नवीन लेखन...

सामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो?

२९ तारीख हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करावा अशी विद्यापीठे कॉलेजेस आणि शाळांना सांगण्यात आले आणि त्याला काहीनी विरोध केला. सरकारचे म्हणणे होते की अशा प्रकारचा दिवस साजरा करून आपण देशांमध्ये देशभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.

देशभक्ती म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत.

स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?

देशाला स्वातंत्र्य मिळूनही ७० वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत.याची कारणे अनेक आहेत. आपण साधे देशातले नियम पाळू शकत नाही. नियम मोडणे हेच आपल्याला स्वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांची तुलना करता, त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो. पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात, ते नियम मोडणार्याला, मग तो पुढारी असो वा  सेलिब्रिटी त्याला शिक्षा होते, ते न चुकता कर भरतात, सार्वजनिक ठिकाणी थुंकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो. येथे शांतता राखा, असे लिहिले असेल तिथे हमखास कलकलाट असतो, `येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या पाटीवरच लाल पिचकार्यांची रांगोळी असते, `नो पार्किंग’ची पाटी असते, तिथेच गाडय़ा आडव्या तिडव्या लावलेल्या असतात. `कृपया रांगेची शिस्त पाळा’ असे लिहिलेल्या ठिकाणीच झुंबड असते. येथे स्वच्छता राखा असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर असतो. एक ना अनेक, म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा असते.

या सगळ्यात आजची तरुणाई काही वेगळा विचार करते आहे का? देशावर त्यांचे प्रेम आहे पण ते फक्त स्वातंत्र्य दिन किंवा २६ जानेवारीलाच उफाळून येते. एरव्ही मी, माझे करिअर, माझी नोकरी, माझी प्रेयसी यातच ही तरुणाई बुडालेली असते. म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, की मी या देशासाठी काय करतो?

जबाबदार नागरिक 

भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बर्‍याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना सपशेल विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, पण कचरा सर्रास रस्त्यावर, स्टेशनवर आपण टाकतो. पान खाऊन चहूकडे थुंकणे तर काहींचा जणू छंदच… आपण इतके बेजबाबदार आहोत की काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढण्याचा प्रयत्न करतो. राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही, पण तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रुप आलेले दिसते.  ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम लोकांनी अक्षरश: पायदळी तुडवला. वाहतुकीचे नियमजितके आपल्याकडे मोडले जात असतील, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे या गोष्टी अगदी छातीटोकपणे आपल्याकडे केल्या जातात. नियममोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर. शिकून माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे नियमपाळण्यासाठी गरज कडक कायद्याची नाही, तर गरज आहे सद्सद्विवेकबुद्धीची, गरज आहे, पालकांनी नियमपाळण्याची आणि मुलांवर उत्तमनागरी संस्कार करण्याची.

पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे

सामान्य माणसांनीही पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे.कायदा-सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसांना उद्दिष्टपूर्ती करता येणे शक्य नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी आणि नागरिकांना येणार्या अडचणींवर मात केली जावी. अनेकदा पोलिस कारवाई करून प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करून कायदा-सुव्यवस्था स्थिती राखली जाऊ शकते.स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.

राज्यात वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. शहरांमधील रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम केली जावी. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोर करावे यासाठी वाहतूक पोलिसांची मजबूत फळी तयार करावी. वाहतूक नियम तोडणार्या नागरिकांना शिक्षा द्यावी.

आपापलं काम व्यवस्थित करणं हीच देशभक्ती

रस्त्यावरील सिग्नल पाळणं ही देशभक्ती आहे, रस्त्यावर न थुंकणं ही देशभक्ती आहे, स्त्रियांचा आदर करणं ही देशभक्ती आहे, दिलेला शब्द पाळणं ही देशभक्ती आहे, दिलेली वेळ पाळणं ही देशभक्ती आहे, भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं ही देशभक्ती आहे, लाच न देणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे, आपल्याआधी लोकांचा विचार, ही देशभक्ती आहे, रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत न नाचणं ही देशभक्ती आहे, चूक मान्य करणं ही देशभक्ती आहे, जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे, मतदान करणं ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, ही देशभक्ती आहे, वाद न घालता काम करणं ही देशभक्ती आहे, जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन न करणं ही देशभक्ती आहे, इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणं ही देशभक्ती आहे, चांगल्या कामात कोलदांडा न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:पलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि “सुजाण नागरिक’ बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे. ज्या देशामधील नागरिक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास पात्र असतात, त्या देशाला प्रगती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते.
प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.

खारीचा वाटा नक्कीच उचलू

ह्या गोष्टी राष्ट्रभक्तीचा केवळ एक छोटासा उपसंच आहेत. पण राष्ट्रभक्तीचा परीघ ह्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. अशा वातावरणात आज गरज आहे ती तरुण आणि यशस्वी लोकांच्या कहाण्या लोकांसमोर आणायची. आजही अनेक तरुण आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. यात महिला फार मोठ्या प्रमाणात आहेत. तरुणांची ही ऊर्जा जेव्हा मार्गी लागेल, तेव्हाच या देशाचा उत्कर्ष होईल. तेव्हाच देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू शकेल.

सर्वप्रथम मी या देशाचा आहे हा विचार, ही भावना रुजवायलाच हवी, ते काम आपण आज, आत्ता स्वत:पासून सुरू करुया! “कल करे सो आज, आज करें सो अब’ ही उक्ती सार्थ व्हावी.माझ्या देश बांधव, तरुणाईला मी आवाहन करतो की, आपल्यातील भेदाभेद सोडून एक व्हा. देश संकटात असताना अभेध्य व्हा. वज्रमूठ करा. एकीची साखळी मजबूत करा. असे झाले तर भारत बुलंद  होईल.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..