रशियन-अमेरिकन लेखिका आणि तत्त्वज्ञ आयन रँड यांचा जन्म २ फेब्रुवारी १९०५ रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला.
आयन रँडचे मूळ नाव एलिसा झिनोव्येव्ना रोझेनबाऊम. आयन रँड हे त्यांनी आपल्या लेखनासाठी घेतलेले टोपण नाव होते. तो कालखंड साम्यवादी क्रांतीचा कालखंड होता. या क्रांतीची झळ आयन रँडला यांनाही बसली. बोल्शेव्हिक क्रांतीमुळे त्यांचे कुटुंब काही काळ देशाबाहेर होते. नंतर ते परत रशियात आले. त्या वेळी सेंट पीटर्सबर्गचे आता पेट्रोग्रााड असे नामकरण झाले होते. एलिसा यांचे महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले. त्या इतिहास, साहित्य आणि तत्त्वज्ञान या विषयांची चाहती होती. स्वतंत्र विचारांच्या या तरुणीला समूहवाद आणि त्यामुळे होणारा व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच याचा त्रास होऊ लागला. शेवटी स्वातंत्र्याच्या शोधात आयन रँड अमेरिकेत आल्या. हॉलिवूड मध्ये त्यांना लेखन विषयक कामे मिळू लागली. फ्रँक ओ’कॅनर या अभिनेत्याशी तिने विवाह केला. जेव्हा अमेरिकेत साम्यवादाला छुपा पाठिंबा मिळू लागला, तेव्हा मात्र औद्योगिक भांडवलशाहीला योग्य ठरवून आपल्या लेखनातून आयन रँड वस्तुनिष्ठतावाद मांडू लागल्या.
तिच्या कादंबरीतील पात्रे तिचे तत्त्वज्ञान आणि विरोधी जग यांची चर्चा करू लागले. १९४३ साली त्याची ‘द फाउंटन हेड’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि इतिहास घडला. ही कादंबरी गाजली व बेस्टसेलर ठरली आणि आश्चर्य म्हणजे, बेस्टसेलर ठरलेल्या या कादंबरीची वाटचाल आज देखील थांबलेली नाही. कादंबरीच्या सातत्याने आवृत्त्यांवर आवृत्त्या, विविध भाषांत अनुवाद होत असतात. या एका कादंबरीने आयन रँड यांना आणि तिच्या तत्त्वज्ञानाला ओळख दिली.
त्यानंतर आयन रँड यांची सर्वात जास्त गाजलेली ‘ॲटलास श्रग्ड’ ही कादंबरी १९५७ मध्ये प्रकाशित झाली. ॲटलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे.
या दोन्ही कादंबऱ्यांवर हॉलिवूड मध्ये चित्रपट निघाले. यानंतर मात्र आयन रँडने ‘ऑब्जेक्टिव्हिझम’ या तत्त्वज्ञानाची सुसंगत मांडणी करण्यासाठी उर्वरित आयुष्य घालवले. याच विषयावर तिने नंतर पुस्तके लिहिली, मुलाखती दिल्या, लेख लिहिले.
आयन रँड यांचे ६ मार्च १९८२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply