ही गोष्ट आहे 1991 ची. त्या वेळी मी पुण्यात; पण पुण्यापासून लांब निगडीला राहत असे. रोज वीस किलोमीटर पुण्यात यायचं अन् जायचं. सध्याच्या युगात हे अंतर फारसं नसलं तरी पुण्यात अजूनही ते खूप मोठं आहे; कारण शहरातील वाहतूक व्यवस्था. याच काळात मला पुण्यात एक घर घेण्याची संधी आली. ऑफीसपासून फारतर पाच किलोमीटर अंतर असेल. घर तर छानच होतं. आटोपशीर पण मोठंही! सोईचं अन् आवाक्यातलंही; पण प्रश्न होता तो पुढेच. या घरासाठी अडीच लाख रुपये अवघ्या दोन आठवड्यांत भरायचे होते. त्या वेळी घरासाठी कर्जे मिळत; पण त्यासाठीचा कालावधीही किमान दोन महिन्यांचा असे. आता हे दिव्य कसं साध्य व्हावं? खूप विचार केल्यावर घर घेण्याचा निर्णय थांबवायचं ठरविलं; कारण पैशाचं सोंग आणता येणं कठीण होतं. त्या दिवशी मी भोजनाच्या वेळी माझ्या ज्येष्ठ सहकाऱयाशी बोलत होतो. त्याला मी माझ्या घराचा निर्णय
सांगितला. तो थांबला, म्हणाला, एक
कागद घे अन् तुझ्या जवळच्या मित्रांची यादी कर.’ मी यादी करू लागलो. पहिलं नाव अर्थात माझ्या त्या मित्राचं होतं. यादी करता करता वाढत गेली आणि जवळचे असे बावीस मित्र निघाले. माझा सहकारी म्हणाला, `झालं तर मग घर घ्यायचं. आपण असं करू प्रत्येकाला पाच, दहा, पंधरा हजार पये द्यायला सांगू. दोन महिन्यात ते परत करायचे. या दोन महिन्यात कर्ज मंजूर व्हायला काही अडचण येऊ नये.’ झालं. मी त्यालाच म्हणालो, `तू ती देतोस?’ त्यानं फोन लावला. 15 हजारांची व्यवस्था केली. आमच्याकडे एक जाहिरात कंपनीचे संचालक येत. त्यांना अडचण कळली. त्यांनी 25 हजार पाठविले. माझी घरासाठी भरावयाची रक्कम अवघ्या आठ दिवसांत पूर्ण झाली. थोडी अधिकच रक्कम आता हाती होती. `घर नको’ या माझ्या निर्णयापासून `माझं घर’ हा प्रवास अवघ्या दहा दिवसांचा ठरला. एकानं सदिच्छा दिली. घर व्हायलाच हवं असं तो म्हणाला आणि मी कामाला लागलो. ज्यांना विनंती केली
त्यापैकी कोणी नकार दिला नाही. प्रत्येकाच्या मनात सदिच्छा जागी होती. ती मला कळत होती. घर झालं. यथावकाश कर्जाचं काम झालं. प्रत्येकाचे पैसे वेळीच देता आले तरी त्यामागच्या भावनांची परतफेड अवघड होती, अशक्य होती.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply