वाहिन्यांचा कल्लोळ एवढा झाला की, यामुळे भारताच्या सांस्कृतिक मनोरंजनाची नुसती खिचडी झालेली आहे, त्यामुळे एखादेवेळी का विरंगुळा म्हणून या इडियट बॉक्सचा उपयोग करुन घेतो म्हटले तरी तो निव्वळ इडियटपणाच ठरतो यात तिळ मात्रही शंका उरली नाही. यात काही अपवाद सोडले अन् मनोरंजन होवू लागेल तर ‘कमर्शिअल ब्रेक’ची आडवी टांग ‘आड’ येते त्यामुळे आता पुन्हा एकदा खर्या रसिकाने नाट्यगृहे, सिनेमागृहे अथवा वाचनालये किंवा परिसंवाद, व्याख्यानमाला या प्रकाराकडे वळण्याचा विचार करायला हरकत नाही.
या वाहिन्यांवर जेमतेम मोजकेच कार्यक्रम चांगले असतात, न्यूज चॅनेल्स देखील रटाळ झालीत, एवढच कशाला ब्रेकिंग लाईन्सही डोकेदुखी होवू लागल्यात, मग रोज थकून आल्यावर थोड माईंड फ्रेश करायसाठी सारेगमपा अथवा करोडपती बरे वाटतात, राखी सावंतचा तर चेहरा बघावासा वाटत नाही, या बयेने म्हणे एका कार्यक्रमात एका इसमाला ‘नामर्द’ असा अशोभनीय शब्द वापरुन एवढे झापून टाकले की त्याने यामुळे नैराश्य आल्याने चक्क आत्महत्याच केली. त्यामुळे राखी सावंत नावाच्या प्रेक्षकांसाठी ‘बला’ ठरलेल्या बयेवर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीसात दाखल होण्याची वेळ आली आहे.
स्पर्धांच्या नावावर स्पर्धकांची मानसिक अवहेलना करुन आर्थिक शोषण करण्याचा ठेकाच जणू काही वाहिन्यांनी घेतला आहे त्यामुळे या स्पर्धाच जीवघेण्यात ठरत आहेत. कायद्याचे कोणतेही नियंत्रण नसल्याने मोकाट सुटलेल्या या वाहिन्यांचा हा ‘छळ खेळ’ प्रेक्षकांनी का सहन करायचा यावर विचारमंथन होणे आणि उपाय शोधणे आवश्यक आहे नव्हे तर हे उपाय त्वरेने अमलात आणून वाहिन्यावाल्यांचा हा ‘माज’ पुरता उतरविला पाहिजे. अन्यथा वाहिन्यांच्या या कल्लोळात घराघरात इडियटपणा वाढीस लागेल व नको ते प्रकार घडत राहतील. हा धोका खरतर लोकांनीच ओळखायला हवा, मध्यंतरीच्या काळात याविरुध्द ओरड झालीही होती त्यानंतर कोणती तरी एक नियंत्रण समिती देखील गठित झाली होती, काय तर
म्हणे वाहिन्यांसाठी आचारसंहिता देखील तयार करण्याचा घाटले जात होते पण असे करायला आमच्या देशात कोणाला वेळ आहे? कितीतरी काम आहेत. आदर्शसारखे घोटाळे उकरुन काढायचे आहेत, राष्ट्रकुल सारख्या गैरव्यवहारांची पाळंमुळं शोधायची आहेत, 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याला टांगतं ठेवायचं आहे. महागाईने पोखरलेल्या व त्रासलेल्या सामान्यांच्या जखमांवर मीठ चोळायचे आहे, आणखी कितीतरी देशाची मान लाजेने खाली जाईल अशी कामे करायची आहेत, वाहिन्यांवरील कल्लोळ ही क्षुल्लक गोष्ट आहे, त्यातून घरा-घरात कोणती महाभारतं घडतात याच्याशी कायदे बनविणार्यांना काय देणे-घेणे?
वाहिन्यांवर नुसता अनैतिकतेचा बाजार मांडलेला आहे. शंभरातली एखादी मालिका चारित्र्य संपन्न व्यक्तीमत्वावर आधारलेली असेल बाकी 99 मालिकांमधून अनैतिक संबंधानाच खतपाणी घातलं जात आहे. यामुळे देशातल्या घराघरातील तरुणाई वाम मार्गाला जात आहे याचं भान कुणालाचं राहिलं नाही. निदान पालकांनी तरी ही जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. आपल्या पाल्यांना जर वेळीच नियंत्रणात ठेवण्याचे कसब पालकांनी अंगिकारले नाही तर परिवर्तनाच्या लाटेत एखादा नवा चारित्र्य हननाचा प्रतिष्ठेचा अध्याय जुळायला वेळ लागणार नाही आम्ही आमच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. आपल्या पाल्यांचा होणारा छळ आपणच रोखू शकतो, कोणत्याही राखी सावंतला कोण्याही सज्जनाला नामर्द म्हणण्याचे धाडस यापुढे होता कामा नये. बाई च्या नावाखाली केवळ हसण्यासाठीचे लेबल लावून चाललेला पांचटपणा आपण खपवनू घ्यायलाच नको. ज्या बालविवाह प्रथेला हद्दपार करायचे म्हणून सुरु झालेल्या बालिका वधू मधील वधू यौवनात आल्यावरही रटाळ कथानक प्रेक्षकांच्या माथी मारण्याच्या प्रकाराला आपण का सहन करायचे. केवळ गाणं गाता येत नाही म्हणून थेट प्रेक्षकांसमोरच नवोदित गायकाला हटावण्याचा प्रकार हा सहन करायचा का यातून नवोदित कलाकार घडणार आहे की कल्लाकार निर्माण करायचे आहेत? हे तुम्ही आम्ही प्रेक्षकांनीच ठरवू या. कारण हा वाहिन्यांचा कल्लोळ समाज बिघडवायला निघाला आहे एवढं मात्र नक्की.
अतुल क. तांदळीकर
— अतुल तांदळीकर
Leave a Reply