.
“अरे खरे असा कसा रे तू?”सरांनी विचारलं
काय झालं सर काही चुकल का? मी विचारलं
अरे तू ह्या ओळीचा अगदी अगदी जसाच्या तसा अर्थ “काढलास आणि म्हणून तुला हा त्रास सहन करावा लागला” सर म्हणाले
म्हणजे मी म्हणालो
“अरे वेड्या दिसामाजी काहीतरी लिहावे,प्रसंगी वाचीत जावे किंवा वाचाल तर वाचाल ह्याचा सरळ अर्थ इतकाच की रोज काहीबाही तुमच्या हातून चांगल लिहिलं जावं मग ते कोणत्या विषयावर आहे, किती मोठं आहे हे महत्वाचं नाही तुम्हाला जे सुचेल ते लिहावं पण जर चांगलं तुमच्या हातून लिहल जावं अस जर तुम्हला वाटत असेल तर प्रथम चांगलं काहीतरी वाचायला हवं तरच तुमच्या लिखाणाला एक प्रकारची दिशा मिळेल..आता कळलं का? सरांनी विचारलं
“पण मग नक्की काय वाचू आणि कशा रीतीने लिहू”?मी विचारलं
तू रोज एक पान तुला आवडेल त्या पुस्तकाचं वाचून काढ,किंवा पेपरातील एखादा लेख ज्यामुळे आपसूकच तुझं वाचन होईल आणि लिखाणाच म्हंटल च तर तू रोजनिशी लिहायला सुरुवात कर..
रोजनिशी म्हणजे ?
रोजनिशी म्हणजे रोज उठल्या पासून झोपेपर्यंत तू काय काय केलस ह्याची नोंद रोज रात्री करायची ह्यामुळे आपला दिवस कसा गेला आणि ह्या पुढचा दिवस कसा गेला पाहिजे ह्याच एक नियोजन ही तुझ्या हातून घडेल आणि नित्य लिखाण सुद्धा होईल.
अखेर काल संध्याकाळ पासून चालू असलेल्या माझ्या मनातील विचारांच्या थैमानाला सरांच्या एका सुचनेने योग्य दिशा मिळाली म्हणून च तर आयुष्यात गुरूंचे स्थान महत्वाचं मानलं जातं हे निःसंशय आहे ह्याची खात्री पटली आणि उर्वरीत तासांना हसतमुखाने मी वर्गात गेलो…
— ©® तेजस खरे
Leave a Reply