थोरले आबा खूपच सिरियस होते. आज जातील की उद्या अशी अवस्था होती. घरातले काळजीत होते.त्यांचा उजवा हात जितेंद्र खूपच जास्त टेन्शनमध्ये होता. त्याला एका वेगळ्याच काळजीने घेरले होते. तो सतत ठिकठिकाणी फोन लावत होता. कोणाकोणाशी फोनवर बोलत होता. मधूनच आय सी यू मध्ये नजर टाकत होता. आबांचा कारभार दोन दिवसांपेक्षा कमी वेळात आटपू देत अशी देवाशी प्रार्थना करत होता. तुम्हाला वाटेल की हा कसला उजवा हात?आपल्या मालकाच्या मरणाची वाट पहातोय!! तसं नाहीये हो.जितेंद्रला आबा म्हणजे प्राणाहून प्रिय. त्यांचा हर एक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच जणू. आबांनी इच्छा व्यक्त करायची आणि जितेंद्रनी ती हरएक प्रकारे ती पूर्ण करायची हे ठरलेलेच होते. जीतेंद्रचे खरे नाव होते सदाशिव पण आबांना जीतेंद्र हा हिरो आवडायचा . कधी कधी ते खुशीत असले की सदाशिवाला,” वा रे मेरे जितेंदर “!असे म्हणायचे. सदाशिवाला जितेंद्र हे नाव चिकटले ते कायमचेच. आता तर त्याला या नावाची इतकी सवय झाली होती की कागदोपत्री असलेले आपले नावही त्याला अनोळखी वाटू लागले होते. इतके होते तरीही हा का बरं आबा लवकर जावेत अशी इच्छा व्यक्त करत असावा? त्यासाठी तुम्हाला सगळी स्टोरी पहिल्यापासून समजायला हवी. या थोरल्या आबांना दोन गोष्टींचं भारी वेड होतं. एक शेतीत नवनवीन प्रयोग करून भरघोस पीक काढायचं आणि दुसरे सिनेमा पहायचे. ऐन जवानीत ते मारधाडीच्या चित्रपटांचे शौकीन होते. नंतर कधीतरी त्यांच्यावर जीतेंद्र श्रीदेवीच्या जोडीने जबरदस्त गारूड घातलं होतं .आताशा त्यांना टिव्हीवरचे कॉमेडी शो भारीच आवडायला लागले होते. प्रत्येक शो चारपाचदा तरी पहायचे. दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या रूममधल्या टिव्हीवर हेच चालू असायचे.गेल्या दोनेक वर्षांपासून आबांनी घरच्या ,शेतीच्या कारभारातून अंग काढून घेतलं होतं . तरीही रोज एकदा तरी शेतावर चक्कर मारायची सवय काय त्यांनी सोडली नव्हती. एवढ्या पंचावन्न एकर जमिनीत कुठे काय लागलंय,कुठे पाणी कमी पोहोचतयं ,कुठले कामगार कामचुकारपणा करतायत याची त्यांना बरोबर माहिती होती.ते रोज शेताच्या वेगवेगळ्या भागांकडे जात. कधी सलग तीन दिवस एकाच भागाकडे जात. आता ते आपल्या भागाकडे येणार नाहीत असे वाटत असताना कोणीतरी निवांत बसायला आणि आबा तिथेच पोहोचायला एकच गाठ पडायची. सगळ्यांना त्यांचा जबरदस्त धाक होता. आबांच्या पत्नी गेल्यावर आबा मनातले सारे सांगायचे ते सदाशिवाला म्हणजेच त्यांच्या जितेंद्रला!! एकदा एका कॉमेडी शो मध्ये कोणीतरी आजोबा मरतात आणि त्यांच्यासमोर कोणीतरी एक अगदी धाय मोकलून रडत असतो. नंतर नंतर अनेकदा स्कीटमध्ये कोणीही मेले तरी तो रडणारा हिरो असायचाच. कधी कधी तर त़्या कलाकाराला रडायचा चान्स मिळावा म्हणून स्पेशल स्कीट लिहिलेले असावे असे सदाशिवाला नाही आमच्या जितेंद्रला ठामपणे वाटत असे.तर हा रडणारा हिरो आबांना फार आवडायचा. “काय ओक्साबोक्शी रडतय रे ह्ये!बघणाऱ्याला वाटंल की खरंच कोणीतरी जवळचं माणूस खपलय आणि याला खूप दुःख झालंय”असे आबा नेहमीच म्हणायचे.
आबांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला आणि आता आपण मरणार असे त्यांना वाटू लागले. ते सारखे सारखे मरण्याच्या गोष्टी करू लागले. सदाशिव अस्वस्थ होऊ लागला. असेच एका संध्याकाळी तो आबांबरोबर टिव्हीवर विनोदी कार्यक्रम बघत होता.आबांचा लाडका याला त्याला मिठी मारून “आमचे अण्णा गेले” म्हणून रडत होता. चारच दिवसांपूर्वी आबांच्या जवळच्या मित्राचा कारभार दीर्घ आजारानंतर आटोपला होता. त्यावेळी त्यांच्या घरचे सगळे गंभीर होते पण प्रत्येकाच्या मनात सुटकेची भावना होती. जरी वरवर “सुटले बिचारे त्रासातून” असे सगळे म्हणत होते तरी घरातल्यांच्या मनात मात्र आपण सुटलो ही भावना जास्त प्रबळ होती असे आबांना वाटत होते. आपण जाऊ तेव्हा पण कोणीही रडणार नाही की काय असे वाटून आबा आणखीच अस्वस्थ झाले.त्यांना बरे वाटेनासे झाल्यावर हॉस्पिटलमध्ये जितेंद्र त्यांना भेटायला गेला तेव्हात्यांनी जितेंद्रला गळ घातली.
” हे बघ जितेंदर किती पण पैसा खर्च झाला तरी चालेल पण मी मेल्यावर या हिरोला रडायला बोलवायची सुपारी द्यायची जबाबदारी तुझी. आपल्या आबासाठी एवढं करशील ना?”
आता आली का पंचाईत.एकतर इतक्या लगेच त्या हिरोपर्यंत पोचायचे कसे आणि आपण जरी त्यांच्यापर्यंत पोचलो तरी त्याला अशा कारणांसाठी बोलवायचे कसे?आधी जरी सांगितले नाही तरी प्रत्यक्षात तिथे तो हिरो आल्यावर त्याला जेव्हा कळेल की त्याला मृत व्यक्तीसमोर रडायला बोलवले आहे तर तो जितेंद्रचे काय करेल याचा भरवसा नव्हता. जितेंद्रसमोर मोठ्ठा प्रश्न पडला होता. त्याला एकदा वाटलं की आबांना ते स्वतःच गेल्यावर काय कळणार आहे,कोणी रडलं की नाही ते. पण त्याचे मन त्याला खात राहिले असते.
खूप विचार केल्यावर जितेंद्रने आपला वकील मित्र सुदर्शन माने यांचा सल्ला घ्यायचे ठरवले. सुदर्शनने आपले वकीली डोके लावून एक मस्त कल्पना मांडली.
जितेंद्रला पण ही आयडियाची कल्पना आवडली. काय डोकं आहे या सुदर्शनचं!तो मनाशी म्हणाला.
सर्वात पहिले त्या हिरोची गाठ घेतली.एका तासांच्या कार्यक्रमासाठी सव्वादोन लाखाची बिदागी मिळणार हे ऐकल्यावर तो हिरो फार आढेवेढे न घेता तयारही झाला. फक्त त्याला सांगितले होते की एका स्पेशल इव्हेंटमध्ये त्याला गेस्ट म्हणून यायचे आहे आणि थोडी ॲक्टिंग करायची आहे. सुदर्शनने सांगितल्याप्रमाणे जितेंद्रने लेखी कागद तयार केला होता. अगदी बारीक फॉंटमध्ये जवळपास दहा पानांचे करारपत्र होते.त्या करारपत्रावर हिरोने न वाचताच सही केली.एकच प्रॉब्लेम होता, पक्की तारीख कशी सांगणार? पण मग लवकरच सांगतो .फक्त तुम्ही आयत्यावेळी सांगितले तरी या .मोठे राजकीय पुढारी येणार आहेत. त्यांच्या वेळेप्रमाणे कार्यक्रम ठरवायला लागेल. वाटले तर आम्ही तुमची येण्याजाण्याची सोय करू. जरा ॲडजस्ट करा अशी विनंती करून जीतेंद्र घरी परतला.
आठ दिवसांनी तो हिरो शूटिंगसाठी परदेशात जाणार होता. त्यातले पाच दिवस उलटले होते. जितेंद्रला हातात फक्त दोन दिवस होते.आतापर्यंत तुम्हाला कळले असेलच जितेंद्र एवढा का अस्वस्थ होता ते….
पण आबांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की त्याचं दिवशी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.
जितेंद्रने पहिला फोन हिरोला लावला.सुदैवाने हिरोचे शूटिंग नुकतेच संपले होते. येताना पांढरे कपडेच घालून यायला सांगायला जितेंद्र विसरला नाही. कार्यक्रमाचा हाच ड्रेसकोड आहे असे सांगितल्यावर हिरो तयार झाला. साधारण तीनचार तासांत हिरो येईल याचा अंदाज जितेंद्रला होताच.
त्याने अंत्ययात्रेची जय्यत तयारी केली. गावच्या वेशीबाहेर त्या हिरोचे स्वागत करून जीतेंद्र आणि सुदर्शन त्याला परस्पर रेस्टहाऊसवर घेऊन गेले. तिथे त्यांनी हिरोला काय कार्यक्रम आहे याची कल्पना दिली.
अपेक्षेप्रमाणे हिरो भडकला पण सुदर्शनने करार पत्रातला मजकूर वाचून दाखवल्यानंतर हिरो गप्पच बसला.फक्त तिथे कोणीही आपले फोटो काढायचे नाहीत किंवा रेकॉर्डिंग करायचे नाही .आपले नाव प्रसिद्ध करायचे नाही .अशा अटी हिरोने घातल्या. हिरो तयार झाला यातच आपले नशीब मानून जितेंद्रने त्या अटी लग्गेच मान्य केल्या. थोड्या वेळाने आबांच्या मृत देहासमोर दोन माणसे धाय मोकलून रडत होती. एक आत्तापर्यंत रडायला ही फुरसत न मिळालेला पण खरोखरचे दुःख झालेला जितेंद्र आणि दुसरा अर्थातच सव्वादोन लाखांच्या कात्रीत सापडलेला आपला हिरो!!
(तुम्हाला म्हणून सांगते, तो हिरो मनातल्या मनात विचार करत होता. एकूण साताठ तास खर्च झाले आणि स्कीट ऐवजी खरोखरचे रडायला लागले .पण पर डे मिळतात त्याच्या कित्येक पटीने पैसे मिळाले. आपण लास्ट राएटस् इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काढायला काय हरकत आहे!!!!)
समिधा गांधी
Leave a Reply