श्रीमती मेधा खोले या उच्चशिक्षित, उच्च सरकारी पदावरील महिलेने, त्यांच्या स्वयंपाकीन बाईंनी त्यांची जातीवरून फसवणूक केल्याची विचित्र तक्रार पोलिसांत दाखल केल्याची बातमी व त्यानंतर नेहेमी प्रमाणे सोशल मिडीयावर ‘बायपोलर’ चर्चा वाचली. ‘जात’ हा विषय आजच्या अत्याधुनिक जगातही आपल्या देशात किती सर्वाधिक महत्वाचा आहे हे वाचून जर काही वाटलं असेल, तर लाजच..! आपला देश अनेक बाबतीत इतर जगापासून वेगळा आहे असं आपण सर्वच मानतो. याबाबतीत तर तो अगदी एकमेंवाद्वितीय..!
वैयक्तिक पातळीवर कोणी काय करावं, हे स्वातंत्र्य घटनेने सर्वांनाच दिलेलं आहे. त्याचबरोबर तसं वागताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असंही घटनेनेच सांगीतलं आहे, याचा विसर आपल्या सर्वांना सर्वचबातीत पडतो. व्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ आपण आपल्याला हवा तसा लावतो, मग इतरांचं काय होईल ते होवो. हे असं वागणं केवळ ‘जात’च नाही, तर सर्वच पातळ्यांवर पाहायला मिळतं.
श्रीमती खोलेबाईंची बाजू घेताना अनेकांनी घटनेने दिलेल्या ‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या’ अधिकाराची आठवण करून दिली आहे. खोले बाईंनी आपल्या घरात कसं वागावं, कुणाला घ्यावं वा न घ्यावं हा ‘व्यक्ती’ म्हणून सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, हे मान्य. परंतू आपण सर्व हे विसरतो, व्यक्ती हा समाजाचा भाग असतो आणि अशा अनेक व्यक्ती मिळून समाज बनतो. सहाजिकच व्यक्तीच्या बऱ्या-वाईट वागण्याचा संपूर्ण समाजावर परिणाम होत असतो. म्हणून तर समाजसुधाराची सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी लागते असं आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्वच समाजसुधारकांनी सांगून ठेवलंय आणि ते ही स्वत: तसे वागलेत. ‘जाती’भेद नष्ट करण्यासाठी उभं आयुष्य वेचलेल्या या सर्वच समाज सुधरकांचे सर्वच कष्ट वाया गेलेत, हे यावरून समजतं किंवा त्या वेड्यांना आपला पाखंडी समाज कळलाच नाही, असा निश्कर्ष काढावा लागतो. नाही म्हणायला एक झालं, जातीभेद नष्ट करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या त्यांना मात्र आपण त्यांची त्यांची जात शोधून त्या त्या जातीशी जखडून ठेवलं. टिळक ब्राम्हणांचे झाले, फुले माळ्यांचे झाले तर शाहू महाराज मराठ्यांचे..! ‘हेचि फळ का मम तपाला’ असाच आक्रोश ते महात्मे वरून करत असतील या विषयी माझ्या मनात तरी शंका नाही.
शिक्षणाने जात जाईल असं म्हटलं जात होतं, पण आजच्या २१ साव्या शतकात भारतातलं हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. माणसं जस जशी शिकतायत, परदेशात जाऊन जग पाहून, अनुभवून येतायत, तस तशी माणसं अधिकाधिक जाती केंद्रीत होतायत, असं माझं निरिक्षण आहे. मुखाने जातीभेद नष्ट करायचा जाहीर जप करायचा, पण घरात मात्र कट्टरतेने जात पाळायची आणि घरातल्या मुलांवर स्व-जातीचे संस्कार करायचे, हेच बहुतेक ठिकाणी चाललेलं दिसेल. जात रुजते आणि माजते ती अशीच जन्मापासून. वैयक्तीक स्तरावर माझाही अनुभव खोले-यादव यांच्यापेक्षा वेगळा नाही. अर्थात सर्वच माणसं, कोणत्याही जातीची असोत, असं वागतात असं नाही. परंतू काही लोकांच्या अशा संकुचित वागण्याने आणि त्याचं समर्थन करणारांमुळे ती संपूर्ण जात बदनाम होते आणि उर्वरीत समाजापासून तुटली जाते, याचा विचार व्यक्तीस्वातंत्र्याच्या नांवावर काहीही केलं चालतं असं मानणारांनी करायला हवा, नव्हे, ती त्यांची सामाजिक जबाबदारीही असते. श्रीमती खोलेबाई उच्चपदावरील सरकारी अधिकारी आहेत. त्याच्या वागण्याचा बरा-वाईट परिणाम समाजावर होत असतो, याचं भान त्यांनी अशा प्रसंगात बाळगणं अशावेळी अधिक आवश्यक ठरतं.
नुकतच घडून गेलेलं भाऊ कदम प्रकरण असो किंवा आताच खोले बाईंचं प्रकरण असो, यावरून समाजात जातीभेद किती खोलवर रुजून रक्तात मिसळला आहे याचंच प्रत्यंतर येतं. जातीभेद जावा असं सार्वजनिकरित्या सर्वच मान्य करतात पण त्याच पोटतिडीकेने वेयक्तीक स्तरावर तो कटाक्षाने पाळतानाही दिसतात, अशा समाजाचं विश्लेषण काय करावं हेच कळत नाही. खोलेबाईंकडे काम करत असलेल्या त्या स्वयंपाकीन बाई खोटं बोलल्या ह खरं असलं, तरी हा प्रकार आपापसांत सामंजस्यानेही मिटवता आला असता, पण तसं न करता याची तक्रार पोलिसांत करून नेमकं काय साध्य करायचं होतं किंवा झालं, हे ही कळत नाही. काही झालं असेल, तर समाज किती दुभंगला गेलाय हेच विदारक जुनं चित्र नव्याने समोर आल्या. असा समाज जेंव्हा महासत्ता होण्याच्या गप्पा मारतो, तेंव्हा त्या गप्पा किती पोकळ आहेत, हेच सत्य पुन्हा पुन्हा समोर येतं.
जातीभेद नष्ट व्हावा असं खरंच जर कुणाला वाटत असेल, त्याची सुरुवात प्रथम स्वत:पासून करायला हवी. जातीचा अभिमान, दुराभिमान कटाऱ्क्षाने टाळायला हवा व तसे संस्कार घरातल्या लहानांवरही करावा. सोवळ्याचा संबंधं स्वच्छतेशी असतो, जातीशी नाही हे आपल्याला कधी कळणार काय ठावूक?
अवकाशात नवनविन उपग्रह सोडून नवनविन विक्रम रचणारा भारत, त्याच देशातील भारतवासीयांच्या मनातील स्व-‘जाती’बद्दलचा ‘ग्रह’ आणि परजातींचा ‘पूर्वग्रह’ कसा काय काढून टाकणार हेच कळत नाही..जात-धर्म-पंथ अशा अनेक ध्रुवांना पोटात घेऊन वाटचाल करणारा मेरा भारत खरंच महान आहे का, या विचार प्रत्येकाने करण्याचा कधी नव्हे तेवढी आज गरज आहे..!
बीडच्या सूर्यकांत डोळसे,पाटोदा यांच्या कवितेतील काही ओळी उधृत करतो आणि थांबतो,
जातीच्या मूळाशी
जाती-जातीचे गोत्र असते !
’ रूजवा आणि माजवा ’
हे जाती-जातीचे सूत्र असते !!
हे रुजवण आणि माजवणं समाजातील प्रत्येकाने थांबवसं पाहीजे, तरच आपण पुढील पन्नास-शंभर वर्षांत यातून बाहेर पडू अन्यथा आपल्या देशाचे पडलेले परंतू न दिसणारे तुकडे आहेत, ते नकाशावरही स्पष्ट दिसू लागतील..असं होणं टाळणं आपल्याच हातात आहे.
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply