जुलै २००२ आणि जुलै २००३ मध्ये घडलेल्या दोन घटनांची एक आठवण…..
एप्रिल २००२ मध्ये विंडीज दौर्यात सचिन तेंडुलकरने सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याची गौरवपर भेट म्हणून फेरारी या विख्यात स्वयंचलित वाहनोद्योगाच्या कंपनीने त्याला ७५ लाख रुपये एवढ्या किमतीची फेरारी ३६० मोडेना (एंजिन मध्यभागात असणारी दोन लोक बसू शकतील अशी आरामदायी क्रीडा कार) देण्याचे ठरविले. २३ जुलै २००२ रोजी ब्रिटिश ग्रां प्रीच्या (कार ‘पळविण्याची’ स्पर्धा) उद्घाटनावेळी मायकल शूमाकरच्या हस्ते प्रतीकात्मक चावी सचिनला देण्यात आली.
४ सप्टेम्बर २००२ रोजी भारतीय संघराज्याच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सचिनला पत्र लिहून त्याच्या विक्रमाच्या गौरवार्थ सरकार त्या गाडीवरील सीमाशुल्क माफ करेल अशी माहिती दिली. (हे शुल्क सुमारे १ कोटी १५ लाख म्हणजे गाडीच्या किमतीच्या १२५% एवढे होत होते.) प्रचलित नियमांनुसार परदेशातून बक्षीस म्हणून मिळालेल्या गाडीला सीमाशुल्क माफ होते, ‘भेट’ म्हणून मिळालेल्या गाडीला नाही.
जुलै २००३ मध्ये सीमाशुल्कमाफीची बातमी प्रसिद्ध झाली आणि मग वादप्रवादांना ऊत आला. अर्थ मंत्रालयाने नियमात बदल घडवून आणला (असे म्हटले जाते) आणि ऑगस्ट २००३ मध्ये ही ‘मोडेना’ मुंबईत दाखल झाली.
मुंबईतील एका प्रसिद्ध पक्षनेत्याने आपले मत ‘सचिनने पाच पिढ्यांना संपणार नाही एवढे कमवून ठेवले आहे, त्याला अशी मुभा देण्याची गरज नाही’ अशा शब्दांत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या कृत्याचे समर्थन केले – केंद्रातील सरकार विरोधी पक्षाचे असूनही. (भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टानुसार सीमाशुल्क हा केंद्रसूचीतील विषय असल्याने तो केंद्रशासनाच्या अखत्यारीत येतो.)
दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली आणि ‘सचिन तेंडुलकर हा भारतीय नागरिक कायद्याहून मोठा नाही. त्याला अशी मुभा का देण्यात आली’ या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. सचिनने करमाफीसाठी अर्ज केला होता अशी माहितीही पुढे आली.
मग मात्र फियाट ग्रुपला जाग आली आणि ‘ज्या उदात्त उद्देशाने ही भेट देण्यात आली होती त्याला जागण्यासाठी’ फियाट ग्रुपने सीमाशुल्क भरण्याची तयारी दर्शविली. वस्तुतः हा शहाणपणा फियाटने ही ‘भेट’ भारतीय सार्वभौम शासनाचे नियम पाळून, ती कार भारतात आणून, मग ती सचिनला देऊन करावयास हवा होता.
सचिन असामान्य आहे, त्याच्यासंबंधीच्या चर्चा (आणि वादही) तसेच असामान्य असणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
Leave a Reply