तीन दगडांवर चूल करून सुरू केलेला लांबोटी चिवडा साता समुद्रापार ….
१९८०च्या दशकात तीन दगडांवर चूल करून सुरू केलेला लांबोटी चिवडा आणि चहाचा व्यवसाय एका संघर्षातून त्यांनी पुढे नेला आणि यशाची शिखरे गाठली. अनेक निराधार मुलांच्या आधारवड बनल्या होत्या रुक्मिणीताई.
रुक्मिणी खताळ यांनी तयार केलेली शेंगा चटणी, डिंक लाडू, मका पोहे चिवडा मुंबई, पुणे, दिल्लीच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध झाला आहे. हॉटेल ‘जय शंकर’च्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या विविध सोलापुरी खाद्यपदार्थांची चव सर्वदूर पोहचवली. लांबोटी या त्यांच्या गावाला रुक्मिणी खताळ यांच्या चिवड्याने ओळख मिळवून दिली. १९८०च्या दशकात तीन दगडांवर चूल करून सुरू केलेला लांबोटी चिवडा आणि चहाचा व्यवसाय एका संघर्षातून त्यांनी पुढे नेला आणि यशाची शिखरे गाठली.
मराठवाड्यातील असंख्य आमदार, खासदार आणि मंत्री लांबोटी चिवड्याची चव चाखल्याशिवाय पुढच्या प्रवासाला जात नव्हते. हॉटेल हा व्यवसाय असला तर पशुधन ही त्यांची संपत्ती होती. शेतकऱ्यांची जनावरं कत्तलखान्यात जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असायचा. म्हणून ऐन दुष्काळात स्वतःच्या शेतातला सतरा एकर ऊस दुसऱ्याच्या जनावरांना मोफत वाटण्याची दानतही या महिला शेतकरी असलेल्या रुक्मिणी खताळ यांनी दाखवली होती. दिवसातून चारवेळा जनावरांची देखभाल करण्यात रुक्मिणीताईंनी कधी खंड पडू दिला नाही. कष्ट हेच भांडवल आहे असं रुक्मिणीताई नेहमी सांगायच्या.
अनेक निराधार मुलांना आधार देण्याचे कामही रुक्मिणीताई यांनी केले होते. त्यांच्या या अफाट कार्याची दखल घेऊन राज्य तसेच राज्याबाहेरील अनेक नामवंत संस्थांनी त्यांनी मानाचे पुरस्कार देऊन गौरविले होते. बारामती येथील शारदा प्रतिष्ठानचा ” आदर्शमाता” पुरस्कार, आयकॉन ऑफ सोलापूर पुरस्कार, पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना यशस्वी उद्योजिका पुरस्कार देण्यात आला होता. यशस्वी महिला उद्योजिका आणि आदर्श माता असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले होते.
— संतोष द पाटील
Leave a Reply