नवीन लेखन...

बार्बीडॉलची निर्माती रुथ हँडलर

जन्म. १९१६

अमेरिकेच्या डेन्वर, कोलेरॅडो मध्ये जन्मलेल्या रुथ हँडलर यांनी केवळ घर सांभाळत न बसता आपल्या पतीच्या साहाय्याने व्यवसायाला सुरूवात केली.

खेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे. बार्बी कोणत्याची वयाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसताक्षणी हास्य फुलविते अशी तिची ख्याती आहे.

लहान मुलींचं पहिलं खेळणं म्हणजे बाहुली. आपल्या बाहुलीशी गप्पा मारत बसणं, तिची काळजी घेणं, शक्य असल्यास नेहमी आपल्या जवळ ठेवणं, लहान मुलींना खूपच आवडतं. लहान मुलींच्या बाहुला-बाहुलीच्या या विश्वात सर्वाधिक प्रसिध्द असलेली बाहुली म्हणजे, बार्बी डॉल. अतिशय नाजूक, निरागस डोळे असलेली ही बाहुली आपल्याजवळ असावी, असं जगातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. आणि आपल्या मुलीच्या हाती एखादी चांगली बाहुली असावी या विचारातूनच, रुथ हँडलर या उद्योजिका-आईने जन्म दिला बार्बी डॉलला. १९५६ साली हँडलर कुटुंबिय आपली दोन मुलं, बार्बरा आणि केनेथ यांच्यासह युरोपला फिरायला गेले. त्यावेळी जर्मनीमध्ये प्रसिध्द असलेली लीली डॉल रुथ यांनी विकत घेतली. छोट्या बार्बराला ही लीली भलतीच भावली. त्यावेळी अमेरिकेमध्ये केवळ लाकूड किंवा कागदापासून बनवलेल्या बाहुल्यांचीच निर्मिती होत असे. लीलीचं नाजूक रुप पाहून रुथला अमेरिकेमध्ये असं उत्पादन व्हावं, असं वाटू लागलं. पण ती केवळ बाहुली न राहता लहान मुलींबरोबरच किशोरवयीन मुलींना तो एक आदर्श वाटावा, अशी रुथ हँडलर यांची संकल्पना होती. मुलांना बाहुली आवडताच रुथ यांनी तीन बाहुल्या विकत घेतल्या. बिल्ड लिली ही बाहुली म्हणजे त्या वेळी ‘दि बिल्ड झायटुंग’ या जर्मन वृत्तपत्रात रेनहार्ड ब्यूथिन या चित्रकाराने रेखाटलेल्या ‘कार्टून स्ट्रिप’मधली एक व्यक्तिरेखा! लिली जर्मनीत १९५५ मध्ये पहिल्यांदा विकली गेली. अमेरिकेला परतून रुथ आणि एलियट यांनी या बाहुलीसारखी बाहुली बनवायचा ध्यास घेतला. एलियट हँडलर यांचा खेळण्यातल्या छोटय़ा फर्निचरचा व्यवसाय होता. हँडलर यांच्या भागीदाराचे नाव होते हॅरॉल्ड मॅटसन. त्याच्या नावातले ‘मॅट’ आणि स्वत:च्या एलियट या नावातले ‘एल’ असे शब्द जुळवून त्यांनी कंपनी निर्माण केली- ‘मॅटेल’. मॅटल कंपनीमध्ये त्यांनी जेव्हा हा विचार मांडला तेव्हा, तिच्या पतीसह कोणालाच ही संकल्पना आवडली नाही. अमेरिकेत अशाप्रकारची संकल्पना मूळ धरुच शकणार नाही, असं रुथ यांना कंपनीच्या बैठकीत सांगण्यात आलं. पण, युरोपहून परतल्यानंतर आपल्या मुलीला लागलेल्या लीली बाहुलीच्या वेडावरुन रुथ यांना खात्री होती की अमेरिकेत अशाप्रकारची बाहुली नक्कीच लोकप्रिय होईल. त्यामुळेच त्यांनी लीलीमध्ये त्यांना अपेक्षित असलेले बदल केले आणि पुन्हा कंपनीच्या बैठकीत, या बाहुलीचं प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन करण्याची गळ घातली. अखेर, हट्टाला पेटलेल्या रुथ यांच्यासमोर कंपनीने हार पत्करली. यंत्रसामग्री, साचे यांचा प्रश्न असल्याने पहिली बार्बी जपानमध्ये घरगुती पद्धतीने निर्माण झाली आणि पहिल्याच वर्षी ती साडेतीन लाख विकली गेली. रुथ यांनी बिल्ड लिलीला विकत घेतले तेव्हा तिच्या थोराडपणाची कल्पना आली नाही. पुढे तिला ‘स्केल’ लावून पाहिले तेव्हा लक्षात आले की ती मोठी बनू शकते, पण त्यांनी तिचे लहानपणच जपले. बऱ्याचदा बार्बी वधूवेषातही दिसते, पण तो लहान मुलींसाठी निर्माण केलेला भ्रम असतो. न्यूयॉर्कच्या एका प्रदर्शनात बार्बीला ठेवले आणि ती जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे रुथ यांच्या लक्षात आले. ९ मे १९५९ साली अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये ही बाहुली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. बिल्ड लिलीचे सर्वाधिकार हँडलर दांपत्याने घेतलेले असल्याने आता कुणी तिची प्रतिकृती बनवायचा प्रयत्न केला, तर पेटंट कायद्याखाली तो गुन्हा ठरणार होता. २००१ मध्ये ‘एमजीए एन्टरटेन्मेंट’ कंपनीने बार्बीसारख्या बाहुल्या आणल्या. इंग्लंडमध्ये त्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होऊ लागली. बार्बीची विक्री अमेरिकेतही ३० टक्क्यांनी, तर जगभरात १८ टक्क्यांनी घटली. त्याबरोबर ५० कोटी डॉलरचा दावा ठोकण्यात आला. न्यायाधीशांनी त्या कंपनीला साठा संपेपर्यंत विक्री करा, पण नंतर तिची निर्मिती करू नका, असे बजावले. तरीही विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून देताच कंपनीकडून ‘मॅटेल’ला १० कोटी डॉलरची नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली. तुमच्या बार्बीचा चेहरा कुणासारखा आहे, असे विचारले असता रुथ म्हणाल्या होत्या, ‘अर्थातच माझ्या मुलीसारखा! मुलगी माझीच असल्याने ती माझ्यासारखीच दिसणार, हे उघड आहे.’ रूथ कोलॅरॅडोत डेन्व्हरला जन्मल्या. पती एलियट हा त्यांचा शाळेतला मित्रच. पॅरॅमाऊंट स्टुडिओत उन्हाळ्याच्या सुटीत मिळालेली पहिली नोकरी हीच त्यांची शेवटचीही नोकरी. पुढे पतीबरोबर त्यांनी स्वत:ला व्यवसायात वाहून घेतले. बार्बीने त्यांना कोटय़वधी डॉलरचा नफा मिळवून दिला.

मुलगा केनेथ फार जगला नाही. या दु:खातच रुथ यांचे २७ एप्रिल २००२ रोजी निधन झाले. त्यांची बार्बी मात्र जगाची लाडकी बनून राहिली आहे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..