ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी साठी त तृप्तता मोठी!॥
मित्र—मैत्रिणींनो , सप्रे म नमस्कार !
काल शनिवार ०१ मार्च २०२५ : न कर्त्याचा वार शनिवार ही म्हण खोटी ठरवणारी कालची आमची संध्याकाळ ते जवळजवळ मध्यरात्र खूप सुंदर व्यतित कशी झाली ? ~ हे तुम्हाला सांगून तुम्हां सर्वांना आमच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणं यासाठी हा सारा लेख प्रपंच !
चला , नमनालाच घडाभर तेल न जाता विषयाला सुरुवात करतो…..
मंडळी , माझं माहेर आमची मुंबई शहरातलं एक छानसं सुंदरसं टुमदार उपनगर : गोरेगांव ( पूर्व ).तिथल्या रेल्वे फाटकाजवळ गोगटे वाडीमधे आमची एक छान शाळा आहे , शिशूवर्ग ते इयत्ता चौथी — बैराम जीजीभाॅय शाळा आणि इयत्ता पाचवी ते दहावी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर ! इसवी सन १९८० ला आम्ही जवळपास १२० विद्यार्थी वर्गमित्र—मैत्रिणी ( दोन तुकड्या मिळून ) १० वी परिक्षेला म्हणजे शालान्त परिक्षेला बसलो आणि आता यावर्षी म्हणजे २०२५ सालामधे तेंव्हा ( कमीत कमी ) १५ वर्षांचे असलेले सगळे साठी चे झालो किंवा यावर्षी होऊ ! त्यामुळे यावर्षी एक संमेलन करूया अशी एक टूम वर्गातील मित्र—मैत्रिणींच्या मनात आली , आणि महाराजा , त्याच संकल्पनेचा पाठपुरावा करत काल ती संकल्पना आम्ही २८ जणांनी प्रत्यक्षात उतरवली ना ! अंधेरीच्या चकाला येथील हाॅटेल साई पॅलेसमधे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि रंगतदार संध्याकाळ सुरु झाली…..
७.३० पासून जमायचं होतं , सर्वात आधी तळेगांवहून श्रेयस ६.१५ लाच हाॅटेलला पोचला , नंतर चित्रा मंत्री मिस्त्री , निलिमा लवंदे कामत , मुकुंद होंकण असे पोचले आणि वर डायनिंग हाॅलमधे जाण्याऐवजी खाली पहिल्या मजल्यावर रेस्तराॅंमधे बसले.मी जरा बाहेरून येणार असल्याने पावणेसातला वर पहिल्या मजल्यावर धोकटी ठेवून श्रेयसला फोन लावला व मग मीही खाली आलो.जरा वेळ या चौकडीला ( चांडाळ नाही हां , तोंडाळ म्हणा फार तर आमच्या मित्र—मैत्रिणींना ! ) भेटून मग मुझे तुमसे कुछभी ना चाहिये , मुझे मेरे हाॅल पे छोड दो! असं मुकेशचं गाणं ( मनोमन ) गुणगुणत हम पाॅंच वर हाॅलला आलो….. ( तसं तर गेले ५—७ दिवस सर्दी ÷खोकला असल्यामुळे मी माझ्या दर्द नाही तर सर्दभर्या आवाजात मुकेशचं हे गाणं मोठ्याने जाहीररित्या म्हणणारा ऐकमेव सुयोग्य गायक होतो म्हणा ! पण जमलेले सगळेच लगेच परत जाऊ नयेत यासाठी तो मोह आवरला…..)
तर मंडळी , ७—७.१५ पासून एक एक जण यायला लागला / लागली ….. शाळेची पहिली घंटा होण्यापूर्वी असतो तसा वर्गातील मित्रमैत्रिणींची एकमेकांना बर्याच वर्षांनी भेटल्यामुळे गळाभेट , चौकश्या , हास्यविनोद याला अगदी उधाण आलं ! सगळे मराठी असूनही कुठल्याही ठिकाणाची शांती धुळीला मिळवण्याची गुजराथी Monopoly break करून आम्ही सगळ्यांनी हाॅलचा नुसता राडा केला बाबो , राडा ! सगळे उभ्याउभ्याच कलकलाटात सामील !
हळूहळू Welcome Drinks , Hard Drinks , Starters नी सुरुवात झाली…..
विशाखाने आमचे ९०+ उपाध्ये सर जे सध्या पुण्यात असतात त्यांना ( Audio) Call लावला ( असंही बरेचसे तळीराम आणि एखाद दुसरी तळीसीता स्वत:च्या घरच्यांनाही ओळखू शकले नसते म्हणा त्यामुळे उपाध्ये सरांना हा नजारा न दाखवण्याचा साधक—बाधक विचार विशाखाने केला असावा ब्वाॅ ! सर आम्हां ३—४ जणांशी बोलले आणि परत सगळे मित्रमैत्रिणी राडा गॅंगला जाॅईन झाले !
आमचा वर्गमित्र अतुल दत्तात्रय भातखळकर हा तिसर्यांदा MLA झाल्याप्रीत्यर्थ त्याला बुके देण्यात आला ! ( राजकारणात असल्याने तोही अंमळ उशिराच अवतरला हे वेगळे सांगणे न लगे ! ) मग अजितने आणलेला केक मिलिंद संभाजी गावडे व अतुल या दोंघाच्या हस्ते कापण्यात आला , मिलिंदचा वाढदिवस २८ फेब्रुवारीला च झाल्यामुळे आजचा ( पार्टी ) काढ दिवस असा साजरा करून काल खरा गाव Day म्हणून साजरा करण्यात आला ! मग अस्मादिकांनी एक कविता केलेली व सुलेखन पद्धतीने लिहिलेली सादर करण्यात आली — जी या लेखानंतर जोडली आहे !
हळूहळू गप्पाटप्पा पार टिपेला पोचल्या , US ला स्थाईक असणारा आमचा वर्गमित्र प्रशांत बळवंत फाटक हा बराच वेळ बाहेर जाऊन डोकं ( I am talking about physical portion हं का बाला ! ) प्र (यत्नपूर्वक) शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसला !
हाॅलमधे जमलेले बाकीचे लोक , त्यांना आम्ही मुंबईतच महाकुंभ ची अनुभूति दिल्याचा संमिश्र भाव चेहेर्यावर घेऊन ही २८ जणांची साठी बुद्धी नाठी सहन करत होते महाराजा !😅
असं करता करता जेवण आणि गोड पदार्थ संपवता संपवता आम्ही एकमेकां साठी जमलेले साठी चे मित्रमैत्रिणी हळूहळू पांगू लागलो…..
शेखर मलिहळ्ळी तर पार Mandatory Overs नंतरही पुढच्या मॅचच्या overs टाकायला तयार असलेल्या गोलंदाजासारखा खाण्याच्या पिण्याच्या आणि बोल बोल बोलण्याच्या स्वत:च्याच गोल गोल अंदाजात असा सुटला होता की वेटर्स गडबडले , की हा आता उद्याचा Breakfast करूनच जातो की काय ब्वाॅ ! रात्री साधारण ११.५० ला आमची शेवटची बॅच निघाली आणि सर्वात शेवटी शेखर निघाला (असावा !)
अशा प्रकारे आम्ही सगळे वर्गमित्रमैत्रिणी काल जवळपास ४५ वर्षांनी एकत्र भेटून १५—१६—१७ जूनच्या वर्षासहलीची घोषणा करून कुठल्याही ठिकाणावर शिक्कामोर्तब न करता Agree to Disagree होत आपआपल्या घरी पोचलो ! मंडळी , दिसायला साधीच दिसणारी ही घटना , पण…..
कितीही वय झालं तरी शाळेची वर्गवारी नेहेमीच न्यारी असते !
वारकर्याला पंढरपूरची , तशीच सर्वांना ही मोठ्ठी वारी असते !
मंडळी , जशी ही आठवण देवी आम्हां वर्गमित्रमैत्रिणींना पावली आणि मरगळलेल्या आयुष्याच्या वहीत ( मधुबालेसारखी ! ) मोरपिसाची साठवण करून राहिली , तशीच ती तुम्हां सर्व वाचक मित्रमैत्रिणींना पण पावो आणि तुमचे मित्रमैत्रिण प्रेम एकमेकांच्या ओढीने सतत धावो हीच ईश्वरचरणीची प्रार्थना करून पाचा उत्तरीची कहाणी साठी उत्तरी सफळ संपूर्ण !
कळावे ,
लोभ असावा ही विनंति !
आपला विनम्र ,
© उदय गंगाधर सप्रे म—
Leave a Reply