डॉ. लागू. काय लिहावं या माणसाबद्दल!! त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे अनेक लेख पुढील काही दिवसात आपण वाचू. मी ते करत नाहीये. मी फक्त मला सर्वात भावलेल्या लागूंच्या एका भूमिकेबद्दल थोडसं लिहीणार आहे. ती भूमिका म्हणजे ‘सामना’ चित्रपटातील मास्तर.
रस्त्यावर दारु पिउन पडलेल्या एका व्यक्तीला एक वजनदार राजकीय पुढारी हिंदुराव धोंडे पाटील दया दाखवून आपल्या घरी घेउन येतो..हा दारुडा गुप्तचर विभागाचा असेल अशी शंका येउन त्याच्यावर नजर ठेवण्याच्या उद्देशाने त्याला कामावर ठेवतो..त्याची रहाण्या खाण्याची सोय करतो. पण हा दारुड्या, ज्याला तो मास्तर नावाने बोलवत असतो…त्या पुढा-याची पापकर्मांची चौकशी करु लागतो विशेषतः ‘मारुती कांबळेचं काय झालं’ हा गावात दबक्या आवाजात विचारला जाणारा प्रश्न उघडपणे विचारु लागतो तेंव्हा मात्र खरा सामना रंगतो…दोन व्यक्ती..एक कफल्लक माणूस..ज्याला जगण्याची आसक्ती राहीलेली नाही…आणि दुसरा बेरकी पुढारी ज्याने पूर्ण साम्राज्य उभे केलय..जे आता धोक्यात आहे.
मित्रहो..सामना पाहिला नाही असा मराठी चित्रपट रसिक विरळाच म्हणावा लागेल. तो चित्रपट गाजला ते या चित्रपटाचे जबरदस्त पटकथा संवाद (दस्तुर खुद्द विजय तेंडूलकर) व तितकेच अफाट दिग्दर्शन केलेल्या जब्बार पटेल यांच्या मुळे. पण चित्रपट पूर्ण पेलला आहे निळू फुले व श्रीराम लागू या कमाल जोडगोळीने. निळू फुलेंना एक बेरकी पुढारी रंगवणे तितके चॕलेंजिंग नव्हते..कारण अशा भूमिका त्यांनी याआधी पेलल्या होत्या. पण डॉ लागूंचे या चित्रपटातले काम हे इतक्या उच्च दर्जाचे आहे की ते एखाद्या ॲक्टिंग स्कुलमधे प्रमाण म्हणून घेतले जावे.
चित्रपटाच्या सुरवातीचा दारुड्या, मध्यंतरी सुधारलेला व हिंदुरावांच्या फॅक्टरीत काम करणारा विश्वासू पण शेवटी सत्याचा छडा लागावा यासाठी उपोषण करणारा एक चळवळ्या माणूस ही जी रेंज डॉ. लागूंनी दाखवलीय, तिला तोडच नाही.
हा चित्रपट मराठी चित्रपटांसाठी जसा माईलस्टोन होता तसा तो डॉ लागूंसाठीही होता.त्यांच्या अनेक अविस्मरणीय भूमिका मराठी व हिंदी चित्रपटांत मी पाहिल्या आहेत पण सामना मधला मास्तर मी आजन्म विसरु शकणार नाही.
— सुनील गोबुरे.
Leave a Reply