भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात. ऋषिपंचमीला विशिष्ट पद्धतीने आहार सेवनाविषयी काही नियम आहेत. या दिवशी नांगरणी न झालेल्या शेतातून सहज उगवून येणाऱ्या रानभाज्यांचे व धान्यांचे सेवन केले जाते. या दिवशी हिरव्यागार व ताज्या कसदार रानभाज्यांचे सेवन केले जाते. या भाज्यांमध्ये खनिजांचे व जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असल्याचे सृदृढ आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त असते.
वर्षांतून किमान एक दिवस तरी स्वत:च्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागे संकेत वा संदेश आहे. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे.
हे व्रत मुख्यत्वे करुन स्त्रिया रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी करतात. या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानाचे, विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लागते, व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे. आपल्या जीवनाच्या सर्वागीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहा. ऋषी पंचमीचा उपवास असणार्यान स्त्रिया जेवणात केवळ ही ऋषीची भाजी आणि भात खातात. ऋषिपंचमीची भाजी करताना लाल माठ, भेंडी, अळू, भोपळा, सुरण, मका, वाल अशा विविध भाज्या मिसळून एकत्र भाजी तयार केली जाते.
ऋषिपंचमीची तयार भाजी – १
साहित्य. ४ जुडय़ा भाजीचे अळू, १ मोठी जुडी लाल माठ, १५-२० माठाच्या जाड देठांचे तुकडे, प्रत्येकी पाव किलो लाल भोपळा, सुरण, रताळं, दोडका, पडवळ; पाव किलो कणगी तसंच करांदा (मिळालं तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल.), ४ कच्ची केळी, पाव किलो भुईमुगाच्या शेंगा सोलून दाणे काढा, १५-१६ कणसाचे तुकडे, साधारणपणे २ वाटय़ा फरसबीच्या शेंगा अर्धे तुकडे केलेल्या, ५-६ अंबाडे (नसल्यास ३-४ टेबलस्पून चिंचेचा कोळ), दीड वाटी ओलं खोबरं आणि ५-६ हिरव्या मिरच्या वाटून, २ शहाळी (पाणीही वापरायचं आहे आणि आतली मलईही तुकडे करून वापरायची आहे.) मीठ चवीनुसार.
कृती. प्रथम अळू आणि माठ स्वच्छ धुऊन ठेवा. भाज्या कोरडय़ा झाल्यावर अळू आणि माठ बारीक चिरा. अळूचे देठ सोलून घ्या आणि बारीक चिरा. माठाचे देठ सोलून घ्या आणि आपण शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करतो तेवढे तुकडे करा. कच्ची केळी आणि रताळ्याची सालं काढून त्यांचे २-३ इंचाचे तुकडे करा. लाल भोपळा आणि सुरणाचेही तसेच मोठे तुकडे करा. दोडक्याच्या शिरा काढून तसेच मोठे तुकडे करा. पडवळाच्याही आतल्या बिया काढून मोठे तुकडे करा. कणसाचे २-३ इंचाचे तुकडे करा.अंबाडे सोलून तसेच अख्खे ठेवा. एका मोठय़ा पातेल्यात अळू, लाल माठ, माठाचे देठ घाला. साधारणपणे २ वाटय़ा पाणी घालून शिजायला ठेवा. अर्धवट शिजल्यावर त्यात माठाचे देठ, कच्ची केळी, सुरण आणि रताळ्याचे तुकडे घाला. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.आता क्रमाने फरसबी, दोडका, पडवळ, कणसं, शेंगांचे दाणे, लाल भोपळ्याचे तुकडे घाला. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.भाज्या शिजत आल्या की, त्यात सोललेले अंबाडे घाला. शहाळ्याचं पाणी तसंच मलई घाला. हलवून खोबरं-मिरचीचं वाटण घाला. अंबाडे नसतील, तर चिंचेचा कोळ घाला. चवीनुसार मीठ घाला. भाजी चांगली शिजू द्या. सतत हलवू नका, नाही तर भाज्यांचे तुकडे मोडतील. भाजी तयार आहे. भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. शिवाय यात घातल्या जाणा-या काही भाज्या याच आठवडय़ात बाजारात दिसतात. तेव्हा आठवडाभरातच ही भाजी करता येते.
ऋषिपंचमीची भाजी – २
साहित्य. लाल माठ ऋषिपंचमीसाठी माठ मुद्दाम जून होईपर्यंत ठेवली जाते.), भाजीचं अळू, सुरण, काटोकंद (पावसाळ्यातली भाजी), कच्ची केळी, पडवळ, दोडका, कंदमूळ (जांभळा कंद), गवार, भोपळा, पावटय़ाचे दाणे, मिरच्या चिंचेचा कोळ (किंवा कोकम), शहाळ्याचं पाणी आणि शहाळ्याची मलई.
कृती. सगळ्या भाज्या व्यवस्थित धुऊन, कापून-चिरून घ्यायच्या. अळूची पानं कापून, त्याची सुरळी करून गाठ मारायची. ही भाजी शहाळ्याच्या पाण्यात शिजवल्यास अधिक रुचकर लागते. मोठय़ा पातेल्यात भाज्यांचे तुकडे घालून त्यात भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं. वाटल्यास अर्धे साधे पाणी आणि अर्धे शहाळ्याचे पाणीही घेता येईल. चवीपुरतं मीठ आणि चिंचेचा कोळ घालावा. या भाजीचं वैशिष्टय़ म्हणजे त्याला तेल, फोडणी काहीही घालायचे नसते. भाजीला चांगला रस सुटतो, तो तसाच ठेवावा. पूर्ण सुकवू नये. भाज्या शिजल्या की, आचेवरून उतरवण्याआधी शहाळ्याची मलई घालावी. तांदळाची उकड काढलेली भाकरी, दही-चटणी यासोबत ही भाजी छान लागते.
ऋषिपंचमीची भाजी- 3
साहित्य : आळूची पाने देठासह, लाल माठ, सुरण, लाल भोपळा, पावट्याचे दाणे, कच्ची केळी, मक्याची कणसे, चवळीच्या शेंगा, बटाटा, दोडका, हिरवी मिरची, ओले खोबरे, तेल, गूळ, मीठ, चिंचेचा कोळ.
कृती : आळूची पाने बारीक चिरावी. देठांची साले काढून तुकडे करावेत. तसेच लाल माठही चिरून घ्यावा. देठ सोलून तुकडे करावेत. बटाटे सोलून मोठ्या फोडी कराव्यात. सुरण कच्च्या केळीच्या व लाल भोपळ्याच्या मोठ्या फोडी कराव्यात. चवळीच्या शेंगांचे तुकडे करून घ्यावे. मक्याच्या कणसाचे चार तुकडे करून वाफवून घ्यावे. हिरवी मिरची व ओले खोबरे एकत्र वाटून घ्यावे. पातेल्यात तेल गरम करून त्यात आळू व लाल माठ शिजत ठेवावा. नंतर त्यात इतर सगळ्या भाज्या व पाणी घालून शिजवत ठेवावे. मग त्यात वाटलेले खोबरे व मिरचीचे वाटण व एक ग्लास पाणी टाकावे. त्यात चिंचेचा कोळ, गूळ व मीठ टाकून शिजवत ठेवावे. अर्धा तास ही भाजी झाकण ठेवून शिजवत ठेवल्यानंतर सगळ्या भाज्या शिजल्या, की वाफवलेले मक्याचे तुकडे टाकावे व एक वाफ काढावी. मस्त भाजी तयार होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply