नवीन लेखन...

रूद्रनाथ आणि कल्पेश्वर

पंचकेदारामधील रूद्रनाथ हे चौथे तर कल्पेश्वर हे पाचवे शिवमंदिर. पंचकेदारामधील रूद्रनाथ हा मात्र शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा आहे. विशेषत: अनुसूयापासून तर सर्व वाट चढावाची, निर्मनुष्य! कोणत्याही प्रवासी सोयी-सुविधा या रस्त्यावर उपलब्ध नाहीत. पंचक्रोशीत वस्तीपण नाही. रस्त्यावर काही भागात जंगल तर काही वाट उजाड. रस्ता ही पाऊलवाटेसारखा अरूंद, काही ठिकाणी स्पष्ट तरी काही ठिकाणी अस्पष्ट, तर काही ठिकाणी अदृश्य! यासाठी रूद्रनाथला जायचं असेल तर सोबत अनुभवी माहितगार घेणे आवश्यक आहे. असे माहितगार मंडल किंवा अनुसूयाला उपलब्ध होऊ शकतात. पण हे जरी सर्व असले तरी रूद्रनाथचे दर्शन मनाला अपरंपार आनंद व समाधान देणारे.

उखीमठहून रस्ता चोपता-मंडल गोपेश्वर मार्गे चमोलीला जातो. मंडलच्या थोडे अगोदर अनुसूया या थांब्यापासून एक वाट अनुसूया या वस्तीकडे जाते. पण सर्वप्रथम मंडलहून ४-५ दिवस पुरेल एवढा सर्व शिधा घेणे आवश्यक आहे. कारण पुढे कोणत्याही प्रवासी सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.

अनुसूया थांब्यापासून अनुसूया हे अंतर साधारण ५ कि.मी. आहे. या वाटेवर सोबत असते ती अमृतगंगेची. ही वाट ही सोपी आहे. उभीचढण अशी कुठेच नाही.

अनुसूया वस्तीत प्रवेश करता करता दर्शन होते ते विघ्नहर्त्या गणेशाचे. उघड्यावर असलेली ही अतिशय सुरेख रेखीव पाषाणमूर्ती आपल्याला जणू आशीर्वाद देण्यासाठीच इथे उभी आहे.

साधारण ५०-६० घरांची अनुसूया ही वस्ती. या ठिकाणी अनुसूया देवीचे मंदिर आहे. हा सर्व परिसर म्हणजे अत्रीमुनींची तपोभूमी. सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू व महेश अत्रीमुनींच्या आश्रमी आले व सती अनुसूयेने आपल्या तपोबलाने, पतिव्रत्याच्या बलाने त्यांचे लहान बालकात रूपांतर केले. या तिन्ही बालकांचे एकत्र रूप म्हणजेच दत्तप्रभू! त्यामुळे या स्थानाला दत्तप्रभूंचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. अनुसूया मंदिरात दत्त प्रभू व इतर देवतांच्या प्रतिमा आहेत. आजपर्यंतच्या माझ्या हिमालयातील भटकंतीत मी पाहिलेले हे दत्तप्रभू किंवा दत्तप्रभूंशी संबंधीत असलेले एकमेव मंदीर.

अनुसूया या ठिकाणी राहण्याची, जेवण्याची सोय होते. अनुसूया मंदिरापासून साधारण २ कि.मी. अंतरावर एक अतिशय रमणीय स्थळ आहे, एका घळीसारखे! हे स्थळ अत्रीमुनींचे तपोस्थान म्हणून सांगितले जाते. अमृतगंगेचा प्रवाह इथे प्रपाताचे रूप धारण करतो. सर्वत्र शांतता व त्यात घुमणारा या प्रपाताचा लयबद्ध आवाज, पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची सळसळ, समोर कोसळणाऱ्या प्रपाताचे गोजिरे रूप, मधेच दरवळणारा जंगली फुलांचा परिमळ! हे सर्व पाहिल्यावर वाटू लागते ईश्वर चिंतनासाठी या पेक्षा सुंदर असे दुसरे स्थळ असूच शकणार नाही.

या प्रपाताच्या मागे एक वाट आहे. जवळच बांधलेल्या एका आधाराच्या साहाय्याने प्रपाताच्या मागे जाता येते. हा आणखी एक विलक्षण अनुभव! कोणीतरी सांगते, ‘ही स्फटिकजलाने प्रवाहित होणारी अमृतगंगा म्हणजे अत्रीमुनींच्या कमंडलूतून प्रवाहित होणारे पवित्र जल आहे.’

खरंच हे स्थळ म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. या अनुभवातून बाहेर खूप अवघड आहे. अनुसूया व हा सर्व परिसर जडीबुटीने अतिशय समृद्ध आहे. इथले रहिवासी अभिमानाने सांगतात, “तुम्ही इथल्या झऱ्याचे, प्रवाहाचे पाणी कितीही प्या ते जडीबुटींच्या मुळातून, खोडातून, पानातून आले आहे. त्यात औषधी गुण आहेत. तुम्हाला काहीही होणार नाही.”

अनुसूया ते रूद्रनाथ हे साधारण १७ कि.मी. अंतर आहे. त्यापैकी पहिले १२ ते १३ कि.मी. अंतर हे पूर्ण चढणीचे आहे.

भल्या पहाटे अनुसूयेहून चालायला सुरुवात करायची. अमृतगंगेचा प्रवाह ओलांडला की मग चढावाची वाट सुरू होते. हा सर्व उभा चढ आहे. रस्ता असा नाहीच. २ ते ३ फूट रूंदीची पाऊलवाट, काही ठिकाणी ती पण स्पष्ट होत नाही. रस्ता पूर्ण घनदाट जंगलातून जाणारा! मनुष्य वस्तीचे नामोनिशाण नाही. त्यामुळे मनावर एक विलक्षण दडपण येऊ लागते. पाय चालत असतात, शरीर थकत असते पण चढाव संपत नसतो. कधी घनदाट वनराई तर कधी उजाड वाट! या वाटेवर पाणी पण फारसे उपलब्ध नाही. त्यामुळे सोबत घेतलेले पाणी जरूर वाटेल तेव्हाच काटकसरीने प्यायचे. आता वृक्षराजी कमी होऊ लागते. झाडे साधारण ८,५०० ते १०,००० फूट उंचीपर्यंत वाढतात. म्हणजे साधारण ९००० फूट उंची आपण गाठली असावी, असा अंदाज करता येतो.

आणि क्षणभर मी थबकलोच! माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. समोर हिरवळीने नटलेलं एक सुरेख कुरण पसरलं होतं. रंगीबेरंगी फुलं त्यावर नाचत होती. आजूबाजूला बर्फाच्छादित शिखरं चमकत होती. मध्येच उनसावलीचा खेळ सुरू होता. एक शुभ्रधवल प्रपात जमिनीकडे झेपावत होता आणि जमिनीवर साठलेल्या बर्फात अदृश्य होत होता. समोरच्या कुरणावर ७-८ हरणं नाचत होती. बागडत होती. उड्या मारत होती. हळूच जमिनीला तोंड लावत तर झटकन मान उचलून कान टवकारून, बावरलेल्या नजरेने आजूबाजूला पहात! त्यांना सुगावा लागला. एका बाजूकडे ती झेपावली आणि पाहता पाहता ती अदृश्य झाली. त्या दिशेकडे मी पाहतच राहिलो. आता त्या हरणांचा कोणताही मागमूस दिसत नव्हता. मी काय पाहत होतो ते माझे मलाच समजत नव्हते.

या पुढचा मार्ग मात्र रूक्ष व उभ्या चढणीचा आहे. पण उंचीमुळे वातावरणात एक सुखद गारवा अनुभवायला मिळत असतो. एखाद वेळेस उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे दम लागतो. अशा वेळी २-३ मिनीटं शांत उभं रहायचे व मग सावकाश चालू लागायचे. हिमालयात अतिउंचीवरील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दम लागू लागल्यास कापूर हुंगण्याने खूप आराम मिळतो.

शेवटी चढण संपते. या टोकाला ‘नागला पास’ म्हणतात. पास म्हणजे खिंड. नागला पासची उंची साधारण १०,५०० फूट असावी. इथून हिमालयाच्या पर्वतराजींचे फार सुंदर दर्शन होते, विशेषत: नंदादेवी पर्वतशिखराचे! नंदादेवी हे उत्तराखंड राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची आहे ७८२८ मीटर्स. एकेकाळी हे जगातील सर्वात उंच शिखर मानले जात होते.

‘नागला पास’ ओलांडल्यावर उजवीकडची वाट पानार गुंफेकडे तर डावीकडची वाट रूद्रनाथकडे जाते. अजूनही रूद्रनाथ ५ कि.मी. दूर आहे. पण ही वाट मात्र बरीचशी सपाटीची आहे. दुपारचे साधारण ३ वाजले असावेत. सकाळी साडेपाच वाजता सुरू केलेली चाल संपलेली नाही. अजून दीड दोन तास चालायचं आहे. आकाशात ढग जमू लागले. वारा वाहू लागला. पाहता पाहता वाऱ्याचा जोर वाढला. चालण्याचा वेग वाढवला. दूरवर रूद्रनाथचे मंदिर दिसू लागले. हिमालयात दुपारनंतर हवामान कधी बदलेल याचा भरवसा देता येत नाही. थोड्या वेळात हवामान बदलते आणि मग वारा, पाऊस, गारा, बर्फवृष्टी! पावसाचे थेंब उडू लागले. जवळ कोणताच निवारा दिसत नव्हता. पावसाचा जोर वाढला. हलकेच गारा पडू लागल्या. आता पावसाबरोबर गारा पडू लागल्या. एक एक गार तर लिंबाच्या आकाराची! गारांचे फटके बसू लागले. काय करायचे तेच समजत नव्हते. गारांचा मारा कसा चुकवायचा ते उमगत नव्हते.

‘रूद्रनाथ!’ पंचकेदारमधील चौथा केदार! अतिशय अवघड जागेवर रूद्रनाथाचं मंदिरं आहे. मंदिर असं नाहीच! एक छोट्या घरासारखी जुनी वास्तू! जवळच २ ते ३ खोल्या. या खोल्या म्हणजे धर्मशाळा! खोल्यात गवत पसरलेलं! मध्ये तीन दगड ठेऊन मांडलेली चूल आणि एका कोपऱ्यात जळणासाठी ठेवलेली लाकडे. या पलीकडे या ठिकाणी कोणतीही सुविधा नाही. पाणीसुद्धा अर्धा किलोमीटर दूर! डोंगर उतारावर मंदिर असल्याने सपाटीची जागा अशी कुठेच नाही. जवळपास मनुष्यवस्तीचा कुठेही नामोनिशाण नाही.

रूद्रनाथ नावाप्रमाणे रौद्र वाटतो. रूद्रनाथाची उंची ३५८० मीटर्स आहे. या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्यावर चांदीचा मुखवटा घातलेला असतो. केदारखंडात सांगितले आहे की या ठिकाणी भगवान विष्णूंचं तसेच अनेक तीर्थांचं वास्तव्य आहे. जेव्हा अंधक दैत्याने देवांना पिडले तेव्हा सर्व देव या ठिकाणी भगवान शंकराला शरण आले. मंदिरात गणपती आणि गौरीशंकराच्या मूर्त्या आहेत. तसेच भूमियादेवता आणि क्षेत्रपाल जारव यांच्या धातूच्या मूर्त्या आहेत. थंडीच्या दिवसात रूद्रनाथची पूजा गोपेश्वरला होते. रूद्रनाथची ही सर्वांत अवघड ठरणारी यात्रा मात्र सर्वात रोमांचकारी आहे.

शिवाचे पाचवे रूप, ‘कल्पेश्वर’. या ठिकाणी जाण्यासाठी रूद्रनाथहून प्रस्थान करायचे. आता मुक्कामाचं ठिकाण म्हणजे ‘डुमक’. रूद्रनाथ ते डुमक हे अंतर जवळजवळ २२ कि.मी. आहे. डुमकला जाण्यासाठी एक जवळचा रस्ता आहे पण तो रस्ता अवघड आहे. त्यामुळे सहसा कोणी त्या रस्त्याचा वापर करीत नाही. परत कालच्याच वाटेने ‘नागला पास’पर्यंत यायचे व मग ‘नागला पास’ उजव्या हाताला ठेवून समोरची पानार गुंफेकडे जाणारी वाट पकडायची. आता मात्र या पुढची वाट पुष्कळशी उताराची आहे. साधारण ३ कि.मी. चालल्यावर येते ‘पानार गुंफा!’

ही एक छोटीशी सपाटीची हिरवीगार जागा आहे. नाव जरी गुंफा असले तरी प्रत्यक्ष गुहा अशी या ठिकाणी काहीच नाही. या ठिकाणी एक प्रचंड शिळेखाली असलेल्या छोट्याशा मोकळ्या जागेत एक शिवलिंग आहे. काही वेळा साधू या ठिकाणी राहतात. या अशा निर्जन जागी हे लोक एकाकी राहतात कसे? यांना भिती कशी वाटत नाही? एखादी अडचण आल्यास, गरज पडल्यास हे लोक काय करतात? असे अनेक प्रश्न मनात येतात. पानार गुंफेहून एक वाट सग्गरकडे तर दुसरी डुमककडे जाते.

आता उभ्या उतरणीचा रस्ता सुरू होतो. काही ठिकाणी पाऊलवाट तर काही ठिकाणी अर्धवट बांधलेल्या पायऱ्यांसारखी वाट! डोंगरात चढ चढताना जरी दमायला झाले तरी सोपं वाटतं पण असे उभे उतार उतरणं अवघड वाटतं. काही वेळाने आजूबाजूला चीड, देवदार, भूर्जपत्र, चेस्टनट, वॉलनट, होडोडेड्रॉनची वृक्षराजी दिसू लागते. दूरवर कुठेतरी घरे, शेते दिसू लागतात. दोन दिवसांचा एकांत व एकाकीपणा संपल्याचे मनाला जाणवू लागते. एकटेपणाचा मनावर आलेला ताण निवळू लागतो आणि काही वेळातच येते ‘तोलीतालाब’ हे स्थळ! हे स्थळ म्हणजे हिमाचलमधील खज्जियारची आठवण करून देणारं स्थळ आहे. सर्व बाजूंनी वृक्षराजीने दाटलेले, उंच पर्वतशिखरांनी वेढलेले आणि मधेच खोलगट असलेलं हे स्थळ! या मधल्या खोलगट जागी पावसाचं, झऱ्याचं पाणी साठून एक छोटसं तळं निर्माण होतं. हिरवळीच्या कुशीत लोळणाऱ्या या तळ्याचं पाणी आजूबाजूला उभ्या असलेल्या वृक्षराजीकडे पाहत असते. काठावर उमललेल्या फुलांशी खेळत असते. वाऱ्याचं संगीत ऐकत, सूर्यप्रकाशात चमकत असते. अशा स्थळाचं सौंदर्य कोणालाही मोहित करून टाकतं.

शेवटी डोंगराचा पायथा येतो. अवखळ, नाजूक छोटीशी मैनागाड नदी या ठिकाणी आपली वाट पाहत असते. मैनागाड नदी ओलांडली आणि परत २ ते ३ कि.मी.चा चढणीचा रस्ता चढला की येते ‘डुमक’ ही वस्ती. डुमकं साधारण १०० ते १५० घरांची वस्ती आहे. वीज, रेडियो इत्यादी आधुनिक सुविधांनी डुमकला स्पर्श केलाय. लोकांचा उद्योग म्हणजे शेती आणि गुरं पाळणं. डुमकला राहण्याची सोय होते.

डुमकनंतर शेवटचा मुक्काम म्हणजे ‘उरगम’. हे सुद्धा १५-१६ कि.मी.चे अंतर आहे. डुमकनंतर ४-५ कि.मी. अंतरावर येते ‘कलगोट’ ही वस्ती. डुमक ते कलगोट हा रस्ता सपाटीचा आणि सुरक्षित आहे. कलगोटनंतर मात्र चढणीचा रस्ता सुरू होतो. या पदभ्रमंतीतील ही शेवटची चढण! संपूर्ण वाटेवर जंगल पसरलंय. रस्त्याच्या कडेला उगवलेली कोब्रालिली आणि इतर फुलं खुणावत असतात तर मध्येच जंगली गुलाबांचा सुगंध दरवळत असतो. गार वारे शिणवठा दूर करत असतात. प्रसन्न मनाला सुखाची अनुभूती होत असते. शेवटी ही चढण संपते आणि समोर उरगम दिसू लागतं.

उरगमसुद्धा १५० ते २०० घरांची वस्ती आहे. आधुनिकतेचे वारे गावात वाहू लागले आहेत. वीज, रेडिओ, एखाद्या घरात टेलीव्हिजन, काही घरांवर लावलेले सौरघट पाहिल्यावर आपली ही निसर्गयात्रा संपल्याची खूण जाणवायला लागते. आजपर्यंत विसरलेल्या काळज्या, विवंचना मनाला स्पर्श लागतात. उदासिनतेची सावली पुढे सरकू लागते.

उरगमपासून कल्पेश्वर २ कि.मी. दूर आहे. हा रस्ता पूर्ण सपाटीचा आणि सुरक्षित आहे. एक सुरेख प्रपात कल्पेश्वर मंदिराचं स्थान आपल्याला सांगत असतो.

‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’ कल्पेश्वरचे मंदिर एका प्रचंड शिळेखालच्या मोकळ्या जागेत आहे. मंदिर असं नाही तर घरासारखी रचना आहे. या ठिकाणी पाषाण शिळेच्या भागाची शिवाच्या जटेची प्रतिमा म्हणून पूजा केली जाते. मंदिराच्या परिसरात शिवपार्वतीच्या आणि इतर देवतांच्या प्रतिमा आहेत. मंदिराजवळ उरगम नदीचा एक सुरेख प्रपात आहे.

उरगमपासून हेलंग हे गाव ९ कि.मी. दूर आहे. हा रस्ता पूर्ण उताराचा आणि सुरक्षित आहे. आता रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू होते. हेलंगपाशी अलकनंदेचा पूल ओलांडल्यावर आपण ऋषीकेश-बद्रीनाथ या मुख्य रस्त्यावर हेलंगला येतो आणि आपली पंचकेदारची यात्रा संपते. नजर वारंवार आलेल्या वाटेकडे जात असते. ती पर्वतशिखरे, गगनचुंबी वनराई, शुभ्रधवल प्रपात आपल्याला खुणावत असतात. आपलं काहीतरी हरवलेलं असतं आणि काय हरवलं आहे तेच आपण शोधत असतो.

– प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..