नवीन लेखन...

रूहमें फासले नहीं होते !

वाढत्या वयातले सापळे वेगळे असतात. आत्म्यांमध्ये अंतर असत नाही कारण सर्वांभूती एकच आत्मा असतो आणि तो अविनाशी असतो. मात्र वाढत्या वयात आयुष्य आपलं बोट हळूहळू सोडत आपल्याला एकाकी वाटचाल करायला भाग पाडतं. हे सोप्पे नसते- जागोजागी शारीरिक आणि मानसिक खच्चीकरणाच्या सुरु असलेल्या प्रक्रियेत, आपोआप निर्माण होणाऱ्या अंतरायात दमछाक अपरिहार्यपणे होत असते. मग चेहेऱ्यावर हास्य चिकटवत, मिळेल त्याची साथ घेत “चलते रहो” हा नारा गर्जत(?) रस्ता सरेपर्यंत फरफट हेच भागधेय !

एकाचा मुलगा परदेशी, पत्नीही मुलाकडे ! हा एकटा – हृदयविकाराच्या झटक्याने दवाखान्यात दाखल. फोनवर मुलाशी,नातवाशी बोलण्याचे समाधान मानत पण प्रत्यक्षात मानलेल्या मित्रांचे ऋण घेत बरा होतोय.

दुसरा – मुलाच्या आत्महत्येनंतर पत्नी अपघातामुळे व्हील चेअर वर जखडलेली ! आता लग्नाच्या वाढदिवसाला सगळ्यांना बोलावून सुरु असलेले जगणे साजरे करण्याच्या अपयशी प्रयत्नात !

तिसरा – पत्नी आपल्या ज्युनिअरबरोबर पळून गेली त्या आघाताला विसरू न शकणारा , वरकरणी खत्रूड पण आतून तुटलेला !

चौथा – मुलगा सासऱ्याच्या ओंजळीने पाणी पितो म्हणून, नातवाच्या भेटीला तरसणारा ! नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीतून खजील,अवमानित होऊन मित्राकडे दारू प्यायला आलेला !

पाचवा- वरकरणी बेफिकीर, स्वतःबद्दल अवाक्षरही न काढणारा,सगळ्यांना हसवत,स्वतःचा अवमान गिळणारा हॅप्पी गो लकी ! कलासक्त असणारा हा पाचवा सगळ्यांच्या मदतीला पुढे आणि काही ना काही नव्या आकर्षक कल्पना घेऊन सगळ्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. अगदी अनोख्या पद्धतीने त्याच्याही मुखवट्याचे गुपित शेवटी बाहेर पडते.

या साऱ्यांचा सामायिक असतो एक जिमखाना – रोज मनसोक्त बॅडमिंटन, नंतर तुडुंब नाश्ता, सोबतीला यथेच्छ पीजे आणि एकमेकांचे पाय खेचणे ! क्लबमध्ये येणाऱ्या उताराला लागलेल्या महिलांवर एखादी निर्विष टिपण्णी ! बस्स- मुखवट्यांना दडवायला एवढं पुरेसं. उरलेला वेळ व्यक्तिगत आणि आपापल्या पिंजऱ्यातला.

अशा पाच मित्रांच्या नशिबी एक डॉक्टर जोडपे- कथानायक आणि नायिका.

नुकतेच पुण्याहून मुंबईला शिफ्ट झालेले ! तरणाताठा एकुलता एक मुलगा परमुलुखात मारला गेला गोळीबारात आणि इकडे हे उध्वस्त ! ती आधी सावरते- एका दवाखान्यात नोकरी धरते, जमेल तसं डिप्रेशनमुळे घरघुश्या झालेल्या नवऱ्याला सूर्यप्रकाश दाखवायचा प्रयत्न करते.
एकदा वैतागून तिच्या ज्येष्ठ सहकाऱ्याला विचारते-
” मुलगा तर मीही गमावलाय, पण माझ्या नवऱ्यालाच फक्त अजून दुःख का? मी सावरले म्हणजे माझं काही चुकलं का?”
सहकारी समजावतो –
“भूकंपाची तीव्रता एकसारखी असली तरी एखाद्या भिंतीला फक्त तडे जातात तर दुसरं आख्ख घर जमीनदोस्त होतं.”

रूहमें फासले नहीं होते,पण एकत्र आलेली,आणली गेलेली माणसे मात्र सकारण -अकारण वेगळाली होतात. धरलेला हात सोडून पण त्याच रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असतात.

ही पाचही माणसे स्वतःचा तोल सावरत डॉक्टरांनाही मैदानात आणतात, कोषाबाहेर काढतात. शेवटी काव्यगत न्यायानुसार पाचव्याच्या ब्रेन सर्जरी साठी सारेजण डॉक्टरांना तयार करतात,तेही हरपलेला आत्मविश्वास गोळा करीत आपले न्यूरो सर्जरीचे ज्ञान पणाला लावून पाचव्याला कसेबसे वाचवतात- भलेही त्याची चेहरेपट्टी विद्रुप होते. पुन्हा जिमखाना,हंसी-मजाक, “शो मस्ट गो ऑन” तत्व !

आपल्या पाडसांपासून तात्पुरते/कायमचे दुरावलेले नव्याने जुनंच जगायला लागतात- रुहमें फासले नहीं होते !

“क्लब ६०” हा असा दुर्लक्षित शिक्षक ! वयाच्या उताराला लागल्यावर त्या टप्प्याचे शिक्षण देणारा !!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..