” काय? तू -तू तो खून केलास?” राघव अविश्वासाने समोर बसलेल्या रुद्राकडे पहात म्हणाला.
“हो! माझ्याच हातून तो खून झालाय!”
“कसा?”
त्या नन्तर रुद्रा तासभर बोलत होता. त्या रात्री कसे घरामागच्या झाडाच्या आधारे कंपाउंड वॉल पार केली, कसे घरात घुसलो, कसे डाव्याहाताच्या चिमटीत नाक आणि तोंडावर पंकजा आवळून संतुकरावचा जीव घेतला, आणि मग कसे पसार झालो. सगळे अगदी बारीक सारीक तपशीलासह त्याने राघवला सांगितले.
“रुद्रा तू सांगितलेली स्टोरी खूप आवडली. त्याची आम्ही पडताळणी होईलच! पण त्या पूर्वी मला काही गोष्टींचा खुलासा हवाय! आणि तू खरं बोलतोय याचा पुरावाही! ”
“पुरावा? आता मात्र कमाल करताय ऑफिसर! आता प्रत्यक्ष खुनी तुमच्या समोर बसून ‘माझ्या हातून खून झालाय!’हे सांगतोय. आणि तुम्हाला वेगळा पुरावा हवाय? तसेही आवश्यक तो ‘पुरावा’ शोधणं पोलिसांचे काम असते असा माझा समज आहे.”
“तू खून करून पळून जाण्या ऐवजी पोलिसात का आलास?”
“मला झाल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय! माझ्या हातून खून झाल्या पासून मला रात्रभर झोप नाही! म्हणून मी आत्मसमर्पण करतोय!” या स्पष्टीकरणावर राघवचा अजिबात विश्वास बसत नव्हता. गिल्टी वाटणाऱ्या माणसाचे एक हि लक्षण रुद्राच्या देहबोलीत नव्हते!
“खून कसा केलास हे तू सांगितलंस. आता का केलास हे हि सांग!”
“आता तुम्हाला स्पष्टच सांगतो. मी खूप आर्थिक अडचणीत होतो. मी-मी खुनाची सुपारी घेतली होती! मला माहित नव्हते कि मी ज्याचा खून करतोय तो एक श्रीमंत माणूस आहे. मला एक ‘अर्धमेला म्हातारा नौकर मार्गातून बाजूला करायचं’ असेच सांगितले होते!”
“किती रुपयाची ‘सुपारी’ होती?”
“फक्त तीन लाखाची!”
“मिळाले?”
“नाही! फक्त दोनच मिळाले! बाकी वसूल करणार होतो पण आता ते शक्य नाही!”
“का?”
” तो एका अपघातात मेलाय! कसे वसूल करणार?”
“कोण होता तो?’
” नाव गाव नाही माहित! ”
‘मनोहर!’राघवच्या मनात नाव चमकून गेले!
“त्याचे वर्णन करू शकशील?”
रुद्राने मनोहरचे अचूक वर्णन केले. आता बरोबर जमतंय. मिसिंग लिंक म्हणजे हा रुद्राच होता! राघवने मनातल्या मनात ताडले.
“रुद्रा, मला माहित आहे तू काही ‘पश्चाताप’ झालाय म्हणून सरेंडर होत नाहीस! तुला संतुकरावांच्या ‘इच्छापत्रा’ तली संपत्ती हवी आहे!”
” तुम्ही काहीही अनुमान काढू शकता! तुम्हाला असे वाटते का मी ‘खुनाचा आरोप’ सिद्ध करून घेऊन शिक्षा न होऊ देता ‘बा इज्जत बरी ‘ होऊ शकेन? तो दूधखुळेपणा होईल! नाही का? आणि त्या साठी मी खुनासारख्या गम्भीर गुन्ह्याची कबुली देईन?”
रुद्राला फारसे विचारण्या सारखे सध्यातरी राघवकडे काही नव्हते. तेव्हड्यात राघवचा मोबाईल वाजला.
राकेश होता.
“सर, संतुकरावांच्या इच्छापत्राची व्हीडिओ जेनुइन आहे. आवाज त्यांचाच आहे!”
” ठीक!”राघवने फोन कट केला.
रुद्राचा बोटांचे ठसे घेऊन तातडीने लॅबमध्ये पाठवले. इतर सोपस्कार आटोपल्यावर. त्याची जबानी लिहून घेतली. त्यात ‘माझ्या हाताने संतुकरावांचा जीव घेतला ‘असे स्पष्ट लिहून त्यावर रुद्राची सही घेतली.
“ऑफिसर, एक रिक्वेस्ट आहे! लवकरच तुम्ही मला कायदेशीर अटक करणार आहेत. मी स्मोकर आहे. अटकेपूर्वी एक सिगारेट ओढण्याची परवानगी —”
राघवने रुद्रास मूक संमती दिली. डोळ्याच्या कोपऱ्यातून जाधव काकांना ‘लक्ष ठेवा’ची खूण केली आणि फोन उचला. वरिष्ठांना रुद्राच्या सरेंडरची माहिती दिली. पुढील लाईन ऑफ अक्शनसाठी तोंडी परवानगी घेतली. फोन संपला तेव्हा रुद्रा राघव समोर बसलेला होता.राघवचा मोबाईल वाजला.
“सर, अभिनंदन आता पाठवलेले फिंगर प्रिंट्स संतुकरावांच्या बॉडीवरील प्रिन्टशी तंतोतंत जुळताहेत! कोठे सापडले?”
“तो माणूस सध्या माझ्या समोर बसलाय!” राघव सावकाश म्हणाला आणि त्याने फोन कट केला.
” रुद्रप्रताप रानडे! यु आर अंडर अरेस्ट!”
“माय प्लेजर! त्यासाठीच आलोय!” रुद्रा कडवट स्माईल देत म्हणाला.
मूर्ख माणूस! राघव मनात म्हणाला.
रुद्राने खिशातून एक छोटेसे पाकीट काढून रागावला दिले.
“हे काय आहे?”
” हि या रुद्रप्रताप रानडेंकडून इन्स्पे. राघवला भेट आहे!”
राघवन ते पाकीट उघडले. त्यात एक आठ गिबिचे कार्ड होते. त्याने ते समोरच्या लॅपटॉपमध्ये इन्सर्ट केले. आणि डोळे फाडून स्क्रीनकडे पहात राहिला. त्यात रुद्रा संतुकरावांच्या खुर्चीमागे उभाराहून त्यांचे तोंड दाबत होता आणि ते हातपाय झाडात होते, मरे पर्यंत!
या रुद्राला फासावर जाण्याची इतकी कसली घाई झाली आहे?
०००
देशभरातीत सगळ्या न्यूज चॅनल्सवर एकच ब्रेकिंग न्यूज होती.’संतुकराव सहदेव यांच्या खुन्यास अटक!’
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply