(टीप:वैद्यकीय प्रॅक्टिस करताना भेटणाऱ्या वेगवेगळ्या पेशंटचे स्वभाव मनोरंजनात्मक रीतीने सादर करण्याचा केलेला एक छोटा प्रयत्न. पेशंट आमच्यासाठी मायबाप आहेत.)
अभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट….
हाय ब्लड प्रेशर, हाय शुगर याप्रमाणे रिपोर्ट मध्ये भरपूर गडबड दिसत असताना सुद्धा पापा आने के बाद, मम्मी बहार गाव गई है यासारख्या सबबी देऊन आजाराची तीव्रता फक्त डॉक्टरला जाणवेल अशा पद्धतीने कमी करून राम भरोसे असणारे पेशंट…
स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जाऊन भरपूर फी देऊन स्वतःचे समाधान न झाल्यामुळे फॅमिली डॉक्टर कडे येऊन त्याचा भेजा फ्राय करून खाणारे अति हुशार पेशंट…
रात्री साडेबारा वाजता फोन करून डॉक्टर दवाखान्यातच आहे का? याची अतिशय पोट तिडकीने विचारपूस करणारे पेशंट…
कोणताही आजार झाला नसताना सुद्धा केवळ ऐकीव माहिती वरती स्वतःच्या मनाची घालमेल करून, संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरून, मित्रमंडळी,शेजारी अशा सर्वांचे मत आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकदम शेवटी डॉक्टरांचे मत घेण्यासाठी आलेले बिलंदर पेशंट….
“हमारे फॅमिली डॉक्टर बाहर गये है,इसीलिए आपके पास आये है “म्हणजे दुसरा पर्याय नाही म्हणून तुमच्या दवाखान्यात आलो असे सांगून समोरासमोर डॉक्टरांचा सौम्य आणि मधुर शब्दांमध्ये अपमान करणारे पेशंट…
डॉक्टर केबिन मध्ये बसलेले असताना वेटिंगमध्ये उभे राहून फोनवर “वाघकडे आलेलो आहे” अशा प्रकारे (डॉक्टर पेक्षा वयाने लहान असलेली ही पोर ही) डॉक्टरला एकेरी उद्देशून डॉक्टरची पद्धतशीर पणें काढणारे पेशंट….
गर्दीच्या वेळी वेटिंग मध्ये बसलेले असताना सदैव डॉक्टरकडे बघून हास्य करून डॉक्टरला असे दर्शवतात की मी तुमच्या अतिशय जवळचाच नव्हे तर घरचाच मेंबर आहे आणि मला ताबडतोब चेक करा….. असे कलाकार पेशंट…
एखाद्या आजारासाठी दिवसातून दोन वेळा गोळ्या प्रिस्क्राइब केलेल्या असताना सुद्धा आराम पडला नाही म्हणून दिवसातून तीन ते चार वेळा डोस खाऊन अघोरी उपाय करणारे पेशंट…
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हातून आल्यानंतर डॉक्टरला आपली लक्षणे सांगताना एकेक शब्दानंतर हुश्श्श….हुश्श्श असा मोठ्याने आवाज करणारे पेशंट. त्या मुखातून आलेल्या हवेची आणि आवाजाची तीव्रता इतकी असते की तो ऐकल्यावर एखाद्या वाफेच्या इंजिनाचाच प्रेशर वॉल लूज झाल्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही…
ब्लड प्रेशर डायबिटीस सारख्या आजाराच्या गोळ्या डॉक्टरला विचारल्याशिवाय बंद करू नका,असे बजावून सांगितले तरीही ठराविक दिवसांनी गोळ्या बंद करून टाकणार आणि पुढच्या खेपेला आल्यावर डॉक्टर तुम्हीच तर गोळ्या बंद करायला लावल्या होत्या असे म्हणून चोराच्या उलट्या बोंबा मारणारे पेशंट…
सिटी बसच्या दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर तिकीट जसे रस्त्यावर फेकून द्यायची पद्धत आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन म्हणजे दवाखान्या बाहेर पडल्यावर फेकून द्यायची एक चिठ्ठी आहे अशा पद्धतीने वर्तन करणारे बहाद्दर पेशंट. आणि आराम न पडल्यानंतर,”डॉक्टर आपने दिया हुआ चिट्ठी गूम गया | प्लीज वापस लीखके दीजिए” अशी दया याचना करणारे याचक पेशंट…
आजार बरा होऊन डॉक्टरांनी सांगितले आहे की औषधाची गरज नाही. तरीही डॉक्टर आणखी थोडे औषध द्या म्हणजे उरला सुरला आजाराही निघून जाईल असे बोलणारे भोळे भाबडे पेशंट…
दवाखाना बंद होण्याच्या वेळी अतिशय जलद गतीने एखाद्या लहान मुलाला पाठवून “डॉक्टर जाऊ नका, एक पेशंटला घेऊन येतो आहे”असे सांगून कमीत कमी 20-25 मिनिटांनी अवतीर्ण होणारे आणि डॉक्टरचा वेळ वाया घालणारे महान पेशंट…
केरोसीन (क्रोसिन), सोनियाग्राफी (सोनोग्राफी), यासारखे अतिशय विनोदी शब्द वापरून डॉक्टरांचाच शब्दकोश वाढवणारे, मनोरंजन करणारे विनोदी पेशंट….
सरसराहट हो रही है, नटई जल रहा है ,झनझनाहट हो रही है,गॅसवा बन रहा है, उसी ( इंजेक्शन) दे दो, वा वां (काही नाही), यासारखे अखंड भारत वर्षामधील वेगवेगळ्या राज्यांमधील शब्दप्रयोग करून डॉक्टरांनाच भ्रमित करुन सोडणारे पेशंट…
घरात चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणे, लग्न वगैरे मंगल कार्य होणे, अपत्य प्राप्ती होणे यासारख्या अनेक मंगल प्रसंगी घरातल्या व्यक्तीप्रमाणेच डॉक्टरांची आठवण काढून आपल्या आनंदात डॉक्टरांना सहभागी करण्यासाठी मिठाई घेऊन हसतमुख आनंदाची बातमी देणारे दिलदार पेशंट..
डॉ. सुनिल वाघ, कांदिवली पश्चिम.
5/04/2023.
Leave a Reply