२००१ सालची गोष्ट ..मी तेव्हा इयत्ता नववीत होते. ..त्या वेळी माझे बाबा नागपूर येथे नोकरी निमित्त कार्यरत होते..दिवाळीच्या सुट्टीत मी आणि आई नागपुर ला गेलो..ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी वरोरा येथे वसवलेल्या आनंदवन ला भेट द्यायची माझ्या बाबांना खूप इच्छा होती. थेट संबंध नसला तरी वाचनाच्या माध्यमातून आणि त्या आधीपासून गेली अनेक वर्ष माझे आजोबा, बाबा आनंदवन ला जमतील तशा फूल ना फुलाची पाकळी स्वरूप देणग्या नक्की पाठवत असत..आणि त्याचा अभिप्राय म्हणून डॉ.विकास आमटे यांच्या सुरेख हस्ताक्षरातले पत्र
आजोबांना येत असे..आमच्याकडे सुद्धा अभिप्राय म्हणून आनंदवनातून तेथील रहिवासियांनी हाताने तयार केलेले भेट कार्ड येत असे..
अशा या सुंदरशा आनंदवन ला भेट देण्याचे आमचे नक्की ठरले..एका स्नेह्यांच्या ओळखीने वार्तालाप करून एक रात्र राहण्याची सोयही तिथेच झाली..आई-बाबा आणि मी, बस ने आनंदवन ला पोहोचलो..राहण्याच्या ठिकाणी सामान ठेवल्यावर एका स्थानिकाने आनंदवनशी आमचा परिचय करून दिला..रुग्णालयं..वेगवेगळे प्रकल्प, शेती, टाकाऊतून टिकाऊ ते अगदी भूकंपापसून सुरक्षा म्हणून स्वत: तयार केलेली घरं..असं सगळं पाहून आम्ही भारावून गेलो..
दुपारी तेथील भोजनालयात डॉ.विकास आमटेंसोबत एकत्र बसून आनंदवनातील भोजनालयात साधं आणि चविष्ट जेवण जेवलो.
तेव्हा योगायोग असा जुळून आला की खुद्द बाबा आमटे आणि साधना ताई आनंदवनात होते..नाहीतर त्यांचं वास्तव्य जास्तं करून तेव्हा सोमनाथ प्रकल्पाच्या येथे असे .बाबा आणि ताई दोघांचे दर्शन होणार याचा आम्हाला आनंद झाला. स्वाभाविकंच, त्यांना भेटायची इच्छा आम्ही व्यक्त केली..
आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो..बाबा आणि ताईंनी आम्हा तिघांना आत बोलावलं..आम्ही आत गेल्या गेल्या, खुर्चीवर बसलेल्या साधना ताई उठल्या आणि नमस्कार करून त्यांनी आमचं स्वागत केलं..आम्ही कोण,कुठून आलो, माझे बाबा कुठे कार्यरत आहेत,आईची विचारपूस ते अगदी माझं नाव काय मी कितवीत शिकते,आनंदवन आवडलं का? हे सगळं ताईंनी आपुलकीने विचारलं..बाबा आमटेंना पाठीला त्रास असल्याने ते पलंगावर आडवे टेकून गप्पा मारत होते..आम्ही ताडोब्याच्या जंगलात जाऊन आलो हे कळताच बाबा आमटेंनी विचारलं,”वाघ दिसला का?” आणि आमचं ‘हो’ हे उत्तर ऐकून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं..ताडोबाच्या पहिल्या भेटीत आम्हाला वाघ दिसला हे ऐकून “वा, नशीबवान आहात तुम्ही,आम्हाला पहिल्या भेटीत वाघ दिसला नव्हता “..असं म्हणाले..ताईंनाही आनंद झाला..ताईंचं प्रेमळ हसरं व्यक्तीमत्व मला अजून आठवतं..इतक्या मायेने त्यांनी आमचं केलेलं स्वागत ..इतक्या मृदु स्वरात त्यांनी केलेली चौकशी..नवीन माणसं भेटल्याचा आनंद चेह-यावर आणि डोळ्यात लख्ख दिसत होता..एवढ्या लांब आनंदवन ला खास येऊन खूप कमी लोकं भेट देतात पण तुम्ही आलात असं म्हणून त्यांनी कौतुक केलं..थोड्या गप्पा झाल्यानंतर बाबा आणि ताई दोघांच्या पाया पडून आम्ही निघालो.
तेव्हा मी नव्वीतली अल्लड मुलगी..मला बाबा आणि ताईंच्या एवढ्या मोठ्या कार्याबद्दल कितीशी माहिती असणार?..पण तेव्हा भेटलेल्या ताई माझ्या आजन्म स्मरणात राहतील..
अशा असामान्य व्यक्तीमत्वांची साधना एवढी विलक्षण असते की त्यांचा काही काळ सहवास मिळाला तरी आपण नकळत भारावून जातो आणि खूप काही मिळाल्याचं समाधान आपल्याला मिळतं..ही साधना ताईंची ‘साधना’ त्यांनी पुस्तक रुपात सगळ्यांपुढे आणली ती ‘समिधा’ च्या रुपाने..आईने वाचनालयातून आणलेलं ‘समिधा’ सहज हातात घेऊन मी वाचायला सुरुवात केली आणि थांबले ती पुस्तक पूर्ण करूनंच. मराठी वाचनाची मला गोडी लागली ती ‘समिधा’ मुळेच..मराठीतील मी सर्वात पहिलं वाचून पूर्ण केलेलं पुस्तक म्हणजे ताईंचं ‘समिधा’..तेव्हा मराठी वाचनाचा श्रीगणेशा झाला आणि तो ‘समिधा’ मुळे झाला या बद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते..बाबा आणि ताई कोण..त्यांचं कार्य गगना एवढं विशाल आहे..आपण आनंदवन ला जाऊन साक्षात देव माणसांना भेटून आलो याची मला ‘समिधा’ वाचत असताना जाणीव झाली आणि मी नतमस्तक झाले..’समिधा’ आपल्यापैकी ब-याच जणांनी वाचलं असेलही..मात्र नसेल तर आवश्य वाचावं..
अलिकडे ज्येष्ठ लेखिका सौ.मृणालिनी जोशी लिखित ‘आलोक’ वाचलं . या पुस्तकातलं एक वाक्य मला फार भावलं.. त्यांनी हे शब्द कविराज कुसुमाग्रज यांच्या पत्नी बद्दल लिहिले आहेत..ते वाचताना मला साधना ताईंची आठवण झाली..
मृणालिनी ताई लिहितात,”तळवे जाळणा-या रणरणीत वाळवंटातून आपल्या असामान्य पतीच्या बरोबरीनं चालणं नि त्या आपल्या माणसाच्या माथ्यावर मायेची छत्र सावली धरणं फार फार अवघड.”
आज ५ मे.. साधनाताईंचा ९५ व जयंती दिवस.. या निमित्ताने माझ्या 2 ओळी त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते..
— गौरी
Leave a Reply