९६५ सालातील गोष्ट आहे. महाराष्ट्रात ‘अश्रूंची झाली फुले’ चे प्रयोग हाऊसफुल्ल चालले होते. ‘नाट्यसंपदा’चे प्रभाकर पणशीकर, ‘अश्रूंची..’ नंतरच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नवीन नाटकाची जुळवाजुळव करीत होते.
पणशीकर पुण्यात आले की, ‘पूना गेस्ट हाऊस’ या ‘कलाकारांच्या माहेरा’ला भेट दिल्याशिवाय मुंबईला जात नसत. त्यानुसार ते चारूदत्त सरपोतदार यांचेकडे गेले. पणशीकरांनी चारूकाकांना नवीन नाटकाविषयी बोलताना ऐतिहासिक कपडे शिवून देणारा कोणी असेल तर मला तो हवा आहे, असे सांगितले. चारूकाकांनी त्यांना भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांसाठी कपडे शिवून देणाऱ्या यस्. दत्तू चे नाव सांगून कोल्हापूरला गेल्यावर त्याचा शोध घेण्यास सांगितले.
पणशीकरांच्या ‘अश्रूंची..’च्या कोल्हापूरमधील प्रयोगाचे वेळी त्यांनी ‘जयप्रभा’ गाठले. बाबा बाहेरगावी गेले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी पणशीकरांची व दत्तूची भेट घालून दिली.
पणशीकरांनी दत्तूला कलाकारांची माप घेण्यासाठी लाॅजवर बोलावून घेतले. साठीचा दत्तू आपल्या दोन तरुण मुलांसह हजर झाला. पंधरा कलाकारांची मापं घेऊन कपडे शिवायचे होते. पणशीकरांनी प्रत्येक कलाकाराची भूमिका व त्याला आवश्यक असणाऱ्या पोशाखांची माहिती दत्तूला सांगितली.
दत्तू त्याच्या कलेत जरी हुशार असला तरी तो शुद्धीत क्वचितच असायचा. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याची दोन्ही मुलं त्याची नेहमीच सोबत करीत असत. सर्व कलाकारांना प्रश्न पडला की, आता दत्तू अंगावरची मापं घेणार कशी?
स्वतः काशिनाथ घाणेकर यांनी पणशीकरांना ‘याचं काही खरं नाही’ असं नजरेनेच खुणावले. दत्तूने आपल्या एका मुलाला कलाकारांची मापं घ्यायला सांगितले व दुसऱ्याला वहीत नोंदी घ्यायला बसवले.
प्रत्येक पुरुष कलाकाराच्या डोक्याच्या घेराचे माप त्या मुलाने घेतले व दुसऱ्याने त्या कलाकाराच्या भूमिकेचे नाव लिहून त्यापुढे ते माप इंचामध्ये लिहिले. अशाप्रकारे पुरुष कलाकार झाल्यावर स्त्री कलाकारांकडे तो मुलगा वळला.
सर्व स्त्री कलाकार गोंधळून गेल्या होत्या. पहिल्यांदा सुधा करमरकर आल्या. त्या मुलानं वडिलांच्या पद्धतीनुसार सुधाताईंच्या गळ्यापासून खांद्यापर्यंतचेच माप इंचात मोजले व लिहायला सांगितले. सर्व कलाकारांना हा आश्र्चर्याचा धक्का होता. आजपर्यंत त्यांनी पुन्हा पुन्हा मापं घेणारे अनेक टेलर पाहिले होते, कोल्हापूरचा हा अनुभव ‘जगावेगळा’ होता..
दत्तूने शिलाईच्या कामासाठी पणशीकरांकडून महिन्याची मुदत मागून घेतली. महिन्यानंतरच्या प्रयोगाला दत्तू सर्व कलाकारांची वेगवेगळी गाठोडी घेऊन हजर झाला. प्रत्येकाने आपापले कपडे घालून पाहिले. मापाबद्दल एकाचीही तक्रार नव्हती. सर्वांचं शिवण परफेक्ट झालेलं होतं.. विशेषतः स्त्रियांच्या मापाबद्दल तक्रारी नेहमीच असतात, मात्र दत्तूने त्यांना बोलायला संधीच दिली नाही..
या कारागिरीमागे दत्तूचं एक कसब होतं. त्याला माणसाच्या डोक्याच्या घेरावरुन शरीरयष्टीचा परफेक्ट अंदाज होता.. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, त्याची शरीरयष्टी स्मरणात ठेवून, तो कपड्याचं कटींग करायचा व मुलं शिवणकाम करायची. स्त्रियांच्या खांद्यावरील मापावरुन तो गळा, छाती व बाहीचं माप लक्षात ठेवायचा.. ती भूमिका डोळ्यासमोर आणून त्या त्या व्यक्तींचे कपडे त्यानं बिनचूक शिवून दिले.. पणशीकर खूष झाले, त्यांनी आवर्जून चारूकाकांचे आभार मानले..
याच यस्. दत्तूने भालजी पेंढारकरांच्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांसाठी कलाकारांचे कपडे शिवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे, भालजींनीही त्या त्या विषयातील पारंगत तंत्रज्ञ जमवलेले होती. त्यांच्यामुळेच त्यांनी एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती केली..
चित्रपटांच्या श्रेयनामावलीत त्याकाळी टेलरचे नाव देण्याची पद्धत नव्हती. फक्त वेशभूषाकाराचं नाव असायचं.. त्यामुळे एवढं महत्त्वाचं काम करुनही दत्तूला कधीही प्रसिध्दी मिळाली नाही..
आणि खरा कलाकार त्यासाठी कधीही नाराज होत नाही.. अजंठा लेणी घडविणाऱ्यांनी तरी आपली नावं कुठे लिहून ठेवलीत? ते अज्ञातच राहिले.. तसाच हा भालजींचा सच्चा शिलेदार यस्. दत्तू अंधारातच राहिला..
आज या गोष्टीला ५६ वर्षे होऊन गेली आहेत.. दत्तू गेल्यानंतर त्याच्या मुलांचं पुढे काय झालं, कुणालाही माहीत नाही.. बाबा गेले, पणशीकर गेले, चारूकाकाही गेले.. आता राहिल्या फक्त सुरस आणि चमत्कारिक वाटणाऱ्या आठवणी..
या आठवणी आपल्यापर्यंत पोहोचवणारा ‘सेतू’ एकच आहे.. तो म्हणजे ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी! त्यांच्या साठ वर्षांच्या कारकिर्दीतील आठवणींची ही बावडी तुडुंब भरलेली आहे.. मी त्यातील एकेक कळशी भरुन, आपली तहान भागवतो आहे… अशा कितीही कळशा मी काढत राहिलो तरीदेखील ते पाणी तळ काही गाठणार नाही व आपली तहानही तृप्त होणार नाही, हे मात्र नक्की…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
७-१०-२१.
Leave a Reply