रॉनल्ड रेगन यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९११ रोजी झाला.
रॉनल्ड रेगन यांनी २० जानेवारी १९८१ ते २० जानेवारी १९८९ या कालखंडात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर ते कॅलिफोर्नियाचे ३३ वे गव्हर्नर होते. राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.
रेगन हे अर्थशास्त्र व समाजशास्त्र विषयांचे पदवीधर होते. पदवी मिळवल्यानंतर ते प्रथम आयोवा येथे रेडिओवर रुजू झाले. १९३७ मध्ये तो कॅलिफोर्नियात लॉस एंजेल्स येथे त्यांनी अभिनयास सुरुवात केली. अनेक चित्रपटांमधून व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून साकारलेल्या भूमिकांमुळे रेगन यांना लोकप्रियता लाभली. १९६२ साली त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. १९६४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींत बॅरी गोल्डवॉटर याच्या समर्थनार्थ त्यांनी केलेले प्रेरणादायक भाषण ऐकून रिपब्लिकन पक्षाने त्यांना कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठी उभे केले. ते दोनदा या पदावर निवडून आले. १९८० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत पक्षाकडून उमेदवारीचे नामांकन मिळवण्यात ते यशस्वी झाले. अध्यक्षीय निवडणुकींत त्यांनी विद्यमान अध्यक्ष व डेमोक्रॅट उमेदवार जिमी कार्टर यांना हरवून निवडणूक जिंकली. त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय मुदतीत अमेरिकेने ग्रेनेडावर आक्रमण केले. देशांतर्गत आघाडीवर चलनवाढ रोखण्यासाठी रेगन प्रशासनाने वित्तपुरवठ्यावर नियंत्रण राखले, आर्थिक वाढीस चालना देण्याकरता कर घटवले, शासकीय खर्चात कपात केली.
अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीत त्यांनी सोव्हियेत संघाचे शासन प्रमुख मिखाइल गोर्बाचेव याच्यासह मध्यम पल्ल्याच्या आण्विक शस्त्रांचा तह घडवून आणण्यासाठी वाटाघाटी केल्या. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत शीतयुद्धाची अखेर झाली.
रॉनल्ड रेगन यांचे ५ जून २००४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply