२४ एप्रिल ला कुणाचा वाढदिवस असतो असे म्हटले तर तर प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या तोंडी एकच उत्तर असेल ‘सचिन तेंडुलकर’, होय त्याचा जन्म २४ एप्रिल १९७३रोजी झाला . मी त्याच्या जवळजवळ १५० स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. अगदी सुरवातीपासून ते रिटायर होईपर्यंत.
सचिन बद्दल सांगायला लागले तर खूप लिहावे लागेल. परंतु त्याचे रेकॉर्डस् सर्वाना तोंडपाठ आहेतच तरीपण सांगतो. त्याने कसोटी सामन्यात ५१ शतके आणि एकदिवसीय सामन्यात ४९ शतके केली आहेत. त्याची सर्वच सामन्यातील शतके मोजली तर किती आहेत माहीत आहे का…तब्बल २४१ शतके आणि ३९४ अर्धशतके..ही सर्व प्रकारच्या सामन्यातील आहेत. याचा कधी विचार केला आहे का. त्याने कसोटी सामन्यात १५,९२१ धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यात १८, ४२६ धावा. आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रकारातील सर्वच सामन्यातील धावा मोजल्या तर किती होतील माहीत आहे का…तब्बल ८१, ७४२ धावा. आता बोला. हा हिशेब कोणी केला आहे का ? त्याची कसोटी मधील सर्वाधिक धावसंख्या आहे नाबाद २४८ तर एकदिवसीय सामन्यात नाबाद २००.
मी सचिन तेंडुलकरच्या स्वाक्षऱ्या १९९० पासून घेत होतो, मुलुंडचे सतीश शिंदे यांचे तेंडुलकर सरांकडे जाणे येणे होते त्यामुळे सचिनचा बालमित्र आणि आता त्याचा उजवा हात समजला जाणारा रमेश पारधे यांची ओळख सतीश शिंदे यांनी करून दिली . रमेश पारधे माझ्या घरी १९९७ मध्ये आले माझा स्वाक्षरी संग्रह बघण्यास. त्यानंतर मी साहित्य सहवासमधील त्यांच्या घरी सतीश शिंदे यांच्याबरोबर गेलो होतो. पुढे मी जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकरला भेटत असे तेव्हा त्याची स्वाक्षरी घेत असे. रमेश पारधे यांच्यामुळे जरा ते अधिक शक्य झाले.
२०१३ साली भारतीय डाक (पोस्ट} विभागाने सचिन तेंडुलकर यांचे पोस्टल स्टॅम्प्स आणि फर्स्ट डे कव्हर्स काढले होते. मी २४१ फर्स्ट डे कव्हर्स जमा केली कारण सचिन तेंडुलकर यांने त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत २४१ शतके केली आहेत. ही शतके त्यांने कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट,फर्स्ट डे क्रिकेट आणि लीग क्रिकेट मध्ये काढली आहेत. तर मी माझा दुसरा लिम्का रेकॉर्ड केला तो सचिन तेंडुलकर यांची १०० शतके आणि १०० स्वाक्षऱ्या यांचा. त्यांच्या १०० स्वाक्षऱ्या वेगवगेळ्या वस्तूवर १९९० ते २०१४ या कालखंडात घेतल्या. ह्या स्वाक्षऱ्या त्यांनी क्रिकेट बॅट्स, ग्लोज, क्रिकेट बॉल, टी शर्ट्स, स्टंप, छायचित्रे यांच्यावर घेतल्या.
मित्रानो मला आठवतंय मी एकदा नेहमीप्रमाणे माझ्या क्लासमध्ये शिकवत असताना अचानक फोन आला तो माझा मित्र रमेश पारधे ह्याचा . बाहेर खूप ऊन पडले होते . रमेश हा सचिन तेंडुलकरचा लहानपणापासूनचा मित्र आणि आता तो त्याच्याबरोबर असतो. तो म्हणाला सचिनची आई डोबिवलीत आली आहे त्याच्या मामांना हॉस्पिटलमध्ये बघायला कस्तुरी प्लाझामध्ये, पण लाईट गेल्यामुळे लिफ्ट बंद आहे. वयोमानाप्रमाणे त्या जिने चढू शकत नाहीत. तुमचे घर कितव्या मजल्यावर आहे. मी म्हणालो तळमजल्यावर. तेव्हा तो म्हणाला सचिनची आई तुमच्याकडे जरा वेळ आली तर चालेल का ? मी म्हणालो अरे का नाही चालणार, पळेल ? त्यानंतर काही वेळात अगदी आतपर्यंत एक मोठी गाडी माझ्या घरासमोर सोसायटीत आली. साक्षात सचिन तेंडुलकरची आई रजनीताई तेंडुलकर आपल्या घरी, आणि डोबिवलीत ही घटनाच विलक्षण होती. बाजूच्या लोकांना वाटले माझी आई आली. परंतु सचिनच्या आईंचा चेहरा बघीतल्यावर अनेकांना शंका आली कारण सचिनचा चेहरा आणि त्यांचा चेहरा यात खूपच सारखेपणा आहे. सचिनची आई माझ्या घरी आली आहे हे कळल्यावर बाजूलाच टिळकनगर शाळा असल्यामुळे मुले सोसायटीच्या बाहेर जमली, तितक्यात एक मुलगा आला आणि सचिनच्या आईला म्हणाला मला तुमची सही द्या. त्यावर सचिनची आई त्याला म्हणाली अरे मी काय केले आहे माझी सही कशाला, तू सचिनची सही घे. तेव्हा तो मुलगा निघून गेला. तितक्यात सचिनची आई म्हणाली असाच एक मुलगा आला होता, लहान होता तो माझी सही मागू लागला तेव्हा सचिनची आई मघाशी जे मुलाला म्हणाली तेच म्हणाली . परंतु त्या म्हणाल्या तो मुलगा हुशार होता तो म्हणाला. तुमची सही हवीच कारण तुम्ही नसता तर आम्हाला सचिन दिसला नसता.
सचिनच्या आई घरात आल्या आणि हळू हळू गप्पा सुरु झाल्या . सचिनच्या आठवणी गप्पांच्या ओघात निघू लागल्या त्या म्हणत होत्या सचिन लहानपणी खूप मस्ती करत असे म्हणून त्याला त्याच्या काकांकडे दादरला ठेवले होते कारण शारदाश्रम शाळा आणि शिवाजी पार्कचे क्रिकेटचे मैदान जवळ होते. सचिनचे भाऊ अजित तेंडुलकर, त्याचे वडील रमेश तेंडुलकर आणि त्याचे क्रिकेटचे गुरु रमाकांत आचरेकर यांनीच चर्चा करून त्याला दादरला काका-काकूंकडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात त्याचे दुसरेही कारण होते ते म्हणजे तो बांद्रा साहित्य सहवास मध्ये रहात होता परंतु तिथे तो खूप मस्ती करावयाचा सतत क्रिकेट खेळण्यामुळे अनेकांच्या घराच्या काचा फुटत होत्या, झाडावर चढणे, कैऱ्या आंबे पाडणे अशी त्याची मस्ती चालत असे.
काका-काकूंकडे असताना सचिन खूप खूप क्रिकेट खेळायचा त्यांचे क्रिकेटचे कोच रमाकांत आचरेकर त्याला त्यांच्या स्कुटरवरून सतत ह्या मैदानावरून त्या मैदानावर खेळावयास नेत असत. कधी कधी एक दिवसात तो तीन-तीन मॅच मध्ये खेळायचा, परत शाळा आहेच. त्यामुळे त्याचे पाय खूप दुखत असत आणि घरी आल्या आल्या तो झोपत असे मग त्याची काकू त्याच्या पायाला तेल लावत असे आणि जेवण भरवत असे. जेवण झाल्यावर मग झोपत असे.क्रिकेट सोडले तर सचिन अगदी तुमच्या आमच्याप्रमाणे सामान्य मुलगा होता. दुपारी सोसायटीच्या बाहेर बर्फाच्या गोळ्याची गाडी आली की सर्व मुले जशी बर्फाचा गोळा खातात त्याप्रमाणे तो खात असे. अगदी शेवटपर्यंत बाटलीमधले गोड रंगीत पाणी त्यावर ओतून मागत असे, आणि गोळेवाला ते देते असे. असे अनेक जण सांगतात .
परंतु सचिन मोठा का झाला तर त्याच्याकडे महत्वाचा गुण होता तो म्हणजे कधीही हार पत्करायची नाही सतत प्रयत्न करत रहावयाचे. असे किती मुले करतात ? प्रत्येकाला सचिन बनायचे असते परंतु तितके प्रयत्न करणे आवश्यक असते. ते आपण करतो का ? सचिनचे दुसरे उदाहरण सांगतो. तो लहान असताना त्यांच्या सोसायटीच्या वर चौथ्या मजल्यावरील गच्चीत क्रिकेट खेळत असे . तो आणि त्याचा मित्र. जर चुकून चेंडू गच्चीवरून खाली गेला तर चार मजले उतरून, चेंडू घेऊन परत चार मजले चढून वरती जात असे. असे दिवसातून अनेक वेळा होत असे. त्याचेही पाय दुखत असणार, त्यालाही दम लगत असणार परंतु एकदा एखादी गोष्ट करायची म्हटले की ती केलीच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर तुमचा किट कधी तुमचे आई-बाबा किंवा घरात असलेला नोकर उचलून घेत असेल तर ते चूक आहे. सचिन स्वतःच्या क्रिकेट किटला कुणालाही हात लावून देत नाही . आजही इतका श्रीमंत असला तरी स्वतःचा क्रिकेट किट उचलून त्याच्या गाडीपर्यंत जाणार. ह्यालाच म्हणतात आपल्या कामावर, आपल्या खेळावर असलेली श्रद्धा. दुसरे म्हणजे शिक्षकाला मान देणे. आचरेकर सरानी त्याला घडवला, खूप शिकवले प्रसंगी ओरडले देखील परंतु त्याने कधीही अपशब्द उच्चारला नाही किंवा त्याचे आईबाबा सरांकडे भांडण्यास गेले नाहीत, माझ्या मुलाला का मारले म्हणून.
आज सचिन तेंडुलकर खूप भारी गाड्या वापरतो, भारी भारी वस्तू वापरतो परंतु तो कधीही गुर्मीने कुणाशी बोलत नाही . नाहीतर जरा पैसे आले अनेक माणसे गुर्मीत रहातात. परवा सचिनच्या आचरेकर सरांचे निधन झाले तेव्हा तो कसा शांतपणे वावरत होता हे सर्वानी टी . व्ही. वर पाहिले.
सचिन तेंडुलकर कडून एक गोष्ट तुम्ही आम्ही शिकली पाहिजे ती म्हणजे मोठ्याना मान देणे आणि कुणालाही उलट उत्तर न देणे. जे काही लोकांना उत्तर द्यायचे ते उत्तर तो खेळताना क्रिकेट बॅट ने उत्तम खेळून देत असे. क्रिकेट असो कीं कुठलेही क्षेत्र असो तुम्हाला त्यातला ‘ सचिन तेंडुलकर ‘ होता आले पाहिजे कारण आपण नेहमी एखादी नवीन गोष्ट करण्यास घेतो आणि अर्धवट सोडतो. त्यात एकाग्रता हवी. एकदा मी सचिन तेंडुलकरच्या ‘ साहित्य सहवास ‘ ह्या सोसायटीमध्ये माझ्या लेखक मित्राबरोबर एका लेखक मित्राकडे गेलो होतो. तेथे बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. सहज जिन्यावरून वर जाताना खाली बघीतले. जेथे गाड्या ठेवतात अशा गॅरेजमध्ये काही मुलगे टेबल टेनिस खेळत होती.एक मुलगा पाठमोरा खेळत होता. एक दीड तासाने आम्ही खाली जिना उतरू लागलो तेव्हा सहज खाली लक्ष गेले तर तोच मुलगा घामाघूम होऊन खेळत होता . माझा आवाज ऐकून त्याने मागे बघीतले तर तो सचिन होता.
मग आम्ही सचिनच्या घरी गेलो तेव्हा सचिनचे बाबा रमेश तेंडुलकर, त्याचा भाऊ अजित तेंडुलकर, त्याची आजी, आई सर्व होते फक्त सचिन खाली खेळत होता. सचिनचे बाबा मला बोलता बोलता बोलले ते म्हणाले मी सचिनला सांगितले आहे तू कितीही पैसे कमव फक्त टॅक्स वगैरे नीट भर म्हणजे तू कितीही खर्च करण्यास मोकळा. सचिन आजही त्याच्या बाबांचे ऐकतो म्हणून त्याच्याबद्दल कधीही वेडेवाकडे ऐकावयास मिळत नाही. आता दोन चार महिन्यापूर्वी रमेश पारधे यांच्यामुळे सचिन तेंडुलकरच्या घरी जाण्याचा योग आला.सचिनची आई आधी माझ्या घरी येऊन गेली असल्यामुळे ओळख झाली होती. आम्ही सुमारे दोन ते अडीच तास गप्पा मारत होतो. संध्याकाळ झली. निघालो तर समोर सचिन तेंडुलकर उभा, माझ्याकडे बघत असताना म्हणालो आईकडे आलो होतो, गप्पा मारायला, तेव्हा पण मी त्याची स्वाक्षरी घेतली आणि फोटोही काढला, त्याने काढून दिला कारण त्याला माझ्या स्वाक्षरी संग्रहाबद्दल माहित होते. सुदैवाने सचिन तेंडुलकर यांचे भाऊ अजितदादा, नितीनदादा यांनाही माझ्या संग्रहाबद्दल माहित आहे. हे मला खूप महत्वाचे वाटते .सचिनला खूप सन्मान मिळाले, त्याची यादी केली तर खूप मोठी होईल. त्याला अर्जुन अवॉर्ड, पदमश्री, पद्म विभूषण आणि भारतरत्न हे सन्मान मिळाले.
‘भारतरत्न’ नंतर मात्र प्रत्येकाला आपल्या घरातला वाटणारा सचिन दूर गेल्याचा भास झाला. कदाचित त्याच्यावर बंधने आली असतील. परंतु उच्चभ्रू लोकांना सहज दिसणारा सचिन सामान्य माणसाला मात्र दुर्लभ झाला आहे, ही खंत अनेकजणांना वाटत असेल यात शंका नाही. परंतु सचीन बदललेला नाही आज ना उद्या जबाबदारीतून मोकळा झाल्यावर तुमच्या आमच्यात तो सहजपणे दिसेल ?
अनेकजण येतील जातील परंतु एक नाव कायम मनात राहील ते म्हणजे
‘सचिन’.. ‘सिर्फ नाम काफी है|’
— सतीश चाफेकर.
Leave a Reply