महाराष्ट्रातल्या एसटी डेपोचा चेहरा एकसारखा असतो, किंबहुना तो वेगळा नसतोच. मोठ पटांगण. त्याच्या एकाबाजूने एसटी येण्याचा मार्ग, दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग व मध्यभागी डेपो. येण्याच्या मार्गाच्या सुरवातीला उसाच गुऱ्हाळ, त्याच नाव कनिफनाथ रसवंती गृह. मालक फडतरे बंधू, मला न उलगडलेलं एक कोडं आहे की सगळ्याच उसाच्या गुऱ्हाळाची नावं कनिफनाथ व मालक फडतरे बंधू का ? हा फडतरे कधी एकटा का नसतो ? किंवा दुसरा कोणी का नसतो.? त्याच्या पुढे एखाद्या युरिया खताचा, tractorच्या जाहिरातीचा,शेतीच्या अवजाराचा LIC चा फलक,एखाद्या स्थानिक पुढाऱ्याच्या वाढदिवसाचा फलक, झळकत असतात.त्याच्यापुढे एसटीच आगर असते.तिथे बाहेरून आलेल्या बस उभ्या असतात. त्याच्या पुढे एसटी मंडळाने बांधलेले स्वच्छतागृह असते.त्याला स्वच्छता गृह का म्हणायचे हे एक कोडे असते कारण तिथे गेल्यावर स्वच्छ होऊन यायच्या ऐवजी अस्वच्छ होऊन येण्याची शक्यता जास्त असते.नाही म्हणायला हल्ली सुलभ शौचालये बांधून थोडीफार सोय केलेली असते.
डेपोच्या मध्यभागी एसटी सुटायची इमारत असते.त्याला आठ ते दहा फलाट असतात.प्रत्येक फलाटाला नंबर, त्यावर सुटायच्या गावाची नावे असतात. इमारतीच्या एका टोकाला नावापुरती रिझर्वेशनची खिडकी असते.खर तर रिझर्वेशन हि संकल्पना एसटी महामंडळाच्या पचनी पडत नाही. वरच्या मजल्यावर कार्यालय व बदली ड्रायव्हर, कंडक्टर यांची उतरायची सोय असते. खाली डेपोच्या मध्यभागी चौकशी व एसटीच्या माहितीची छोटी केबिन असते.त्यात बिचारा एक कर्मचारी खाकी कपडे, डोक्यावर सफेद गांधी टोपी.घालून बाजीप्रभूच्या आवेशात खिंड लढवत असतो. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, माईक वरून गाड्यांची माहिती, बस ड्रायव्हर,कंडक्टरना सूचना,शिताफीने हाताळत असतो. ”सातारा कोल्हापूर व्हाया विटा बस क्रमांक ४२५८ फलाट क्रमांक ७ वर उभी आहे.मुंबईहून आलेली, सांगली बस थोड्याच वेळात फलाट क्रमांक २ वर येत आहे” .प्रत्येक फलाटाच्या दोन्ही बाजूला लोकांची बसायची धक्क्याची सोय असते.त्याच्या बाजूच्या भिंतीवर वेळा पत्रक असते.काही गाड्यांच्या बदललेल्या वेळावर नवा कागद डकवलेला असतो ,त्याच्या वर जाहिराती त्याच्या बाजूला संभाजी बिडीचा फलक,हा पूर्वी जाहिरातीचा अविभाज्य भाग असे. पण आता तंबाखू आरोग्याला धोकादायक म्हणून त्याचा बोर्ड काढून टाकलेला. गाय छाप तपकिरीची जाहिरात,पण तपकीर आरोग्याला अपायकारक आहे कि नाही याचा निर्णय नीटसा न झाल्याने तो तसाच टांगलेला असतो.फलाटाच्या बसायच्या धक्क्यावर बाप्ये गप्पा हाणत असतात. चंची काढून पान लावत असतात.खाऊन झालेल्या पानाची सणसणीत पिचकारी भिंतीच्या कोपऱ्यात मारतात. प्रवाश्यात कोणी टोपीवाले, तर कोणी मुंडासेवाले,कोणी लेंगा झब्बावाले तर कोणी शहराचं वांर लागलेले,शहरी कपड्यातले,तीच तऱ्हा बायकांची,कुणी नऊवारी व खणाच पोलके घातलेली बाई, तिची सून गोल साडीतली, तर नात पंजाबी ड्रेस मधली. एखादी बाई मुलाच्या मागे पळत असते तर कुणी मुलाला पदराखाली घेतलेले असते.
एखाद्या फलाटावर बाहेरगावाहून आलेली एस्टी उभी असते.त्याचा ड्रायव्हर शर्ट सीटला अडकवून बनियानवर खाली उतरतो. तंबाखूचा बार भरून तो ऑफिसात जातो.कंडक्टर आत्तापर्यंत जमलेल्या पैशाचा हिशोब जुळवत असतो. ते झाल्यावर तोही पाय मोकळे करायला खाली उतरतो. एसटीतील काही प्रवासी खाली उतरलेले असतात.तेव्हढ्यात बिचारे उभे प्रवासी तात्पुरते बसून घेतात.एसटीच्या चारही बाजूनी, बोरवाले,काकड्या,केळी विकणारे,चिक्की विकणारे,वडाला प्रदक्षिणा घालावी तसे बसभोवती फिरत असतात.एखादा कोल्ड ड्रिंकवाला, ज्याने एसटी वाल्यांना पटवलेले असते तो बसमध्ये येऊन कोल्ड ड्रिंक विकतो. डेपोच्या एका कोपऱ्यात फळवाला व पुस्तक बुक डेपो असतो.हे दोघेही तिथे का असतात हे न उलगडलेलं कोडं असतं त्यांचा आणि विक्रीचा काडीचाही संबंध नसतो.मालकाने बसवले आहे म्हणून बसायचं. बुक डेपो मध्ये स्थानिक वर्तमानपत्रे, स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके,मासिके असतात.गीतेत स्थीतप्रज्ञ कोणाला म्हटले आहे याची कल्पना नाही पण बुक डेपोवाला तरी मला स्थित्प्रज्ञ वाटतो. कारण तो रात कि जवानी सारखी आणि अध्यात्मिक पुस्तके निरपेक्ष बुद्धीने बाजबाजुला मांडून अवकाशात बघत बसलेला असतो.
डेपोच्या एका टोकाला हॉटेल असते.ते कायम गजबजलेले असते.सगळ्या हॉटेलचा चेहरा सारखाच असतो.दरवाज्याच्या समोर मालकाची बसायची जागा असते. ती जराशी उंच असते.त्याच्या बसायच्या मागच्या बाजूला ज्याच्या कृपेमुळे हॉटेलचा ठेका मिळाला त्याचा किंवा एखाद्या देवाचा मोठा फ्रेममधला फोटो असतो त्याला भला मोठा हार,फोटो भोवती इलेक्ट्रिक माळ असते. बसण्याच्या जागेसमोर उंच धक्का त्यावर संगमरवरी कडप्पा असतो. त्यावर लाडू, उपासाचा चिवडा,गोळ्या,चोकलेट,यांच्या भरलेल्या बरण्या असतात.समोर बसायची बाकडी व खुर्च्या असतात. हॉटेलच्या एका बाजूला उंच, काचेच्या दरवाज्याच कप्पे असलेल लाकडी कपाट असते . त्यात भजी, वडे, मिसळ पाव,शेव बुंदी व त्यावर ,पदार्थ गरम राहण्यासाठी मोठा इलेक्ट्रिक बल्ब असतो. त्यामधील पदार्थ ताजे असतात का हा प्रश्न गैरलागू असतो.तो खाणाऱ्याला सुद्धा पडत नाही.भटार खान्याच्या समोर प्यायला द्यायच्या पाण्याचा ड्रम असतो.त्यात आपली पाचही बोटे बुडवून पोऱ्या ग्लास गिऱ्हाईका समोर ठेवतो. नाही म्हणायला पुण्या, मुंबईच्या जंटलमन लोकांसाठी फ्रीजमध्ये बिसलेरी बाटली असते.ऑर्डर घेणारा कानाला पेन लाऊन टेबलामधून फिरत असतो.कोणी काय खाल्ल आहे याची बिल फाडत असतो.हॉटेलच्या एका टोकाला बेसिन असते.त्याचा नळ हा एक मजेशीर प्रकार असतो. तो उघडला कि तोटीतून पाणी यायच्या ऐवजी भसकन तोंडावर पाणी येते. असा हा बस डेपो उन्हाळा,पावसाळा,हिवाळा तिन्ही ऋतू व वेगवेगळी माणसे अंगावर झेलत उभा असतो व सगळे निरपेक्ष दृष्टीने पाहात उभा असतो.
–रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply