रुई हुनही हलके ते कर्ण
सूर्यापेक्षा प्रिय तो उजळ वर्ण
पण दोन्हींची जेव्हा फिरते मती
घात होतो!
निष्ठा कारणे न सोडून द्यावी
प्रतिष्ठे पायी चाल न बदलावी
कनिष्ठा बुद्धी न चेपावी
साथ तुटती!
अर्थ–
रुई हुनही हलके ते कर्ण, सूर्यापेक्षा प्रिय तो उजळ वर्ण, पण दोन्हींची जेव्हा फिरते मती, घात होतो!
(जगात सर्वात हलकं काय असेल तर तो कापूस नाही तर माणसाचे कान असतात. केवळ कोणाचे तरी ऐकून त्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणाविषयी मत बनवू नये. आजच्या जगात सौंदर्य म्हणजे एका स्त्री चं दिसणं यापूढे दुसरे ते काय असते? असंच झाले आहे. निसर्गाच्या इतक्या सुंदर छटा, इतकी दृश्य सुंदर असतात पण माणसाला त्यापेक्षा शारीरिक सौंदर्य जास्त प्रिय वाटते कारण त्यामागे अंतरंगातली वासना लपलेली असते. पण हलके कान असोत किंवा असे क्षणिक सौंदर्य असो डोईवर झाले की त्यातून निष्पन्न फक्त वाईटच घडते. )
निष्ठा कारणे न सोडून द्यावी, प्रतिष्ठे पायी चाल न बदलावी, कनिष्ठा बुद्धी न चेपावी, साथ तुटती!
(एखादया व्यक्तीवर किंवा विचारांवर निष्ठा असेल तर ती ऐऱ्या गैऱ्याच्या सांगण्यावरून सुटू देऊ नका. म्हणजेच हलक्या कानाचे होऊ नका. ज्यावर निष्ठा आहे त्या पाशी जाऊन ते बोलून मग ठरवा पुढचे पाऊल काय टाकायचे. इमेज बिल्डिंग साठी कोणतेही वाईट अथवा चुकीचे कृत्य करू नका कारण जे इमेज बनवतात तेच वेळ प्रसंगी ती इमेज मिटवायला काही क्षण पुरेसे ठरू शकतात. म्हणून प्रतिष्ठे पायी चुकीचे निर्णय घेऊ नये त्यातून प्रतिष्ठा पणाला लावून तर नाहीच नाही. माणुसकी हीच प्रतिष्ठा असावी मग त्यापुढे सगळे फिके पडते. आपल्याहून कमी वयाच्या किंवा लहान असलेल्या व्यक्तीला किंवा हुद्द्यावरच्या व्यक्तीला कमी लेखू नका किंवा त्याची बौद्धिक क्षमता तपासू नका कदाचीत तो ज्ञानाच्या बाबतीत आपलाच गुरू निघावा. या तिन्ही गोष्टी जर न घडल्या तर अशा वागण्यामुळे आपली चांगल्या माणसांबरोबरची साथ सुटायला वेळ लागत नाही.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply