नवीन लेखन...

रोझी आणि चमको

वहिदा आणि दिप्ती दोघींचीही जन्मतारीख एकच, ३ फेब्रुवारी! मोठीचं साल १९३८ तर धाकटी १९५२ ची. दोघीत फरक १४ वर्षांचा. जवळ जवळ एका पिढीचं अंतर. एक कृष्णधवल जमान्यातील तर दुसरी, जात्याच ईस्टमनकलर!
वहिदा तामिळनाडूमधील, पडद्यावर पदार्पण केलं १९५५ सालातील एका तामिळ चित्रपटातून. गुरुदत्तने तिच्यातील अभिनयक्षमता ओळखली व १९५७ मधील ‘प्यासा’ द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीला एक सशक्त अभिनेत्री मिळाली. त्यानंतर ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटांच्या यशाने ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
‘गाईड’ मधील रोझी मार्कोच्या चाकोरीबाहेरील भूमिकेने तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळवून दिला.
दिप्ती नवलचा जन्म अमृतसरचा. लहान असतानाच तिच्या वडिलांना अमेरिकेत नोकरीसाठी जावं लागलं, साहजिकच दिप्तीचं पुढील शिक्षण परदेशात झाले. तिने तिथे फाईन आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले. ती मुंबईत सहज फिरायला म्हणून आली व श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातपटात तिनं काम केलं. ते ‘जुनून’ चित्रपटाची जुळवाजुळव करीत होते, त्यामध्ये त्यांनी तिला एक छोटा रोल दिला. दिप्तीने अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही तिची भूमिका लक्षवेधी ठरली.
१९८१ साली प्रदर्शित झालेल्या सई परांजपे दिग्दर्शित ‘चष्मेबद्दूर’ मधील ‘मिस चमको’च्या भूमिकेतून ती रसिकांच्या मनात ठसली. अगदी पलीकडच्या घरात राहणारी, ती साधी आणि निरागस दिसली. त्याच चित्रपटातील फारूख शेख सोबत तिची ‘केमिस्ट्री’ जुळली आणि त्यांच्या एकूण आठ चित्रपटांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्यांतील मला आवडलेला चित्रपट, ‘साथ साथ’! त्यातील जगजित सिंग व चित्रा सिंग यांची गाणीही अप्रतिम! दहा वर्षांनंतर तिचं करीयर थंडावलं. प्रकाश झा या दिग्दर्शकाशी तिनं १९८५ साली लग्न केलं. हा संसार सतरा वर्षे टिकला. दरम्यान तिनं एका मुलीला दत्तक घेतलं होतं.
ती साचलेल्या अनुभवांना कागदावर उतरवून कविता करीत राहिली. आजपर्यंत दोन कवितासंग्रह व एक कथासंग्रह तिच्या नावावर आहेत. तिनं पुन्हा संसार नाही पण सहजीवनासाठी एकाची निवड केली, मात्र तो अल्पावधीतच हे जग सोडून गेला. मग तिनं नाटकात, दिग्दर्शनात, पेंटींग्ज व प्रवास करण्यात मन रमवलं.
वहिदानं ‘शगुन’ या १९६४ साली केलेल्या चित्रपटातील नायकाशी म्हणजेच शशी रेखीशी, दहा वर्षांनंतर प्रत्यक्षात शगुन केला. तिला दोन मुलं झाली. आज ती त्यांच्या व्यवसायात मग्न आहेत. २००० साली शशी रेखी गेल्यानंतर ती वांद्रे येथे रहात आहे. तिच्या देदीप्यमान कारकिर्दीबद्दल भारत सरकारने पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार देऊन तिला गौरविले आहे. सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून ‘गाईड’ व ‘नीलकमल’ साठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. ‘रेश्मा और शेरा’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. जीवनगौरव पुरस्काराने देखील तिला सन्मानीत करण्यात आले आहे. आता ती तिची मैत्रिण. आशा पारेखसोबत, समारंभांना सेलेब्रिटी म्हणून उपस्थित रहाते व आनंदात जगते.
दिप्तीचे जवळचे नातेवाईक गेल्याने तिला, तिचं एकटेपण खायला उठतं. तिची अवस्था समुद्रवादळात सापडलेल्या दिशाहीन नावेसारखी झाली आहे. लाटांना तोंड देत, वल्हे वल्हवत रहायचं. आज तिनं सत्तरी गाठलेली आहे. आज तिच्याकडे पाहिलं की, असं व्हायला नको होतं असं मनापासून वाटतं. मी जर चित्रगुप्त असतो, तर फारूख शेखची आणि तिची जोडी जमवूनच तिला पृथ्वीवर पाठवलं असतं.
आत्ता सत्तरीच्या उंबरठ्यावरुन तिनं मागे वळून पाहिलं की, ‘जुनून’ पासून ते आजपर्यंतची तिची कारकिर्द तिला दिसत असेल. देशातील व परदेशातील मानसन्मान, पुरस्कार आठवण असतील. तिचं नागरिकत्व अमेरिकेन असल्यामुळे असेल कदाचित, ‘एक बार फिर’ या चित्रपटात ती बिनधास्त वावरली. ‘कमला’ चित्रपटातील भूमिका, तिने अविस्मरणीय साकारली. २०१३ साली ‘बीए पास’ सारखा चित्रपट स्वीकारला.
याउलट वहिदाने कधीही अंगप्रदर्शन केलं नाही. तशा विचारांच्या दिग्दर्शकांना तिने जाणीवपूर्वक टाळलं. सिनेसृष्टीत स्वतःचं नाव न बदलता, जे आहे तेच ठेवण्याचा आग्रह धरला.
चंदेरी दुनियेत कारकिर्द करताना, अनेकजण संपर्कात येतात. मग ते नायक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ कोणीही असू शकतं. त्यांच्याशी पाऱ्यासारखं अलिप्त रहाणं ज्याला जमलं, तोच खरा! अन्यथा जीवनात नैराश्य येतं. दोघींच्याही जीवनात तशा गोष्टी घडलेल्या आहेत. वहिदानं त्या गोष्टींवर पडदा टाकलाय. दिप्ती विसरण्याचा प्रयत्न करतेय.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-२-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..