नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग १०

मनोहरने हात डोक्याच्यावर ताणून मोठा आळस दिला. आपला हरामखोर बाप कुबेर आहे आणि त्याचा काटा परस्पर काढायचाय हे त्याने जेव्हा नक्की केले,तेव्हा त्याचा घरातील बित्तंबातमी हाती असणे आणि ती पुरवणारी व्यक्ती हुडकणे गरजेचे होते. जसवंत शिवाय इतर कोणीच हे काम करू शकणार नव्हते. जसवंताताचा इतिहास शोधताना, मनोहरला ते हुकमी शस्त्र घावले! जसवंतला गांजाचे जबरदस्त व्यसन होते! मनोहरने अर्थात त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला!

“जसवंत, मी तुला गांजाच्या पुड्या देत जाईल, त्या बदल्यात तू मला संतुकरावची माहिती दे!” मनोहरने एक दिवस जसवंत समोर सरळ प्रस्ताव मांडला. विना पैशाच्या ‘माल’ मिळतोय! अशी संधी जसवंत सोडणार नव्हता!

“काय माहिती?अन कशाला?” जसवंतने सावध पैंतरा घेतला.

“तुला काय करायचंय?”

“तुला काही माहिती दिली अन भलतंच काही झालं तर?”

“मी विचारीन त्यात धोका वाटला तर नको माहिती देऊ! ‘माल’ पण नाही मिळणार! ‘धोका’ काही कृत्य केलेतर होतो. फक्त ‘माहिती’ दिल्याने होत नाही. अन तू मला माहिती देतोस हे कुणाला कळणार आहे? पहा विचार कर!”

“ठीक! मला वाटलं तरच मी माहिती दिल! माहिती दिली की ‘माल’ मात्र मिळाला पाहिजे!”

“लगेच देत जाईल!”

“विचार.”

“संतुकराव कसे आहेत?”

“राजा माणूस! पगारीला तक-तक नाही! दिवाळी बोनस ठरलेला! एक जानेवारीला दोन नवे कोरे ड्रेस! रहायला आऊट हाऊस. जेवण नाश्ता त्यांच्याच किचन मधून !आपुन खुश आहोत! फक्त साल सुट्टी देत नाही!”

” रात्री कितीला झोपतात?”

“नक्की माहित नाही. पण जेवण रात्री नऊच्या ठोक्याला करतात. ”

नऊला जेवण म्हणजे साडेदहा अकराच्या दरम्यान झोपत असावे.

“सकाळी केव्हा उठतात?”

” सकाळी सहाला !”

“काही ‘नाद’?बाई ,बाटली?”

” काहि नाही. ”

” काही सवयी ?”

” सवय म्हणशील तर सनकी आहे! बेडरूम मध्ये रोज झोपणारा, एक दिवस बाहेर बाल्कनीत झोपले! एकदा तर गार्डन मधल्या झोपाळ्याला मच्छरदाणी लावूनच झोपले!”

” ठीक . आज इतकंच ! पुन्हा चार दिवसांनी भेटतो! आणि हो हे आजच्या माहितीचा मोबदला.” मालाच्या दोन पुड्या देत मनोहर म्हणाला.

संतुकरावानी मनोहरची भेट नाकारली त्याला महिना झाला होता. मनोहरने रुद्राला ‘नक्षत्र ‘ची रेकी करून ठेवण्यास सांगितले होते. जसवंत ‘माला’त फसला होता. खुनाचे स्थळ पक्के होते! नक्षत्र ! वेळ  पक्की होती! रात्रीची! फक्त दिवस ठरवायचा होता! आणि मनोहर तो आज ठरवणार होता! त्याने जसवंतला ‘येतो’ म्हणून कळवले.

“जसवंत आज तुझे मालक बाहेर गावी गेलेत का ?”

” नाही! रात्री येणार आहेत बंगल्यावर!”

” बेडरूम मध्येच झोपणार कि –”

“नाही! हल्ली ते आऊट हाऊस मध्ये झोपतात!”

“काय? ”

“हो! गेल्या महिन्याभरा पासून ते आऊट हाऊस मधेच झोपतात!”

मनोहरची भेट नाकारली त्याला महिनाच झाला होता!

” का?”

” सनकीपणा! दुसर काय ?”

“आज अजून एक फेवर पाहिजे! त्या साठी तुला ऍडिशनल माल देतो!”

” काय?”

“मी ठीक नऊला येतो. मला तो झोपतो त्या आऊट हाऊस मध्ये फक्त पंधरा मिनिटे जाऊ दे! ”

” कशाला? काय बॉम्ब बिंब ठेवणार कि काय ?”

तसा या बुटक्या माणसाला पंधरा मिनिटेच काय दिवसभर जरी त्या आऊट हाऊस मध्ये सोडले तरी काही हरकत नव्हती! फार गडबड वाटली तर एक फटक्यात लोळवता येणार होते! जसवंतला आपल्या शक्तीवर भरोसा होता.

“मी मोकळ्या हाताने येईन तू तपासून घे!”

” ठीक! ये!”

मनोहरने त्याला दोन गांज्याच्या पुड्या दिल्या! आज त्या जरा ज्यास्तच जाड वाटत होत्या.

” हा, मनोहर रात्री येताना बोनस माल घेऊन ये! ” पुड्या खिश्यात सारत जसवंत म्हणाला.

रात्री आठच्या दरम्यान मनोहरने चार गांज्याच्या पुड्या कपाटातून काढून खिश्यात टाकल्या. तसेच एक प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेले , बारीक वायरचे काही इलेकट्रोनिक्स सर्किट त्याने दुपारी खपून तयार केले होते ते खिश्यात सारले.त्याने इलेक्ट्रॉनिक्सचा केलेला हार्डवेअरच्या कोसेर्स आज कामाला आला होता.

त्याने रुद्राला फोन लावला.

“रुद्रा, आज तयारीत रहा. म्हातारा रात्री अकराच्या दरम्यानच्या आऊट हाऊस मध्ये असण्याची शक्यता आहे. मी तुला साडेदहाच्या सुमारास खात्रीलायक टीप देतोच! साधारण तुला नक्षत्र गाठायला किती वेळ लागेल?”

” मी तयारच असतो! पंधरा मिनिटात मी तेथे पोहोचेन. पण गार्डचे काय?”

“एकच आहे. पण त्याची काळजी करू नकोस! तो आज गांज्याचा तारेत असेल! मी त्याची सोय करतोय!”

“ओके.”

मनोहरने आपली कड्डम, तरी भरोशाची बाईक काढली. भरवशाची म्हणजे आजवर कधी तिने दगा दिला नव्हता! ‘नक्षत्र ‘ जवळच्या एका कोळोख्या झाडाच्या आडोश्याला ती मुंगळ्या सारखी दिसणारी त्याची बाईक त्याने पार्क केली. अंधाराला डोळे सरावल्यावर मनोहर ‘नक्षत्र ‘ च्या मेन गेट जवळच्या जसवंतच्या केबिन जवळ गेला. जसवंत खुर्चीत तंगड्या पसरून बसला होता. बहुदा दम निघाला नसावा, एखादी पुडी त्याने चढवली असावी.

“जसवंत!” त्याने हलकेच आवाज दिला.

“हू ” जड डोळ्यांनी त्याने मनोहरला पहिले आणि मानेनेच ‘जा’ म्हणून गेट उघडून दिले. मनोहर सावली सारखा आत अंधारात मिसळून गेला.

मनोहर बंगल्या मागच्या त्या आऊट हाऊस कडे जाताना त्याने खिशातून हातमोजे काढून हातावर घातले. झिरो बल्बच्या उजेडात आऊट हाऊसचे दार लख्ख दिसत होते. मनोहर आत घुसला. आत शेड असलेला टेबल लॅम्प लावून खोलीत प्रकाश केला. समोर भिंतीला लागून कॉम्पुटर टेबल, त्याच्या मागे एक चेयर, टेबलवर पुस्तके, वही, पेन असे सटरफटर सामान होते. त्याने आपली शोधक नजर भिंतीवरून फिरवली. टेबल ज्या भिंतीस लागून फिक्स केला होता त्यावर एक उगवत्या सूर्याचे पेंटिंग होते. ते पाहून मनोहर समाधानाने हसला. त्याने खिशातून छोटा स्पाय कॅमेरा आणि त्याची असेम्ब्ली काढली. पेंटिंगच्या सूर्यावर तो कॅमेरा फिक्स केला. या पॉईंट पासून फक्त खुर्चीत बसल्याच माणसाची नाही तर सगळ्या खोलीचे चित्रीकरण होणार होते.! रेकॉर्डिंग असेम्ब्लीत आठ GBचे कार्ड सहा तासाची रेकॉर्डिंग साठवू शकणार होते. त्यातली बॅटरी बारा तास चालू शकत होती. त्याने ती असेम्ब्ली  ऑन करून पेंटींगच्या मागे फटीत सरकवली! तो बाहेर पडणार तेव्हड्यात बाहेरचे दार वाजले! तो झटकन अंधाऱ्या कोपऱ्यात सरकला. दारात डाव्या हातात दंडुका घेतलेला जसवंत उभा!

“मनोहर चल निघ! मालक केव्हाही येऊ शकतो!”

मनोहर घराबाहेर पडला आणि अंधारात सरकला. जसवंतने दार लावून घेतले आणि सटकण्याच्या बेतात असलेल्या मनोहरचे गचांडी पकडली! साला गांजाकस! न बोलता मनोहरने दोन गांज्याच्या पुड्या त्याचा हातात ठेवल्या आणि स्वतःची सुटका करून घेतली.

समोरून कोणी तरी मोबाईलच्या प्रकाशात येत होते. ते संतुकराव होते!

“जसवंत इथे काय करतोयस?आणि गेटवर कोण आहे?”

“सर, गेट लॉक केलाय. अकराची राऊंड आज जरा लवकर उरकतोय. सगळं ठीक आहे का पहातोय!”

“तुझा आवाज असा का थरथरतोय?का पुन्हा गांजा —–”

” ना –नाही सर! तो मी मागेच सोडलंय!”

“मग ठीक. मेन गेट वर जा !”

” जी सर!”

गांजाचं एक बर असत त्या दारू सारखं वास मारत नाही! खिशातल्या पुड्या चापचत तो गेटकडे सटकला. आता सकाळी पाच पर्यंत निवांत होत. तेव्हा आता एखादी पुडी —- मुळीच हरकत नव्हती!

(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..