सांग ना…..असावे की नसावे?
असून नसण्यापेक्षा नसावेच?
नसण्यापेक्षा नावापुरते तरी असावे?
किती ना हा भावणाकल्लोळ…..!!
तुझं वीन झुरावे की तुझ्या साठी?
विरहात तुझ्या मरावे की मरून तुला विरहात लोटावे?
तुझ्या आसक्तीचा आग्रह की तुझ्याविना विरक्ती ?
किती ना ही समभ्रमावस्था……!!
तुझ्या बाहुपाशात मोहरावे की स्वतःला चुरगळुन घ्यावे ?
तुझ्या प्रीतसागरात डुंबावे की बुडून जावे?
आपण साथीने चालावे की तुझ्यात एकरूप व्हावे?
किती ना ही समर्पणता…..!!
तुला चिंतावं की तुझ्या चिंतेत जगावं?
तुला पूजावं की पूजेत तुला मागावं?
तुझ्या साठी जगावं की जगण्यात तू असावं?
किती ना ही एकरूपता…..!!
माझ्या जगात तू असावं की माझं जगच तू असावस?
माझ्या मनात तू असावं की माझं मनच तू असावस?
माझ्या श्वासात तू असावं की माझा श्वासच तू असावस?
किती ना ही समरसता….!!
सांग ना……. असावे की नसावे?
आपण भिन्नतेत एक असावे ?
की आपण भिन्न नसावेच?
किती ना ही अढळता ……!!
तुझ्या वीन काही नसावे
तू असल्यास बाकी काही नसावे
आपण असावे……….
फक्त अन फक्त आपणच असावे
सांग ना ………असावे की नसावे????
विशाल झावरे पाटील
01/02/2023
Leave a Reply