बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना.
इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता.
उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती.
सगळीकडे फुललेल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या.
सर्वप्रथम ज्येष्ठ वयोवृद्ध काकासाहेब आणि काकींनी उभयतांचं स्वागत केलं.
त्यानंतर आश्रम व्यवस्थापकांचं स्वागतपर परंतू सकारात्मक भाषण झालं.अनुभव कथन,मौज मजा मस्ती ह्यावर प्रत्येकानी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
सजीव चित्ररथातून जगण्याचा मुलमंत्र दाखवण्यात आला.आणि शेवटी मिष्टान भोजनाचा आस्वाद,मुखशुद्धी होताच नविन समाविष्ट झालेल्या दाम्पत्याला पायघड्या घालून त्यांंच्या खोलीत रितसर पोचवण्यात आलं.
एक एक करून सगळेच ज्येष्ठ आपापल्या खोल्यांमधे परतले.
संध्याताई,सुधाकरराव आज एकवर्षापुर्वी आयुष्याच्या सांजवेळी बरोबर तिन्हीसांजेला या आश्रमात आले होते.
निराश मनाला,हताश जगण्याला नवसंजिवनी मिळाली ,ती ह्याच आश्रमात .
आज मात्र दोघेही या आश्रमाचे सुत्रधार होते. सांजवेळेला प्रभातवेळेत बदलवण्याचं कसब ते शिकवण्यात तरबेज झाले होते.स्वत:चे दु:ख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रु पुसावे ह्याचं साधं सरळ सोपं सुत्र ते साऔजवेळी सगळ्यांना शिकवत होते.
ही “मंतरलेली सांजवेळ” आज सगळ्यांनाच हवी हवीशी होती.
सौ.माणिक शुरजोशी.
नाशिक
Leave a Reply