कुटणे, दळणे, भरडणे, कांडणे, सडणे,फोडणे, वाटणे …केवढ्या या क्रिया ! आणि त्यासाठी पूर्वी घराघरातून जाती,( किमान २ /३ प्रकारची ), पाटा-वरवंटा, खलबत्ता , रगडा, उखळ-मुसळ अशा गोष्टी असायच्याच ..दगडी वस्तूंना टाकी लावून घेणे, लाकडी वस्तू नीट साफ करणे, लोखंडी वस्तू धुतल्यावर गंज लागू नये म्हणून नीट पुसून ठेवणे अशी केवढी उस्तवा र असायची ! मसाल्याचे काही नाजूक पदार्थ आणि औषधे कुटण्यासाठी पितळी किंवा संगमरवरी खलबत्ते असायचे. रोजच्या छोट्या कुटण्यासाठी जमिनीतच वायन असायचे. मेंदी किंवा अफू वाटायला वेगळ्याच आकाराच्या वरवंट्याचे पाटे असत.हलकी किंवा जड अशी २ प्रकारची मुसळे असत. पण ..पण साला एक मिक्सर आला ….आणि या सगळ्यांची वाट लागली ! मराठी भाषेतून कांही वर्षांनी ही सर्व क्रियापदेच बाद होतील. लग्नात घाणा भरतांना पाटा-वरवंटा, जाते , मुसळ यांचा सन्मान होई. देव देवतांनी असुरांशी लढताना मुसळ हे हत्यार म्हणून वापरले होते. बारशाला तर तान्हुल्याच्या आधी वरवंट्याचा केवढा मोठा मान !
तसेच कायम अग्नी जपून ठेवणारे गावचे अग्निहोत्र म्हणजे -चूल वैल ! ज्या चुलीवर जेवण शिजवले जायचे त्यातच वैश्वदेवाच्या आहुतीही दिल्या जायच्या. हे सगळंच आता वेगाने नाहीसे होतंय.
यातील काही वस्तूंच्या ३-४ इंचाच्या सुंदर प्रतिकृती मला अलीकडे नाशिकला मिळाल्या. जाते,पाटा वरवंटा, रगडा हे अस्सल दगडाचे,चूल-वैल मातीची ,लोखंडी खलबत्ता ( तुळशीबाग),लाकडी उखळ-मुसळ.. अशा सुंदर वस्तू !! एका मित्राच्या खूप महागड्या flat मधील नवीन “किचन” च्या सजावटीसाठी मी या वस्तू त्याला दिल्या. त्या त्याला आणि पाहणाऱ्यांना खूप आवडल्या . माझ्या संग्रही तर या गोष्टी आहेतच पण त्याचा असा प्रचार झाला तर निदान आठवणी तरी टिकून राहतील !!
–मकरंद करंदीकर
Leave a Reply