शैशव माझे सरताना मी स्वप्नांना विकाया शिकलो
गुंजेत तोलुनी पेढीवरती सोन्यास विकाया शिकलो
अकारण इथेच कधीही काही काहीच घडले नाही
अभिषेकाचे साहित्य तरीही रांगाना विकाया शिकलो
शाळेच्या पाटीवरल्या रेघोट्यांच्या मिठीत आसमंत
क्षितिजांच्या करुनी भिंती अंगणास विकाया शिकलो
आंधळ्या कोशिंबिरीचा घडीभराचा डाव आयुष्याचा
उगवतीस पाठ करुनी मी दिशांना विकाया शिकलो
ही वाट एकाकी अन कुठे उद्याच्या सूर्याचा भरोसा
अंधारास फितूर होणाऱ्या सावल्या विकाया शिकलो
साक्षात्कार जरी मोक्षाचा आहे मृत्यूस चुंबल्यानंतर
सुखी माणसाचा नागव्याने सदरा विकाया शिकलो
रजनीकान्त