लाभाविण ममप्रीतीत रंगुनी
नित्य तूही अनवाणी चालली
मीही, चाललो तुझ्या सवे
आली सांजकेशरी नभाळी।।
क्षणभरी, पाहु मागे वळूनी
अंकुरल्या प्रीतकळ्या ज्यावेळी
हसले दवबिंदु हिरव्यापर्णी
हॄदयी, प्रीत गुंतली आपुली।।
प्रीतफुले फुलता बाग बहरली
जीवनी सुखदा हिंदोळी झुलली
रमता, प्रीतीत तू भान हरपली
चाललो, मीही तुझ्याच पाऊली।।
विवेके, संयमे आपण जगलो
कधी संसारी बोचलीही शब्दुली
तरी शब्दात होती निःसीम प्रीती
श्वासाश्वासात साथ तुझी लाभली।।
उतरता, बघ आता सांजवेळा
घुमते, बघ मुरलीधराची मुरली
खुणावतो आता श्रीरंग सावळा
स्पंदने, तुजसवे कृतार्थ जाहली।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १२५.
२९ – ४ – २०२२
Leave a Reply