भारतीय स्त्रीच्या पारंपरिक वेशभूषेत साडीला असणारं महत्त्व, अनन्यसाधारण आहे. जगात कुठेही साडीतील स्त्री दिसली की, बघणारा लगेच विचारतो, ‘आपण भारतातून आला आहात ना?’ साडी ही ‘भारतीय संस्कृती’ची एकमेव ओळख आहे!
भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील लहान मुलीला वयाच्या पाचव्या वर्षापासून साडीचं आकर्षण सुरु होतं. मग हाताशी आलेल्या टाॅवेलची किंवा ओढणीची साडी होते.. आणि तिला पाहून आईचं काळीज सुपाएवढं होतं..
पुण्यासारख्या शहरात, मी माझ्या लहानपणापासून ‘कल्पना साडी सेंटर’ हे लहान मुलींसाठीचं साडीचं एकमेव दुकान पहात आलेलो आहे. इथून साडी घेतलेल्या त्यावेळच्या लहान मुली, आज आजी-पणजी झालेल्या असतील.. तरीदेखील मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ‘कल्पना साडी’च्या दुकानाकडे नजर गेल्यावर, त्या हमखास भूतकाळात रमत असतील…
लहानपणीचं साडीचं आकर्षण काही वर्षांनंतर, फक्त सणासुदीपुरतं मर्यादित होऊन जातं. शालेय शिक्षणात, स्नेहसंमेलनाला सर्व मैत्रिणींसोबत आवर्जून साडी नेसली जाते..
काॅलेजात जाऊ लागल्यावर गॅदरींगच्या दिवसांत ‘साडी डे’ असतो. अशावेळी आईची ‘ठेवणीतली साडी’ नेसली जाते. शरीरयष्टी अगदीच किरकोळ असेल तर एखाद्या काठीला, कापड गुंडाळल्यासारखं दिसतं. त्याउलट तब्येत लठ्ठ असेल तर बेढब दिसतं..
पूर्वी लग्नात साडीला महत्त्व फार होतं. आता आधुनिक वेशभूषेत, मुली लग्नाला उभ्या राहतात. लग्नाच्या निमित्तानं मानापानाच्या साड्यांची देवघेव होते. साडी कितीही चांगली असली तरी त्यामध्ये खुसपट, ही काढली जातेच. रूसवे फुगवे होतात. वाद विकोपाला गेले तर त्या स्त्रीला रोख पैसे देऊन पसंतीची साडी खरेदी करण्याची विनंती केली जाते. मुलीच्या आजीसाठी घेतल्या जाणाऱ्या साडीला ‘आजेचीर’ म्हटलं जातं.. पूर्वी ती ‘इरकल’ स्वरुपातील साडी असायची.. इरकल नेसल्यावर ती आजी नातीला, तोंड भरुन आशीर्वाद द्यायची..
खेडेगावात साडीला, ‘लुगडं’ म्हटलं जायचं. नंतर ‘पातळ’ म्हटलं जाऊ लागलं. सातारची साडी नेसण्याच्या खास पद्धतीवरुन ती स्त्री सातारची आहे, हे कळतं. नगरच्या स्त्रिया नऊवारी साडी नेसायच्या. त्यादेखील तशाच ओळखू यायच्या. आता नऊवारी साडी, हौस असेल तरच नेसली जाते. आधुनिक काळानुसार नऊवारी साड्या देखील शिवून मिळतात..
पूर्वी संगीत नाटकातील नायिका नऊवारी साडीमध्ये असायच्या.. आता संगीत नाटकंच राहिलेली नाहीत. हिंदी चित्रपटातील, जयाप्रदा ही दाक्षिणात्य अभिनेत्री, साडीमध्ये फारच सुंदर दिसायची. ती साडीत जेवढी सुंदर दिसली तशी माॅडर्न वेशभूषेत मात्र ‘बेगडी’ वाटली. मराठीतील सुलोचना व जयश्री गडकर या आमच्या पिढीला साडीमध्येच भावल्या..
दिवाळीतील भाऊबीजेला, भावाकडून ओवाळणी म्हणून मिळणारी साडी, बहिणीला ‘माहेरची भेट’ असते.. त्या साडीला माहेरचा गंध असतो.. ती किती किंमतीची आहे, यापेक्षा त्यामागची अनमोल प्रेमभावना महत्त्वाची असते. साडीच्या कपाटाऐवजी तिचं हृदयातील स्थान हे ‘चिरंतन’ असतं..
पूर्वी घरी वापरण्यासाठी साधी साडी खरेदी केली तरी, ती स्त्री स्वतः साडीची घडी न मोडता आपल्या जावेला, नणंदेला किंवा जवळच्या मैत्रीणीला ती देत असे. तो घडी मोडण्याचा मान दिल्याबद्दल तिचं कौतुकही होत असे.. हा त्या वेळचा, मनाचा मोठेपणा होता..
मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाची ‘चंद्रकळा’ साडी नेसली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत ठरवून वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसल्या जातात..
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत ‘रमेश डाईंग कंपनी’ होती. त्यांच्याकडे प्लेन रंगाच्या साडीवर छाप मारुन, रंगीत डिझाईनचं प्रिंटींग करुन दिलं जायचं. माझ्या आईने दोन साड्यांवरती तसं प्रिंटींग करुन घेतलेलं होतं.. मात्र तो प्रकार माझ्या आजीला अजिबात आवडला नाही.. त्यामुळे त्या साड्या आईनं कधीही वापरल्याच नाहीत..
पूर्वी साड्यांची दुकानं शहरात मोजकीच होती. आज नव्वद टक्के दुकानं, साड्यांचीच आहेत. असंख्य प्रकारच्या, प्रांताच्या, पेठांच्या साड्या, पैठणी तिथं मिळतात. ‘विणकरांकडून थेट ग्राहकांना’ या प्रकारात, सदाशिव पेठेत एकाच मालकाची, सलग आठ दुकानं आहेत.
‘मान्सून सेल’ हा फक्त साड्यांसाठीच असतो. या कालावधीत अनेक स्त्रिया न चुकता ‘शाॅपिंग’ करतात. या काळात दुकानदारांकडून, साठ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. हा सेल संपला की, नवीन स्टाॅक, नव्या किंमतीत दसरा दिवाळीला विकला जातो..
आता पंजाबी ड्रेस, टी शर्ट पॅन्ट, घागरा चोली, इत्यादी असंख्य प्रकारांमुळे साडीचं महत्त्व हे सणासुदीपुरतंच मर्यादित होऊ लागलंय. तरीदेखील भारतीय स्त्री ही साडीतच शोभून दिसते. साडीमध्ये शालीनता, संस्कार दिसून येतात. साडीतल्या स्त्रीकडे आदरानं पाहिलं जातं.
जग कितीही पुढे गेलं तरी भारतीय स्त्री आणि साडी हे समीकरण कायमच रहाणार आहे. कारण त्या साडीतला प्रत्येक धागा हा सुखाचा आहे, त्या धाग्यांनीच तयार होणारं हे जरतारी महावस्त्र, भारतीय स्त्रीचं खरं ‘आभूषण’ आहे!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२९-८-२१.
Leave a Reply