पडवीतून गोठ्यात उघडणारं दार , आईनं रात्री उघडलं , तेंव्हाच लक्षात आलं , आज काहीतरी वेगळं घडणार आहे .
एरव्ही ते दार कायम बंद असायचं . दरवेळी मुख्य दरवाज्यातून बाहेर पडून , अंगणातून गोठ्यात जावं लागायचं .
पण आज वेगळीच घाई सुरू होती .
बाहेर काळ्याकुट्ट रात्रीबरोबर गोठवून टाकणारी थंडी वाढत होती . आणि आम्ही ओटीवरच्या माच्यावर बसून सगळी घाई बघत होतो . मध्येच मदतीच्या नावाखाली थोडी लुडबूड केली पण अण्णांनी उबदार शालीत गुंडाळून माच्यावर बसवून ठेवल्यानं नाईलाज झाला होता . आम्हाला तिथं बसवून , अण्णा न्हाणीघरातील मोठ्या पाणचुलीत लाकडं पेटवायला गेले होते . आईनं त्यांना मोठ्या हंड्यात पाणी तापवायला सांगितलं होतं .
भिंतीवरच्या खुंटीवर अडकवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात आईची लगबग दिसत होती .
पडवीत आईनं पेंढा अंथरला होता आणि पडवीतल्या रेज्याला पेंढ्याची एक पेंडी बांधून ठेवली होती .
गोठ्यात गेलेली आई , कपिला गायीला घेऊन आली आणि तिचं दावं , खांबाला बांधलं .
कपिला गाय आमची लाडकी होती . पण आज ती वेगळीच दिसत होती . पोट खूप फुगलं होतं . ती चमत्कारिक चालत होती . खूप दमल्यामुळं मलूल व्हावं , तशी ती मलूल झाली होती .आणि तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं . खांबाला बांधल्यानंतरसुद्धा ती सतत इकडे तिकडे फिरायचा प्रयत्न करीत होती . मध्येच हंबरत होती . कसल्या तरी वेदना तिला होत होत्या .
आणि आई मात्र तिच्या अंगावरून मायेनं हात फिरवत होती . मध्येच पदरानं कपिलेचे वाहणारे डोळे पुसत होती .
आणि गंमत म्हणजे एरव्ही आम्हाला जवळ येऊ न देणारी कपिला आज आईला चिकटून उभी रहात होती . आईच्या अंगाला मान घासत होती. आणि आई तिला तेवढ्याच मायेनं जवळ घेत होती .
– आम्हाला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही .
सकाळी गायीच्या हंबरण्यानं जाग आली आणि आम्ही ताडकन उठून पडवीत आलो .
आणि बघत राहिलो .
कपिलेजवळ हरणाचं पाडस उभं असावं असं एक गोड , गोंडस वासरू धडपडत उभं होतं . आणि कपिला त्याला जिभेनं चाटत होती . आई त्या वासराला कपिलेजवळ धरून बसली होती . आणि दुसऱ्या हातानं हळुवारपणे वासराला गोंजारत होती .
” तुमच्या आईनं केलं हो बाळंतपण कपिलेचं , अगदी हलक्या हातानं .”
अण्णा सांगत होते .
पण ते काय बोलत होते , त्याचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता .
सगळं लक्ष त्या वासराकडे होतं .
– आज इतक्या वर्षांनी आईचा मायाळू स्पर्श जाणवला .
एसटी बसमधून घरी येताना बाहेर सहज लक्ष गेलं .
रस्त्यात एक गाभण गाय कुणाची तरी वाट पहात असल्यासारखी दिसली . ती अस्वस्थ होऊन फिरत होती . आणि तिच्या तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं.
मग मला लहानपणीची कपिला गाय आणि तिच्या अंगावरून मायेनं हात फिरवणारी आई आठवली .
एसटी ने आता वेग पकडला होता आणि ती रस्त्यावरची गाय दृष्टीआड झाली होती .
पण माझ्या डोळ्यासमोर आई लख्ख उभी राहिली .
– न्हाणीघराची पडवी म्हणजे आईचं एकछत्री साम्राज्य होतं .
माजघरातून न्हाणीघरात जायला दार होतं , पण आईनं तिथून कधीच ये जा केली नाही . स्वयंपाकघरातून न्हाणीघरात जायला जे दार होतं , तिथून ती जात येत असायची .
उन्हाळ्यात रातांब्याची उस्तवार करण्यासाठी तिला न्हाणीघर बरं वाटायचं . रातांबे फोडायचे , सालं वाळत घालायची आणि बिया पिळून झाल्या की त्याचे मोठाले लाडू तयार करून ते अंगणात वाळत घालायचे आणि नंतर पावसाळ्यात रातांब्याच्या वाळलेल्या बिया कुटून त्याचं कोकमतेल बनवायचं .
हा तिच्या अनेक व्यापातला एक भाग होता .
एरव्ही आवळ्याची सुपारी , फणसाच्या गऱ्याची भाजी , सुपाऱ्या सोलून वाळत घालायच्या , शेतातून हळद , आलं आणून त्याची उस्तवार करायची , आंब्याच्या दिवसात बेगमीचं लोणचं , बेगमीची उसळी मिरची , उकडांबे हे सगळं करताना तिचा दिवस केव्हा सरायचा हे तिला कळत नसे . तिच्या हातच्या पदार्थांची चव अन्य कुणाच्या पदार्थांना येत नसे . अण्णांच्या शब्दात सांगायचं तर , ‘ती जीव ओतते सगळ्या गोष्टीत .’
एकदा अण्णांनी मला हळूच माजघराच्या दारात नेलं आणि लहानशा फटीतून बघायला सांगितलं .
मी बघू लागलो .
आई मोहरीचे उकडांबे घालत होती . प्रत्येक आंबा पुसून त्याला हळुवारपणे गोडेतेल लावून बरणीत ठेवत होती . आणि त्या आंब्यांशी गप्पा मारत होती. ” आता नीट आत रहा , चांगलं पुसून , तेल चोपडून ठेवलंय , एकमेकांना घासू नका , नाहीतर साल तुटेल . गुण्यागोविंदानं नांदा …” असं बरंच काही बडबडत होती .
मला हसू आलं .
” कोण हसतंय मोठ्यांदा ? ”
आई ओरडली खरी पण मग तीच हसू लागली . दार उघडलं .
” अरे , आंब्यांशी बोललं , हलक्या हातानं त्यांना हाताळलं , तर बरं वाटतं त्यांना . हसता काय सगळे ? त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ पण जातो माझा .”
अण्णा कपाळावर हात मारून हसत बाहेर गेले .
मी आईच्या बोलण्यातलं तथ्य शोधत बसलो .
आईला हे सगळं करायला वेळ केव्हा मिळतो , हे कोडं कधीच उलगडलं नव्हतं . पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ती कामात व्यस्त असायची .
चेहऱ्यावर कधी थकवा जाणवला नाही आणि कामाबद्दल तक्रार ऐकायला मिळाली नाही . कामात चुकारपणा पाहायला मिळाला नाही आणि काम नाही म्हणून स्वस्थपणा बघायला मिळाला नाही . प्रसंगपरत्वे जुनी गाणी गुणगुणत , स्तोत्रे म्हणत आणि सवड झाली की असेल , मिळेल , दिसेल ते पुस्तक वाचत बसलेली असायची . त्यातूनच तिचं जीवनविषयक तत्वज्ञान बनत गेलं होतं .
सगळे सण आमच्याकडे आईच्या स्पर्शानं पावन व्हायचे .
प्रत्येक सणाला खास काहीतरी असायचं .
मग कधी ते ठिपक्यांच्या रांगोळीत दिसायचं . कधी गणपतीत आरास करताना दिसायचं . दिवाळीत आकाशकंदील तयार करताना दिसायचं .
आम्हाला गणपतीच्या मूर्तीला हात लवायला परवानगी नसायची . पण चतुर्थीच्या आधल्या सायंकाळी मूर्ती घरी आली की आईबरोबर मूर्ती बघताना मजा वाटायची .
अण्णांच्या नकळत आई गणपतीला औक्षण करायची , त्याच्या गालावरून हात फिरवायची . रंगसंगतीचं कौतुक करायची . उंदीरमामाला गोंजारायची . बाप्पाला जपून आणलं म्हणून त्याच्यासमोर गूळ ठेवायची .
गणपती विसर्जनाच्या दिवशी ती रडवेली व्हायची , म्हणायची , ” चेहरा बघ कसा उतरलाय तो . जपून जा बाबा , आणि पुढल्या वर्षी लवकर ये ”
गणपतीच्या दिवसातल्या प्रत्येक दिवसाच्या भावना ती बोलून दाखवायची . गणपतीवर मानवी भावभावनांचं आरोपण कसं करायचं , ते तिनं शिकवलं .
– त्या दिवशी न्हाणीघरात रडण्याचा आवाज आला म्हणून मी बघायला गेलो तर , वाडीतली दरडातली लक्ष्मी रडताना दिसली .
आई तिला बडबडत होती .
“– रानडुकराचं मटण खायची गरज होती काय त्याला ? आठलीडोंगरातून अख्खा गाव त्या डुकराचा माग काढत होता . त्यात सगळा दिवस घालवलात , आणि वाट्याला काय आलं , तर वाटीभर मटण . ते सुद्धा पचवता आलं नाही , मग हे असं होणारच …”
आईनं मग तिला कसलं तरी झाडपाल्याचं औषध दिलं .
दोन दिवसांनी पुन्हा लक्ष्मी आली .
” आता काय झालं ? ”
” पोराच्या तोंडास चव नाय .”
आई आत गेली .
आणि चांद्याच्या पानांचा द्रोण तयार करून त्यात लिंबाचं लोणचं घालून दिलं .
” कायतरी मटण म्हावरं खाता नी आजारी पडता , त्यापेक्षा गरम भात , वरण खायला दे .”
ती बडबडत म्हणाली . लक्ष्मी निघून गेली पण खाण्यावर नेमकं भाष्य करून गेली .
आमच्याकडे प्रघातच पडून गेला होता . कुणी आजारी पडला की हमखास आमच्याकडल्या लोणचं , मिरचीला पाय फुटायचे .
कधीकधी मी रागावायचो .
मग ती म्हणायची ,
” आपल्याला देवानं काही कमी दिलेलं नाही . आणि मी तरी माझ्याकडचं कुठं काय देते ? जे देवानं दिलं , त्यातलंच तर मी त्यांना देते .”
असं काही आई सांगू लागली की राग पळून जायचा .
– आई अशी कुठून कुठून मनात उगवत राहिली .
कधी हौसेनं लावलेल्या हापूसच्या कलमांना स्वतः कळशीनं पाणी शिंपून निगराणी करणारी आई…
देवाला वाहण्यासाठी , अण्णांना भरपूर फुलं लागतात म्हणून स्वतः फुलझाडं लावून , झाडं बहरली की आनंदी होतानाची आई…
पासष्टच्या चक्रीवादळात झाडांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर कोलमडून गेलेली पण पुन्हा तितक्याच जिद्दीनं उभं राहण्यासाठी खंबीर बनलेली आणि आम्हाला खंबीर बनवणारी आई …
शिमग्यात पालखी नाचवणाऱ्यांचे खांदे सोलपटून निघाल्यानंतर त्यांना लोणी हळद देणारी आई…
एका शिमग्यातल्या आईचं रौद्ररूप अजून आठवतं .
आईचं आणि अण्णांचंसुद्धा .
गावकऱ्यांना शिमग्यात मोठी होळी , तीसुद्धा आंब्याच्या झाडाची लागायची .
दरवर्षी अशी अनेक झाडं तोडली जायची .
त्यावर्षी आमच्याकडील झाड तोडायला गावकरी पहाटे चारच्या सुमारास आले.
ढोल ताशांच्या आवाजाने आम्ही जागे झालो .
सगळे गावकरी आमच्या आवारातील मोठे झाड तोडायला आले होते .
आम्ही सगळ्यांनी विरोध केला , पण ते कुणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते .
कधी न भांडणारे आई अण्णा खूप भांडले , रागावले , झाड तोडायला विरोध केला .पण काही उपयोग होत नव्हता . शेवटी आईनं मला पुढं ढकललं , म्हणाली , ” जा त्या झाडाला मिठी मारून उभा राहा , तुला तोडल्याशिवाय त्यांना आंब्याला हात लावता यायचा नाही , जा , बघतोच आम्ही आता, ते काय करतात ते .”
आईचं हे असं रुद्ररूप मी कधी पाहिलंच नव्हतं .
मी तिरिमिरीनं पुढं झालो आणि त्या झाडाला घट्ट मिठी मारून उभा राहिलो .
पुढं काय होईल याचा विचारसुद्धा मी केला नाही . बिथरलेले आणि झिंगलेले गावकरी काय करतील याचा अंदाज नव्हता .
आणि तसंच झालं .
दोन चार गावकरी कुऱ्हाडी घेऊन पुढे आले . सगळ्यांचा श्वास अडकला . ढोल वाजवणारे अचानक थांबले . काहीतरी भयंकर घडणार याची कल्पना आली .
इतकावेळ भांडणारे , बडबडणारे गावकरी अवाक होऊन पाहू लागले .
कुऱ्हाडी घेऊन आलेल्यांकडे मी एकदा पाहिलं. आणि त्यांचा अवतार बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली .पण क्षणकालच . मी स्वतःला सावरलं . डोळे मिटून मी झाडाला चिपकून उभा राहिलो .
पण काहीच घडलं नाही . मी डोळे उघडले . आता सीन पालटला होता .
बाकीच्या गावकऱ्यांनी , अंगावर धावून येणाऱ्यांना आवरलं होतं .
आम्हाला शिव्या देत सगळे निघून गेले होते .
आई अण्णा धावत माझ्याजवळ आले .
आईचं रौद्ररूप मावळलं होतं .
ती धाय मोकलून रडत होती . माझ्या गालावरून तिचा हात फिरत होता . मध्येच ती झाडावरून हात फिरवत होती . पुन्हा रडत होती .अण्णा तिला सावरत होते .
” या झाडासाठी मी तुला पणाला लावलं .” एवढं बोलून ती मटकन खाली बसली .
खूप वेळानं आमचं घर सावरलं . त्यादिवशी आईनं पंचपक्वान्न करून नैवेद्य दाखवला . मला जवळ घेऊन ती म्हणाली ,
” आज तुझ्यामुळं माझं आणखी एक लेकरू वाचलं .” अण्णा हसत घरात आले . ” ही सायसाखरेची वाटी आंब्याच्या झाडाजवळ मिळाली .” ” मीच नेऊन ठेवली होती . त्यातली सायसाखर आंब्याच्या मुळांना लावली . आता उरलेली तुम्ही सगळ्यांनी खा . ”
सायसाखर ही आमची गंमत होती . साखरेची गोडी सायीत मिसळली की नातं घट्ट होतं. सायीची स्निग्धता सगळ्यांना सामावून घेते . असं आईचं तत्वज्ञान होतं . त्यामुळं कामात राबराब राबलेले आईचे हात कितीही खरखरीत असले तरी सायसाखरेसारखे मृदू मुलायम आणि गोड वाटायचे .
– आज सगळं आठवलं .
– एसटी थांबली . मी उतरलो . घरी निघालो . रात्र झाली होती . घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली . आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती .
सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती …
— डॉ . श्रीकृष्ण जोशी.
९४२३८७५८०६
रत्नागिरी.
Leave a Reply