पूर्वीच ते घर कसं
जायचं अगदी गजबजून
गप्पांच्या त्या मैफलीत
आठवणी यायच्या धावून.
आता कसं सर्व काही
शांत अन् निवांत आहे
पण, आठवणींच्या आठवणींने
मन थोडसं अशांत आहे.
पूर्वी आठवणी कशा
अगदी मनमोकळ्या हसत
सवय नव्हती त्यांना
अन् नव्हत्या कधी रुसत.
आठवणी पूर्वी कशा
रहायच्या सदैव बोलत
कुजबूजतात कधिमधी
आणि बसतात आता झूरत.
भिजतात काही आठवणी
अन् ओल्या होतात आतनं
बसतो उमेदीच्या ऊन्हात…
सुकवण्याचा एक प्रयत्न.
पूर्वी आठवणींची फुलपाखरं
कशी स्वछंदी बाडगळत
आता काही सैराट भुंगे
बसतात मन पोखरत.
पूर्वी आठवणी कशा
प्रेमानं थोपटुन निजवत
आता मात्र उदास बसतात
रात्र रात्र उगाच जागवत.
पूर्वी आठवणींच्या झाडाखाली
थंड मंद वारा वाही
आता मात्र मनाच्या वळचणीला
पूर्वीसारखा थारा नाही.
– डॉ.सुभाष कटकदौंड