नवीन लेखन...

साबुदाण्याची खिचडी

असा कोणी आहे का की ज्याला साबुदाण्याची खिचडी माहिती नाही ?माहिती तर सगळ्यांनाच असते पण हं, प्रश्न आवडीचा असतो. काहीजणांना खूप आवडत असते तर काहीजण आवडत नाही असं नाक मुरडून सांगतात. खरे तर साबुदाण्याची खिचडी आवडत नाही असे होत नाही, पण माझी खात्री आहे की ज्यांना ती आवडत नसते त्याचे मूळ कारण दातातल्या फटी असतात. त्या फटींमध्ये साबुदाणा किंवा शेंगदाणा अडकला की असह्य वेदना होतात आणि खिचडी न आवडण्याचे ते मुख्य कारण असू शकते. आपल्याकडे एक म्हण आहे ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसला हा प्रकार. असो.
साबुदाण्याची खिचडी म्हटले की “उपास”आलाच. हा उपास पण कधी जबरदस्तीने तर कधी आवडीने तर कधी वजन उतरविण्यासाठी,व अलीकडे तर detox साठी सुद्धा केला जातो. काहीजण तर खिचडी हक्काने खाता यावी म्हणूनही उपास करतात. आमच्या लहानपणी तर खिचडीच्या लालसेनेच आम्ही उपास करत असू. पण कसे आहे ना वय वाढत जाते तसा उपास होत नाही. मग डायबिटीस चे कारण असो की दातांच्या फटीचे.

उपासाची आणखीन एक गंमत असते बर कां मित्रांनो, सहलीसाठी चार दिवस गेलो तरी एक उपास तर येतोच. व सवयीप्रमाणे आपण तो करतोच. बहुतेक ठिकाणी उपासाची खिचडी खायला मिळतेच नाहीतर वेफर्स तरी मिळतात त्यामुळे फारसा विचार करण्याची वेळ येत नाही.

खिचडीचा एक मजेदार प्रसंग आठवतोय. 1977 मध्ये आम्ही भावनगरला होतो. आम्हा काही कुटुंबीयांची बरोबर बरोबरच बदली झाली होती. आमच्या एका मैत्रिणीला ताबडतोब स्वयंपाक वाल्या बाई मिळाल्या होत्या. ती बाई स्वयंपाकपाणी चवीक करत असे. एकदा आम्ही काही मंडळी दुपारच्या वेळेस मैत्रिणीकडे रमी खेळायला गेलो. शनिवार होता. मॅडमने अस्सल मराठ मोळा साबुदाणा खिचडीचा बेत केला. आम्हा सर्वांना गरम मिळावी म्हणून बाईला 5 च्या सुमारास फोडणी घालायला बोलावले. बाई येण्यापूर्वी तिने सगळी जय्यत तयारी करून ठेवली अगदी मिरची बटाटे कोथींबीर चिरण्यापासून ते नारळ खवण्यापर्यंत सगळे. बरोबर पावणे पाचला बाई आली. खेळण्यात गर्क असलेल्या मैत्रिणीने बसल्या जागून ऑर्डर सोडली “कमला बेन सगळी तयारी करून ठेवली आहे खिचडी फोडणीला घाला “. रमीचा डाव व सोबत गप्पांनी रंग पकडला होता. काही वेळाने कुकरची शिट्टी ऐकू आली… एक… दोन… तीन.. मैत्रीण गोंधळली. कुकरची शिट्टी ?.. तिने हातातले पत्ते टाकले व किचन कडे धाव घेतली.. तिच्या सोबत आम्हीही. स्वयंपाक खोलीतला प्रकार पाहून अक्षरशः कपाळाला हात लावला. बाईने भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, तूप, जिरे व चिरलेल्या सगळ्या जिनसा व चवीला गूळ आणि पाणी घालून मस्त मऊ मऊ साबुदाण्याची खिचडी, हं, खिचडी नाही तिखट गोड लापशी बनवली होती. ह्यात बाईंची काही चूक नव्हती तिच्याकडे खिचडी म्हटले की अशीच करतात. पण आम्ही ही कधीही न विसरणारी लापशी कम खिचडी खाल्ली. आहे की नाही गंमत ?

काश्मीरची तर अजून मजेशीर खिचडी. ह्या काश्मिरी लोकांना आपल्या केसरी ट्रॅव्हल्स वाल्या मंडळींनी साबुदाणा खिचडी करायला शिकवली आहे. तिथल्या लोकांनी त्यामध्ये आपल्या पद्धतीने सुधारणा केली आहे. शेंगदाणा कुटा ऐवजी अक्रोड बदामाचा मिक्स कूट, शुद्ध केसर, वेलची पावडर, व लवंगीवर फोडणी घातलेली “special kashmiri sabudana khichdi “अतिशय प्रेमाने आम्हाला खाऊ घातली आहे.

वैष्णव देवीची हळद, बडीशोप घातलेली उपास special साबुदाणा खिचडी तर आपल्यापैकी बहुतेकांनी खाल्ली असेल.
आणखी एक प्रसंग. .. एकदा बालीला जाण्याचा योग आला. आठवडाभराच्या वास्तव्यात चतुर्थी येणार हे नक्की होते. बालीची संस्कृती खूपशी हिंदू संस्कृतीच्या जवळची आहे असे ऐकले होते. त्यामुळे तिथे उपासाचे काही ना काही नक्कीच खायला मिळेल ही खात्री होती. आमच्या एका फॅमिली friend ची कर्मा क्लब ची मेम्बरशिप होती. त्यांना भलामोठा 3 बेडरूम, स्विमिंग पूल, पॅन्टरी असलेला व्हीला दहा दिवसांसाठी मिळाला होता. आम्ही तीन कुटुंबे गेलो होतो. ही राहण्याची जागा गावापासून बरीच लांब होती त्यामुळे तिथेच खात होतो. अक्षरशः तिप्पट किंमत मोजावी लागत होती. जितके पदार्थ खात होतो त्यातल्या कुठल्याच पदार्थाची चव आपल्या पदार्थाच्या जराही जवळची नव्हती infact त्या चवीचा व आपल्या चवीचा दूर दूर पर्यंत काही संबंध नव्हता. इतकेच काय फोडणीचे तेल सुद्धा माशाचे. त्यामुळे चतुर्थी कडक करावी लागणार हे लक्षात यायला वेळ लागला नाही.

आमच्या समोर गहन प्रश्न उभा राहिला. त्यातून आम्ही सगळे सिनियर सिटीझन, काही न खाता राहणे शक्यच नाही. दुपारी restaturant मध्ये बसून ह्या गहन प्रश्नावर आमची जोरदार चर्चा सुरु होती. उत्तर काही सापडत नव्हतं. शेवटी बाप्पालाच साकडं घातलं नाहीतर उपास सोडावा लागेल अशी त्याला warning पण देऊन टाकली.

अचानक मागच्या टेबलावर बसलेले दांपत्य उठून आमच्या जवळ समोरच्या खुर्चीवर विराजमान झाले. ते भारतीय असल्याचे आमच्या पटकन लक्षात आले. ते म्हणाले “नमस्कार मंडळी. मी करंदीकर व ह्या माझ्या सौ. मीना करंदीकर. आम्ही पुण्यावरून आलो आहोत “आम्ही नमस्कार करून आमचीही औपचारिक ओळख करून दिली.करंदीकर म्हणाले, “खरे तर आम्ही अजून चार दिवस राहणार होतो. पण घरी काही emergency आल्यामुळे आम्हाला आज रात्री जावे लागणार आहे. मुद्धा तो नाही. विषय तुमच्या पेक्षा थोडा वेगळा आहे. आमचाही चतुर्थीचा उपास असतो. आमच्या सौ. ने घरून येताना साबुदाण्याच्या खिचडीची सर्व कोरडी तयारी सोबत आणली आहे अगदी साजूक तुपापासून ते खोबर्यापर्यंत सगळे. आमच्या पुढे असा प्रश्न आहे की हे सामान परत माघारी न्यावे की काय ?इथल्या लोकांना तर देण्यात अर्थच नाही त्यांना तर हे काय ते समजणार सुद्धा नाही. व फेकून देणे मनाला पटत नाही. त्यामुळे आम्ही सकाळपासून बाप्पाला आळवत होतो “त्यांना मध्येच थांबवत सौ मीना ताई म्हणाल्या, तुमची हरकत नसेल तर ते सामान तुमच्या व्हीला वर पोहचवतो. तसे थोडे जास्तच सामान आहे. तुम्हाला पुरेसे होईल “त्याच क्षणी आमची त्यांच्या सोबत दाट मैत्री झाली. म्हटले “अहो चालेल काय पळेल. बाप्पाने इतके मोठे solution आपल्या सगळ्यांना दिले आहे. त्याचा मान तर ठेवावाच लागेल. हो की नाही “ह्यावर आम्ही सगळे मोठ्याने हसलो.

पुढील अर्ध्या तासाच्या आतखिचडीचे साहित्य व्हिला वर पोहचले. मग काय, दुसऱ्या दिवशी आनंदी आनंद. जोरदार खिचडी करून त्यावर ताव मारला. मनोमनी करंदीकरांचे आभार मानले. आम्ही तर खूषच पण कदाचित बाप्पा ही खुश झाला असेल. त्याने काय जोरदार डील घडवून आणले होते.

त्या दिवशी घरापासून हजारो किलोमीटर दूर खालेल्या त्या खिचडीचा आस्वाद लहानपणी हट्ट करून खालेल्या खिचडी पेक्षा फारच सुंदर आणि निराळा होता.

अशा ह्या साबुदाण्याच्या खिचडीच्या गमती जमती……..

–सौ वैजयंती गुप्ते

गांधीनगर गुजरात

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..