बदल्याची आग घेऊन मनोहर संतुकरावांचा माग काढत मुंबईत पोहंचला. जमेल त्या प्रकारे त्याने संतुकरावची सखोल माहिती काढली,आणि समोर जे आले ते अविश्वसनीय होते! त्याच्या कल्पने पेक्षा संतुकराव कितीतरी पटीने अधिक धनवान होते! मनोहर एका कुबेराचा एकुलता एक पुत्र होता. आणि ते मेल्या नन्तर एकुलता एक वारस!
‘बदल्या’ बरोबरच त्याला ‘सम्पत्तिची’ पण आस लागली. मूर्खा सारखा त्याने बदल्यासाठी स्वतः संतुकरावाचा खून केला असतात तर, फासावर गेला असता,आणि ती कुबेराची तिजोरी हातची गेली असती! म्हणून त्याने दुसऱ्या करवी मुडदा पडण्याचा घाट घातला. भरपूर चौकशी करून त्याने रुद्राला फिक्स केले. एक तर तो एकडा शिलेदार होता. त्याचे क्रिमिनल रेप्युटेशन उत्तम होते. इतर गल्लीतल्या गुंडां सारखा बेभरवशाचा नव्हता. इतर गुंडां कडून काम करून घेतले असते तर ते स्वस्तात झाले असते ,पण मेलेला म्हातारा श्रीमंत आहे हे कळल्याबरोबर त्यांनी इतर बिग डॉनना ती बातमी विकून टाकली असती! अन मग त्यांनी त्याला आयुष्यभर पिळून काढले असते!
रुद्राला साथीदार नव्हते. तो त्याचे काम गुपचिप करत असे. आणि आता एक अजून मोहरा मनोहरच्या हाती होता. त्याच्या जोरावर तो रुद्रावर मात करणार होता. त्याची योजनाही त्याच्या डोक्यात तयार होतीच! रुद्राचा बंदोबस्त करणे गरजेचेच होते,कारण तो पण मनोहरला ब्लॅक- मेल करू शकणार होता! हे सर्व पक्के झाल्यावरच मनोहरने रुद्राला ‘सुपारी’ दिली होती.
संतुक मुंबईत आला ती वेळच बहुदा अशुभ असावी. रात्री साडेदहाच्या सुमारास, तो दादरला उतरून टॅक्सी ठरवताना,त्याने समोर नजर टाकली. एक तोंडाला फडके बांधलेल्या तरुण, एका म्हाताऱ्यावर पिस्तूल रोखून उभा असलेला त्याला दिसला. तो तरुण चाप ओढण्याच्या बेतात होता. संतुकने कसलाही विचार नकरता जोरात धावत जाऊन त्या पाठमोऱ्या पिस्तूलवाल्यावर झेप घेतली! पण त्याचा अंदाज चुकला. तो हवेत असतानाच त्या पिस्तूलवाल्या तरुणास चाहूल लागली होती. त्याने बेधडक मागे वळून गोळी झाडली! संतुक रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो मारेकरी झटक्यात शेजारच्या बाइकवल्याच्या मागे बसून फरार झाला. आवाजाने जमणार मुंबईच पब्लिक आणि पोलीस राडा करणार होते! सायरन वरून पोलीस येत असल्याचे संतुकला जाणवले. त्याची शुद्ध हरवली.
संतुकने डोळे उघडले. तो एका आलिशान हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये होता.
“व्हेरी गुड! मिस्टर तुम्ही बाजी जिंकलीत! आम्ही तर निराश होत चाललो होतो. “डॉक्टर त्याची नाडी तपासात म्हणाले.
“पण मी कोठे आहे?”
त्या नन्तर त्याला जे कळले ते थोडक्यात असे होते. त्याने झेप घेऊन ज्या मारेकऱ्यांचा लक्ष विचलित केले होते, तो के. ड्यानियल या धनाढ्य व्यासायिकावर हल्ला करणार होता. चहा साम्राज्यातले के. ड्यानियल एक जबरदस्त नाव. गोळी बारगड्यात घुसल्या मुळे आणि वैद्यकीय मदत मिळे पर्यंत रक्तस्त्राव खूप झाला होता. ऑपरेशन करून गोळी काढण्यात आली,पण ऑपरेशन शॉक त्याच्या अशक्त झालेल्या शरीराला सोसला नाही. संतुक कोमात गेला! तब्बल तीन महिने! ड्यानियल उत्कृष्ट हॉस्पिटल मध्ये त्याची ट्रीटमेंट करत होते.
थोडी प्रकृती सुधारल्यावर संतुकने गावाकडल्या मित्राला फोन लावला.
“तात्या, मी संतुक बोलतोय!”
“कोन?संत्या! आबे कूट तडमडला? चार दिसात म्हनून सटकलास अन चार म्हयन्यानं फोन करतुयास?”
“आर तात्या, मी दवाखान्यातून बोलतोय!” आणि मग त्याने सारी कहाणी तात्याला सांगितली.
“मायला ,हित गावाकडं, तू लोकल खाली मेल्याची आवई उठलिया! आमी पंचायतीत दोन मिंट शांतता पाळली लेक तुज्या सटी! अन दूखवट्याच्या ठराव पन पास केलाय!”
“बर मोहिनी कशी आहे?”
“आता कुठाय मोहनी?ती अन तिचा बाप गाव सोडून गेल्यात!”
” कुठं?”
“ठाव नै ! पर तू कवा येनार वापस?”
सुन्न मनाने संतुकने फोन कट केला. फोन कसला,त्याने त्या गावचा सम्बन्धच तोडून टाकला होता. ज्या गावात मोहिनी नाही त्या गावचा समंध ठेवण्यात अर्थ नव्हता!
आपला जीव वाचताना या तरुणाची नौकरीची संधी गमावली गेली,आणि जीव वाचवल्याच्या ऋणाची अल्प परतफेड म्हणून ड्यानियल यांनी संतुकला उटीतला एक पाच एकर टी प्लांटेशन असलेला प्लॉट, प्रोसेसिंग युनिट सह बक्षीस म्हणून देऊन टाकला. मग संतुकने मागे वळून पहिले नाही.
(क्रमशः)
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply