बघ ना सखे, कसं आभाळ गच्च दाटलंय
मनात तुझ्या आठवणींचं काहूर माजलंय…
चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
अंगी झोंबे हा गार गार वारा
मोहरून तुझ्या आठवणीने, येई देही गोड शहारा
उबदार घट्ट मिठीत घेऊन, मला बिलगशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
सखे सुरू झालाय, आता वीजांचा कडकडाट
हिरवी होईल धरती अन् ओली चिंब पायवाट…
थोडी सावरत अन् बावरत, हात माझा हाती घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
धुंद कुंद ओल्या क्षणी, येऊ दे आता प्रेमाला बहर…
तप्त धरणीच्या मिलनासाठी “तो”ही करेल कहर
त्याच्यासारखीच मिलनाची ओढ, तुला देखील लागेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
निसर्गाच्या अमृतधारांनी, मन न्हाऊन निघतंय
आठवणींच्या हिंदोळ्यावर, उगाच झुलत राहतंय
पुरे झाल्या आठवणी, आता सामोरी तू येशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
ऊन-पावसाच्या लपंडावात, बघ इंद्रधनुही साकारले
सप्तरंगांच्या या खेळात, झाले तुझेही मन बावरे
बावऱ्या तुझ्या या मनात, प्रेमाची पालवी फुटेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
बरसू दे त्याला मनासारखं, आपण मात्र एकांत शोधूया
आडोशाला उभे राहून, एकमेकांच्या मिठीत विसावूया
गोऱ्या गालावरून थेंब ओघळताच, लाजून हसशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
तसा आत खोलवर पाऊस, माझ्या रोजच बरसतो आहे
डोळ्यांतील आसवांसवे, नित्य ओघळतो आहे
उधाणलेल्या माझ्या मनाचा, किनारा तू होशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
©श्री. अल्केश प्रमोद जाधव®
अलिबाग, रायगड
Leave a Reply