नवीन लेखन...

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने कमी होतो.)

ऋषिपंचमी व्रत :
भाद्रपद शुद्ध पंचमीस ऋषिपंचमी म्हणतात. ऋषिपंचमी व्रतासाठी पंचमी ही मध्याह्न व्यापिनी घ्यावी. दोन दिवस मध्याह्न असेल अथवा दोन्ही दिवस नसेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. या दिवशी ऋषींचे पूजन करून न नांगरलेल्या जमिनीत उत्पन्न झालेल्या शाकांचा आहार करावा. या दिवशीं काश्यपादि सप्तऋषि व अरूंधती याचें पूजन करतात. नद्यांच्या संगमावर अथवा समुद्रस्नान या दिवशीं करावें व स्नानापूर्वी आघाड्या च्या काड्यांनीं दंतधावन करावें असा विधि आहे. उपवास करून बैलाच्या श्रमावांचून उत्पन्न केलेल्या खाद्यपदार्थांचा नैवेद्यास उपयोग करितात. हें व्रत ऋतुस्नात होणार्‍या (रजोदोष शमनार्थ) स्त्रियांनीं करावयाचें असते. कोणी पुरूषहि हें व्रत करतात.

या व्रतासंबंधीं ब्रंह्मांडपुराणांत कथा आहे ती अशी:-

सिताश्व राजानें विचारल्यावरून ब्रह्मदेवानें सांगितलें कीं, विदर्भ देशांत उत्तंक नांवाचा एक ब्राह्मण रहात असून सुशीला नांवाची त्याची एक पतिव्रता स्त्री होती. त्याला सुंविभूषणनामक पुत्र असून वैधव्य प्राप्त झालेली अशी एक कन्या होती. आपल्या पुत्रास घरीं ठेवून विधवा कन्येसह तो अरण्यांत रहात असे. एके रात्रीं तीं विधवा कन्या एका दगडावर निजली असतां तिच्या अंगावर अनेक कृमी उत्पन्न झालेले उत्तंकाच्या शिष्यानें पाहिले, व उत्तंकाच्या स्त्रीस सांगितलें. तिनें मुलीच्या अंगावर उत्पन्न झालेले कृमी पाहून एकाएकीं असे कृमी उत्पन्न होण्याचें कारण आपल्या भर्त्यास विचारलें असतां ‘हीं पूर्वजन्मीं ब्राह्मणस्त्री असून रजस्वला झाली असतां दूर न राहतां ती तशीच गृहांत वावरत असे या पातकामुळें या कन्येच्या शरीरावर नित्य रात्रीं असे कृमी उत्पन्न होऊन सकाळीं नाहींसे होतात असें सांगितलें. पत्‍नीनें विचारल्यावरून उत्तंक म्हणाला कीं स्त्रियानीं रज:संपर्क दोष नाहींसा होण्याकरितां अरूंधतीसहित कश्यपादि सत्पऋषींचें पूजनरूप ऋषिपंचमी नामक व्रत करावें म्हणजे रज:संपर्क दोष नाहींसा होतो.

भविष्योत्तरपुराणांतील कृष्णानें धर्मास सांगितलेलीं कथा :-
पूर्वी इंद्रानें वृत्राला मारिलें. वृत्रासुर ब्राह्मण असल्यामुळें ब्रह्महत्येचें पातक घडलेला इंद्र लज्जित होऊन ब्रह्मदेवास शरण गेला असतां ब्रह्मदेवानें त्या ब्रह्महत्येचे चार विभाग करून एक भाग अग्नीच्या प्रथम ज्वालेत, दुसरा भाग नदीला प्रथम आलेल्या पुरांत, तिसरा भाग पर्वतशिखर व वृक्षजातींमध्यें आणि चवथा भाग स्त्रियांच्या रजांत ठेविला. यासाठीं रजस्वला स्त्रीस स्पर्श करू नये. ती प्रथम दिवशी चांडाली, दूसर्‍या दिवशी ब्रह्मघातिनी, तिसर्‍या दिवशी परटिणीप्रमाणें असून चौथ्या दिवशी शुद्ध होते.

समजून अथवा न समजून झालेल्या रज:संपर्कानें होणार्‍या पापाचें क्षालन ऋषिपंचमी व्रतानें होतें असें सांगून यासंबंधीं श्रीकृष्णानें धर्मास आणखी एक कथा सांगितली आहे ती अशी:- विदर्भ देशांत सुमित्र नांवाचा एक विद्वान ब्राह्मण रहात होता. त्याची जयश्री नामक अत्यंत पतिव्रता पत्‍नी असून परिवार मोठा असल्यामुळें गृहकृत्यें करूनहि स्वत: आपल्या शेतांतील कामें ती करीत असे. एकदां ती रजस्वला असतां अस्पृश्य न राहतां घरांत तशीच वावरली. या पातकामुळें मृत्यूनंतर ती कृत्रीच्या जन्मास गेली. सुमित्र स्वत: पातकी नसतां पातकी स्त्रीच्या सहवासामुळें त्यास मृत्यू नंतर बैलाचा जन्म आला.

पूर्व जन्मीच्या कांहीं सुकृत्यामुळें त्या दोघांना त्यांचा पूर्व जन्मीचा मुलगा जो सुमति त्याच्याच पदरीं राहण्याचा प्रसंग आला. एकदा सुमतिच्या बापाचा श्राद्धदिन आला असतां त्याच्या स्त्रीनें श्राद्धाकरितां स्वयंपाक तयार केला. त्या स्वयंपाकांतील पायसांत त्या स्त्रीच्या न कळत सर्पानें गरळ टाकलेलें थोड्या अंतरावरच असलेल्या कुत्रीनें पाहिलें आणि हा पायस भक्षण केल्यानें ब्राह्मणांना मृत्यु येईल हें जाणून त्या कुत्रीनें स्वयंपाकास स्पर्श केला. सुमतीच्या बायकोनें हें पाहून अतिशय रागानें त्या कुत्रीच्या डोक्यांत जळकें लांकूड मारलें आणि तो सर्व स्वयंपाक टाकून देऊन दुसरा स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक विटाळल्यामुळें कुत्रीस त्या दिवशीं नित्याप्रमाणें खावयास कोणी न घातल्यामुळें तिला उपवास घडला. तिला व बैल झालेल्या तिच्या पतीला पूर्व जन्मीचें स्मरण असल्यामुळें ती दोघेंहि आपापल्या भाषेंत एकमेकांशीं बोलत असत.

शेतांतून बैल घरीं आल्यावर कुत्रीनें घडलेली हकीकत बैलास निवेदन केली. बैलानेंहि ”माझ्या मुलानें आज दिवसभर माझ्याकडून कष्टाचें काम करून घेऊन मला कांहींच खाऊ घातलें नाहीं आणि कामाची कसूर झाल्यास मारहि देण्यास कमी केलें नाहीं. आज मुलानें माझें श्राद्ध केले परंतु मी बुभुक्षितच असल्यामुळें तें श्राद्ध व्यर्थ होय.” असें सांगितलें. कुत्री व बैल यांचें हें भाषण जवळच असलेल्या सुमति ब्राह्मणानें (त्याला जनावरांची भाषा कळत असल्यामुळें) ऐकल्यावरून मातापितरांच्या या अवस्थेबद्दल त्याला अत्यंत दु:ख झालें आणि या माता पितरांनां ही स्थिति कां प्रात्प झाली व ती कोणत्या उपायांनीं नाहींशी होईल हें त्यानें अत्यंत ज्ञानी अशा सर्वतपा नामक ऋषीला विचारलें असतां त्या ऋषीनें त्याच्या मातापितरांची पूर्व जन्माची हकीगत सांगून, हा रज:संपर्क दोष नाहींसा होण्यास ऋषिपंचमी नामक व्रत करावयास सांगितलें. नंतर सुमतीनें यथासांग व्रत केल्यावर त्याच्या मातापितरांची पशुयोनीपासून मुक्तता झाली.

व्रत आचरण:
या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्या ठेवून कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.दुसर्या दिवशी कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे. बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.

एका बाजूला स्त्री आणि दुसर्या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषिपंचमीला खातात. ऋषिपंचमीला जनावरांच्या मदतीने बनविलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते. पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषिऋण फेडण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत करतात. व्याहृती म्हणजे जन्म देण्याची क्षमता. ७ व्याहृतींना ओलांडण्यासाठी ७ वर्षे व्रत करतात. नंतर व्रताचे उद्यापन करतात.

व्रत कथा :
आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याची बायको विटाळशी असतांना ती घरात सगळीकडे शिवली. त्यामुळे सगळ्या घरात विटाळ कालवला गेला. त्या दोषाने तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि त्या बाईला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी अशी की, दोघेही आपल्या मुलांच्या घरी रहात होती. त्यांचा मुलगा मोठा धार्मिक होता. तो देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचे आदरातिथ्य करी. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होते. त्याने बायकोला सांगितले, ‘‘आज माझ्या आईचे श्राद्ध आहे. खीर-पुरीचा स्वयंपाक कर.’’

ती मोठी पतिव्रता होती. तिने यथासांग खीर-पुरीचा स्वयंपाक केला. खिरीचे भांडे उघडे ठेवून ती बाहेर गेली. तेवढ्यात सर्पाने खिरीत आपले गरळ टाकले. हे त्या कुत्रीने पाहिले. तिने विचार केला, ‘ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. त्यामुळे मुलाला ब्रह्महत्येचे पातक लागेल.’ म्हणून ती उठली आणि पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते कोलीत घेतले नि कुत्रीच्या कंबरेत मारले. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला आणि ब्राह्मणांना जेवू घातले. तिने रागाने कुत्रीला उष्टे-खरकटेही घातले नाही.

कुत्रीला सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवर्याजवळ, म्हणजे त्या बैलाजवळ गेली. ती आक्रोश करू लागली. बैलाने तिला कारण विचारले, तेव्हा ती म्हणाली,‘‘मी उपाशी आहे. आज मला सुनेने अन्न-पाणी दिले नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकले, ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील; म्हणून मी खिरीच्या पातेल्याला जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिने जळते कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझे सारे अंग दुखत आहे.’

बैलाने उत्तर दिले, ‘‘याला मी काय करू ? तू आदल्या जन्मी विटाळशी असतांना विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. मीही आज उपाशीच आहे. आज त्याचे श्राद्ध फुकट गेले.’’ हे भाषण मुलाने ऐकले. तो लगेच उठून बाहेर आला. त्याने बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातले आणि दोघांना चांगले पाणी प्यायला दिले. तो मनात दुःखी झाला.
दुसरे दिवशी सकाळी उठला आणि घोर अरण्यात गेला. तिथे त्याने ऋषींचा मेळा पाहिला. त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला.

ऋषींनी प्रश्न केला, ‘‘तू असा चिंताक्रांत का आहेस ?’’
मुलाने सांगितले, ‘‘माझ्या वडिलांना बैलाचा आणि आईला कुत्रीचा जन्म मिळाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.’’
तेव्हा त्या ऋषींनी सांगितले, ‘‘तू ऋषीपंचमीचे व्रत कर. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पंचमीला दुपारच्या वेळी नदीवर जावे. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठाने दंतधावन करावे. आवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. ते तेल केसाला लावावे, मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्रे नेसावी.

चांगल्या ठिकाणी जावे, अरूंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असे सात वर्षे करावे. शेवटी उद्यापन करावे. या व्रताने रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते आणि नाना तीर्थांच्या स्नानांचे पुण्य लागते. नाना प्रकारच्या दानांचे पुण्य लागते, मनी इच्छित कार्य होते. मुलाने ते कार्य केले. त्याचे पुण्य आई-वडिलांना दिले. त्या पुण्याने त्यांचा रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले. बैल सुंदर पुरुष झाला आणि कुत्री सुंदर स्त्री झाली. दोघे विमानात बसून स्वर्गात गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला.’

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

1 Comment on ऋषिपंचमी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..