एस.एम.जोशी यांनी आयुष्यभर सामान्यांसाठी जीव ओतून काम केले. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९०४ रोजी येथे झाला.त्यांच्या स्फटिकासारख्या स्वच्छ, पारदर्शक, प्रामाणिक आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने त्या काळात अनेकांना प्रेरणा दिली. एस.एम. यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीतूनच झाली. काही विशिष्ट ध्येये, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊनच एस.एम. जोशी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. युसूफ मेहेर अली यांच्या नेतृत्वाखाली युथ काँग्रेसमध्ये एस.एम.जोशी सहभागी झाले. पुढे १९४२ चे भारत छोडो आंदोलन व भूमिगत राहून केलेले काम, एकूण सात वष्रे भोगलेला कारावास, त्यातली अर्धीअधिक सक्तमजुरीची शिक्षा- हे सर्व करत असताना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताची जडणघडण ही आíथक व सामाजिक न्याय आणि समता यावर आधारित समाजनिर्मितीची असली पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन १९३६ मध्ये काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या स्थापनेत ते सहभागी झाले.
माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल वाटणारी सहानुभूती आणि प्रेम हेच जीवनमूल्य प्रधान समजले पाहिजे आणि तेच शाश्वत सत्य आहे, या समाजवादी मूल्यावरच समाजाची उभारणी केली पाहिजे, हा मूलभूत सिद्धान्त त्यांनी आपलासा केला. स्वातंत्र्यलढय़ाबरोबरच मा.एस.एम यांनी कामगार चळवळीत भाग घेतला तो एका मोठय़ा ध्येयासाठी. त्यांनी कामगार चळवळीकडे फक्त कामगारांच्या वाजवी मागण्या मान्य करून घेण्याचे एक साधन म्हणून कधीच पाहिले नाही. या लढय़ाचा उपयोग समताधिष्ठित नवसमाजाची उभारणी करण्यासाठी होईल, असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच कामगारांच्या न्याय्य लढय़ाला विधायक वळण देण्याचा आणि कामगारांना सामाजिक बांधीलकीची शिकवण देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. कामगार चळवळ अहिसक व सहिष्णू मार्गाने लढत असताना तिला समाजपरिवर्तनाची दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रथम त्यांनी पुण्यातील लहान-लहान कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या भांडी कामगारांची संघटना बांधली. नंतर हळूहळू रेवडी कामगार, तपकीर कामगार, विडी कामगार यांच्या युनियन बांधल्या. पण त्यांचे मुख्य काम पुण्यातील खडकी- देहू रोड येथील संरक्षण कारखान्यातील कामगारांच्यात होते.
सर्वप्रथम ५१२ कमांड वर्कशॉपच्या युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. नंतर त्यांनी ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनची स्थापना करून त्याचे ते पहिले जनरल सेक्रेटरी झाले. कामगारांनी कारखान्याची शिस्त पाळली पाहिजे, प्रामाणिक राहिले पाहिजे, जास्तीत जास्त मेहनत करून चांगले उत्पादन केले पाहिजे; तसेच दारू, जुगार अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, घरातील स्त्रियांना सन्मानाने व समानतेने वागविले पाहिजे- या सर्व गोष्टींवर ते कामगारांशी संवाद साधत असत.
राष्ट्रीय दृष्टिकोन न सोडता आणि सामाजिक कर्तव्याची जाण ठेवूनच एस.एम कामगार चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्यलढा आणि कामगार चळवळ याचबरोबर एस.एम यांची दोन फार महत्त्वाची योगदाने म्हणजे राष्ट्र सेवादल आणि संयुक्त महाराष्ट्र. एस.एम यांनी जरी पक्षीय राजकारणात हिरिरीने भाग घेतला तरी त्यांचा मूळ पिंड रचनात्मक आणि विधायक काम करण्याचाच होता. राष्ट्र सेवादलाच्या उभारणीत व राष्ट्र सेवादलाचे पहिले दलप्रमुख म्हणून त्यांनी तरुणांच्या एका संपूर्ण पिढीलाच पुरोगामी विचारांनी भारून टाकले. त्यांचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
एस.एम यांच्या राजकीय प्रवासातील संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आक्रमक असूनही अहिंसक होते. लोकांचा उद्रेक, गोळीबार वगरे झाला नाही असे नाही. पोलिसांच्या गोळीबारात १०५ निरपराध माणसे मारली गेली; पण त्या वेळेस मुंबई व महाराष्ट्राची जनता नेतृत्वहीन होती. जनतेच्या प्रक्षोभाला एका संघटित व अहिंसक आंदोलनाची योग्य दिशा देण्याची नितांत गरज होती. कुठलेही आंदोलन सफल होण्यासाठी कणखर, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व लागते. अशा कठीण परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि समितीचे सरचिटणीस म्हणून एसेमच्या नावाची घोषणा झाली. समितीचे सरचिटणीस या नात्याने एस.एम यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नेतृत्व दिले.
आंदोलनाला एक नतिक दिशा दिली आणि सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून संयुक्त महाराष्ट्र संसदीय व सत्याग्रहाच्या मार्गाने खेचून आणला. संयुक्त महाराष्ट्र समिती हे अनेक पक्षांचे एक कडबोळे होते. प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, शेकाप, हिंदू महासभा, रिपब्लिकन पक्ष अशा भिन्न विचारांच्या पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची तारेवरची कसरत एसेमच करू शकत होते. याचे कारण त्यांच्यावर सर्व पक्षांतील नेत्यांचा असलेला पूर्ण विश्वास. एसेमबद्दल सर्वाना खात्री होती की, हा अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थी माणूस असून वैयक्तिक स्वार्थ तर सोडाच, पण ध्येयपूर्तीसाठी स्वत:च्या पक्षाचे हित पण ते बाजूला ठेवतील. डॉ. डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दाजीबा देसाई, बी. सी. कांबळे, दत्ता देशमुख, डॉ. नरवणे, जयंतराव टिळक असे दिग्गज नेते होते आणि त्या सर्वाना खात्री होती की, एस.एम आपली कधीच फसवणूक करणार नाहीत.
एस.एम यांच्या बाबतीत आत एक आणि बाहेर दुसरेच, असा प्रकार नसायचा. जे काही बोलायचे-करायचे ते सर्व उघडपणे आणि सच्चेपणाने. त्यामुळे खूपदा न पचणारे, न आवडणारे निर्णयदेखील हे नेते एस.एम यांच्या विश्वासामुळे मान्य करीत असत. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी खास आपल्या शैलीत एस.एम म्हणजे संयुक्त (एस) महाराष्ट्र (एम) असे समीकरण केले. एस.एम १९५७ मध्ये विधानसभेवर निवडून आले. नंतर १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि प्रजा समाजवादी पक्ष समितीतून बाहेर पडला. त्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांची दाणादाण करून काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले. नानासाहेब गोरे त्या वेळी पुण्याहून लोकसभेसाठी आणि अण्णा परत विधानसभेसाठी उभे होते.
प्र.स.प. आणि समाजवादी पक्षाचे ऐक्य होऊन संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना १९६५ मध्ये झाली आणि एस.एम हे या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. पण पक्षनिर्मिती होतानाच प्र.स.प.चे लोक त्यातून वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडले. काही ध्येयधोरणे आणि कार्यक्रम यांवर मतभिन्नता होऊन पक्षातून बाहेर पडणे लोकशाही तत्त्वांना धरून झाले असते. पण एकदा बिनशर्त एकोपा झाल्यावर केवळ वैयक्तिक विरोध किंवा नाराजीसाठी पक्षात फूट पाडणे चुकीचे आहे, असे अण्णांचे ठाम मत होते. त्यामुळे अण्णा संयुक्त समाजवादी पक्षातच राहिले. पक्ष दुभंगून अण्णा एकीकडे आणि अनेक वर्षांचे सोबती सहकारी दुसरीकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या काळात अण्णांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांनी अण्णांवर जे आक्षेप घेतले, त्यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करणारी पत्रके काढली; त्यामुळे अण्णांना प्रचंड आत्मक्लेश झाले.
एस.एम पुण्यातून १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आले. तेव्हा इंदिरा गांधींनी काँग्रसचे राष्ट्रपतिपदासाठीचे अधिकृत उमेदवार संजीव रेड्डी यांच्या विरोधात व्ही. व्ही. गिरी यांना उभे केले होते. एक एक मत महत्त्वाचे होते. बाबू जगजीवनराम इंदिराजींच्या वतीने अण्णांना भेटायला घरी आले होते. बाबूजी अण्णांना म्हणत होते, ‘‘एसेम आप जैसे चारित्र्यवान नेताओं की कांग्रेस को जरूरत है.’’ पुढे जाऊन ते म्हणाले, ‘‘इंदिराजीने कहा है की, आप कांग्रेस में आकर कांग्रेस को सुधार सकते हो और कॅबिनेट मंत्री बनकर अपना योगदान दे सकते हो.’’ मा.एस.एम.जोशी यांनी हसत-हसत बाबूजींना उत्तर दिले- ‘‘बाबूजी मं अभी तक खुद की पार्टी को नहीं सुधार सका हूँ, तो कांग्रेस जैसी बडी पार्टी को कैसे सुधार सकता हूँ? आप इंदिराजी को बताईये की मेरा वोट जरूर व्ही. व्ही. गिरीजी को मिलेगा लेकिन उसके लिए कांग्रेस में आनेकी जरूरत नहीं है।’’
प्र.स.प. व सं.सो.पा.चे १९७१ मध्ये परत एकदा एकत्रीकरण होऊन समाजवादी पार्टीची निर्मिती झाली. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात व पुढे जनता दल पार्टीच्या निर्मितीत एसेमनी भरीव योगदान दिले. समाजवादी पक्ष १९७७ मध्ये जनता दलात विलीन झाला. नंतरच्या काळात समाजवादी चळवळ राजकीयदृष्टय़ा कमकुवतच होत गेली आणि जुना समाजवादी पक्ष असा उरलाच नाही. मा.एस.एम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पलू म्हणजे त्यांना शोषित आणि वंचितांबद्दल वाटणारी कणव. नुसतीच कणव नाही तर त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी ते कायम धावून जायला तयार असत. अण्णांच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारची जादू होती. त्यांचे ते निळेशार डोळे जितके तेजस्वी होते, तितकेच करुणेने भरलेले होते. लाल-गोरी कांती, भव्य कपाळ आणि मागे ओढलेले भरदार केस. प्रत्येकाला असे वाटे की, या माणसाकडे गेलो तर आपली व्यथा, आपले दु:ख निश्चितच कमी होईल. सानेगुरुजी जर आधुनिक महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत होते, तर एसेम हे आधुनिक महाराष्ट्राचे राजकारणी संत होते. एस.एम.जोशी यांचे १ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अभय जोशी निवृत्त विंग कमांडर(मा.एस.एम.जोशी यांचे चिरंजीव)
Leave a Reply