रॉय किणीकर यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला. रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काही ना काही ललित लेखन करीत असत. रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या होत्या. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्या ’घराबाहेर’ नाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी औरंगाबाद नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत असत.
रॉय किणीकरांच्या ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाचे त्याकाळी १९ प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. साहाय्यक नाट्यदिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवादफेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत. किणीकरांनी नाटक, एकांकिका, कथा, कादंबरी, अनुवाद, बालसाहित्य अशा साहित्याच्या बहुतेक प्रत्येक क्षेत्रात लिखाण केले असले तरी रॉय किणीकर हे मूळचे कवी. काळानुसार संस्कृती समृद्ध होत गेली असली आणि देशोदेशी तिची रूपे निरनिराळी घडली असली, तरी कवीला त्याच्या काव्यक्षणी हे देशकालाचे बंधन राहत नसते. उलट, या देशकालाच्या सीमा भेदून संस्कृतीच्या असीम प्रदेशात विहरण्याचा परवाना कवींकडे असतो. हे विधान अलंकारिक वाटेल; पण रॉय किणीकर हे असा असीम परवाना मिळालेले कवी होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे ‘उत्तररात्र’ या चार ओळींच्या रुबाईवजा रचनांचे पुस्तक!
किणीकरांच्या आजवरच्या पुस्तकांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या पुस्तकातला काळ आणि देश ओळखू येऊ नये अशा एका प्रदेशात ते वाचकाला घेऊन जातात. मानवी सुख-दु:खांच्या प्याल्यातले जीवनद्रव्य कसे कालातीत आहे, हे दाखवतात. एका समाजाशी, एका भौगोलिक सीमेत घडलेल्या इतिहासाशी, एका दशकाशी किंवा शतकाशी बांधून न घेणारे किणीकर (बहुधा त्यांच्याही नकळत) अनेकान्तवादी ठरतात. एका स्थितीचे निरनिराळे कोन ते उलगडून दाखवतात.
रॉय किणीकर यांच्या जन्मशताब्दीचे (२००८) औचित्य साधून रॉय किणीकर यांची सर्व १४ प्रकाशित पुस्तकांची पुनर्मुद्रणे उपलब्ध झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी- २०१३ च्या जानेवारीत आणखी अप्रकाशित रॉय किणीकर नव्याने पुस्तकरूपात आले, ते हे- ‘शिल्पायन’! भारतीय शिल्पकलेबद्दल रॉय किणीकरांनी वेळोवेळी काढलेल्या टिपणांमधून तयार झालेल्या चार निबंधांचा (‘लघु’निबंध नव्हे; विषयव्याप्ती आणि शब्दसंख्या या दोन्ही दृष्टीने निबंधांचा!) हा संग्रह. हे पुस्तक वाचकाला केवळ शब्दांमध्ये जखडून न ठेवता भारतीय आणि प्रसंगी अन्य संस्कृतींच्या कालातीत प्रदेशात नेऊन उघडय़ा डोळ्यांनी शाश्वत मानवी अनुभवांच्या रूपसौंदर्याकडे पाहायला लावणारे आहे. त्यामुळे ते उत्तम व देखणे व्हावे यासाठी रॉय किणीकर यांचे पुत्र अनिल किणीकरही लक्ष घालत होते.
रॉय किणीकर यांचे निधन ५ सप्टेंबर १९७८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘शिल्पायन’- रॉय किणीकर, मनोविकास प्रकाशन, पुणे, पाने- १३६ , मूल्य- १५० रुपये.
या पाणवठ्यावर – रॉय किणीकर
या पाणवठ्यावर आले किती घट गेले
किती डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किती पडले तसेच काठावरती
किती येतील अजुनि नाही त्यांना गणती
हा असा राहु दे असाच खाली पदर
हा असा राहु दे असाच ओला अधर
ओठात असु दे ओठ असे जुळलेले
डोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले
संपेल कधी ही शोधायाची हाव
फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रुत भिजावी विझताना ही ज्योत
ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची
ही दुनिया आहे केवळ हसणाऱ्यांची
दाखवू नको रे डोळे ते भिजलेले
जा तुडवित काटे, रक्ताने जरी भरलेले
काळोख खुळा अन खुळीच काळी राणी
संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ
ओठात चुंबने भरली काठोकाठ
गुदमरली काजळकाठावरची धुंदी
कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ
पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ
ओठात अडकले चुंबन रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल
घालता उखाणा फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ
Leave a Reply