लहानपण देगा देवा किंवा बालपणीचा काळ सुखाचा इत्यादी छापील वाक्य वाचताना ही वाक्य खरी व्हावीत असं वाटण्याजोग्या स्मृती ज्यांनी निर्माण केल्या ती माणसच जर विस्मृतीत गेली तर ह्या वाक्यांची रवानगी रद्दीतच करावी लागेल. असं म्हणतात की बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी सटवाई येऊन बाळाचं विधिलिखित निश्चित करून जाते. त्यासाठी बाळाच्या शेजारी कोरा कागद आणि पेन ठेवतात. माझ्या गोंगाटमय जगप्रवेशानंतर त्या कोर्या कागदावर माझं आयुष्य अनुभवसंपन्न करणार्या ज्या व्यक्तींची नावं सटवाईने लिहिली त्यात सदूकाकांचं नाव अगदी वरच्या मंडळींमधे येतं. वास्तविक सदूकाका ही चार अक्षरं एकत्र उच्चारल्यावर माझ्या मनात जे काही आदरभाव ओसंडून वाहू लागतात त्यांची तुलना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि वास्तू पाहिल्यावर ओसंडणार्या भावभावनांशीच होऊ शकेल. टाचा वर करूनही खिडकीपलीकडचं जग जेमतेम दिसावं अशा वयात आम्ही त्यांच्या तीन चाकांच्या रिक्षानामक अद्भुत यंत्रातून घर ते शाळा आणि शाळा ते घर अशा अनेक चकरा सुरवातीच्या चारपाच वर्षात मारल्या. आम्ही म्हणजे मी, माझी ताई आणि काकांच्या रिक्षातले आमचे इतर भाडेकरू सौंगडी. होय. परिस्थितीने गरीब असलेल्या आणि आम्हाला शाळेत सोडण्याचा व्यवसाय करणार्या सदूकाकांच्या रिक्षातले आम्ही श्रीमंत भाडेकरू होतो. इंदिरा गांधीची हत्या झाली त्या दिवशी आमचं कुटुंब मुलुंडला राम राम ठोकून ठाण्यात स्थलांतरित झालं. त्यावेळेस आम्ही जिथे राहतो ते कोपरी गाव अक्षरशः वेशीबाहेर होतं. मातीची पायवाट असण्याएवढा मागासलेला किंबहुना दुर्लक्षित भाग, अनोळखी माणसं, बाजार आणि इतर खरेदीची मुख्य ठिकाणं घरापासून दूर आणि शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार देणार्या शाळाही घरापासून किमान तीन
िलोमीटर दूर अशी एकंदर परिस्थिती होती. त्यातल्यात्यात जवळची शाळा म्हणजे सरस्वती शाळा. पण सगळ्या फळांना आंबा म्हणणार्या आणि जगातल्या सगळ्या रंगांना लाल रंगच म्हणतात अशी दृढ समजूत असणार्या या मठ्ठोबाला सरस्वतीने आपल्या पदरात
घ्यायला नकार दिला. आता पंचाईत आली. कारण खुद्दांचे माता आणि पितामह दोघेही चाकरीत गुंतलेले. आजोबा गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे जास्त चालू शकत नसत. त्यामुळे ज्या शिवसमर्थ शाळेने मला झोळीत घेतलं ती शाळा दूर असल्याने मला तिथपर्यंत नेऊन आणण्याची अडचण उभी राहिली. बाकी सरस्वतीने रिजेक्ट केलेल्या ह्या नवशिक्या उमेदवाराला तिचेच थोर उपासक असणार्या समर्थांनी झोळीत घेतलं हे माझं परमभाग्यच. तर मग या संकटातून सुटका करायला आजोबांना जी संकटमोचक व्यक्ती भेटली ती म्हणजे सदानंद भोईर अर्थात आमचे सदूकाका. सदैव हसतमुख दिसणारा चेहरा, आगरी व्यक्तिमत्वाला साजेशी अशी मुळचीच लहान चणीची, मध्यम बांध्याची आणि ताकदवान शरीरयष्टी, नितीमत्तापूर्ण चालचलन, दिवसभर रिक्षा चालवताना प्राशन केलेल्या विषारी वायुंचं हलाहल पचवून गडद झालेली अंगकांती, रिक्षाच्याच खरबरीत मुठी आवळून घट्टे पडलेले तरीही कोवळ्या कळ्यांना अलगद सांभाळणारे हात आणि मुलांचा गोंगाट हसत हसत कानावेगळा करण्याची कला यामुळे सदूकाका केवळ आम्हा मुलांतच नव्हे तर पालकांमधेही तेव्हढेच प्रिय होते. ‘ए गप्प बसा रे’ हे काकांचं पेटंट वाक्य ऐकून न ऐकण्यासाठीच असतं असा गुप्त ठराव आम्ही सगळ्या मुलांनी एकमताने पास केला होता. त्यामुळे काकांच्या दटावणी नंतर तेवढ्यापुरता तो चिवचिवाट थांबायचा पण अगदी क्षणभर ब्रेक लावल्यासारखाच आणि त्यानंतर तर तो दुपटीने वाढायचा. अशावेळी आम्ही हळूच आरशातून दिसणारा काकांचा चेहरा पाहून परिस्थितीचा अंदाज घ्यायचो. परिस्थिती लौ
रच स्फोटक होऊन हाताबाहेर जाणारे असं वाटलं तर तर तो आवाज आपोआप कमी व्ह्यायचा. कारण तो कमी झाला नाही तर एकदोघांच्या (त्यात माझा नंबर पहिला) शरीराचा बैठा भाग हुळहुळणार एवढं नक्की असायचं. पण अशी वेळ फार कमी वेळा यायची. कारण तो चिवचिवाट ऐकल्याशिवाय काकांना बहुदा रिक्षा चालवणं जमत नसावं. पण काकांचं रिक्षा चालवणं म्हणजे त्यात निव्वळ धंदेवाईक मालवाहूपणा नसायचा. घरोघरीच्या दिवे आणि पणत्यांची न विझता सुखरूप ने आण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याचे त्यांना पूर्ण भान असायचे. मग एखाद्या वेळी या दिव्यांना तेल म्हणून कधी कलिंगड, कधी वडापाव असा खाऊही द्यायचे. खरतर आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून रिक्षाची देखभाल करताना त्यांच्या नाकी नऊ यायचे. परंतू तरीही त्यांच्या या मोठ्या मनाचं दर्शन आम्हाला आम्हाला वेळोवेळी घडलं. मला अजूनही आठवतो तो शाळेतला प्रसंग. मी तेव्हा जेमतेम बालवाडीत असेन आणि ताई पहिलीत असावी. शाळा सुटल्यावर काका नेहमीप्रमाणे तिला घेऊन जायला आले. पण त्या दिवशी ताईचं काय बिनसलं होतं कुणास ठाऊक. ती काकांबरोबर यायला तयारच होईना.काकांनी अनेक विनंत्या करून पहिल्या पण ताईबाईंचा पारा काही उतरेना. शाळा सुटून बराच वेळ झाला असल्याने ताईवर लक्ष ठेवायलाही कोणीच नव्हतं. त्यामुळे तिला एकटं सोडणं धोकादायक होतं. शेवटी काकांनी तिला कसबस शाळेतच थांबायला सांगून भरधाव वेगात रिक्षा घराकडे पिटाळली. घडलेला सगळा प्रकार आजोबांना सांगून त्यांना घेऊन ताबडतोब शाळेत आले. आजोबा दिसल्याबरोब्बर ताई एकदाची रिक्षात बसली आणि काकांनी कपाळावरचा घाम पुसला. खरतर ताईला एकटं सोडून आल्यावर तिला जर काही झालं असतं तर काकांना कोणीच दोष दिला नसता. पण आपल्या रिक्षातलं प्रत्येक मूल हे आपलं स्वतःचं मूल आहे या भावनेतून ते काम करत असल्याने त्यांची ही तळमळ पाहून वडीलधारी मंडळी भा
ावून गेली. पण काकांच्या रिक्षातून येणं जाणं हा एक विलक्षण वेगळा अनुभव असायचा. रोज काही ना काही नवीन शिकायला मिळायचं. चौथ्या सीटची अॅडजेस्टमेंट हा प्रकार काकांच्याच रिक्षात शिकलो. मित्र येईपर्यंत रिक्षात बसून कंटाळा येईपर्यंत शांतचित्ताने हनुवटीला हात टेकवून वाट पहात रहाणे हेही रिक्षातच शिकलो. मला रिक्षाची अजून एक खास आठवण म्हणजे पावसाळ्यातली. त्याकाळी म्हणजे जवळजवळ १७-१८ वर्षांपूर्वी गाड्या
फारशा नसल्याने आमच्या कोपरी भागात
तर बरीच शांतता असायची. काका ठरलेल्या बिल्डींगच्याखाली रिक्षा थांबवायचे आणि कुठल्यातरी विन्या किंवा जाड्याला हाक मारायचे आणि आमचं वाट पाहणं सुरु व्हायचं. मुलं यायच्या आधी काकांनी रिक्षा धुऊन पुसून ठेवलेली असायची. पावसाळ्यात आम्ही भिजू नये म्हणून रिक्षाला मेणकापडाचे पडदे लावलेले असायचे. पाऊस सुरु झालेला असायचा. आम्ही झापड लावलेल्या घोड्यासारखे फक्त समोरच्या काचेतून दिसणारं दृश्य पहात बसलेलो असायचो. पाण्याचे ओघळ काचेवरून नागमोडी वळणं घेत वायपरवरून उड्या मारून निथळू लागलेले असायचे. पावसाचे बारीक तुषार पडद्याला हुकवून आम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असायचे. रस्त्यातून एखादाच माणूस साचलेल्या पाण्यातून चपक चपक आवाज करत जात असायचा. पाऊस टप टप आवाज करत रिक्षाच्या टपावर पडून राहिलेला असायचा. मधूनच थंड वार्याची झुळूक त्या सोसायटीतल्या चाफ्याच्या झाडावरून मंद सुगंध घेऊन यायची. अशा त्या त्या मंत्रमुग्ध वातावरणात सकाळच्या गरम दुधाचा असर होऊन आपोआप झापड यायला लागायची. जरा कुठे डोळा लागतो न लागतो तोच काका रिक्षाचा दांडा खेचून रिक्षा चालू करायचे. आमचा मित्र रिक्षात चढायचा आणि परत पुढच्या स्टॉपवर थांबण्यासाठी रिक्षा चालू लागायची. पण रिक्षात बसल्यावर डोळ्यासमोर जरी शाळाच येत असली
तरी मनात मात्र कधी एकदा घरी जातो याचेच वेध लागलेले असायचे. काळ आपल्या गतीने पुढे सरकत गेला आणि पाचवीपासून माझ्या हातात सायकल आली. रस्त्यातून येताजाता सदूकाकांचं दर्शन घडायचं. पण समांतर धावणार्या दोन रुळांसारखं आमचं वाहणं असायचं. कधीमधी एखाद्या शाळेबाहेर काका थांबलेले दिसले की मुद्दामून सायकल थांबवून त्यांची विचारपूस करायचो. मग एकदम बांध फुटल्यासारख्या आठवणी वाहू लागायच्या. बहुतेक वेळा संभाषणाची सुरवात,”काय मग, लग्न कधी करतोस? किंवा कोणी भेटली की नाही?” अशा मिश्कील थट्टेने व्हायची. मी जरासा गोरामोरा होऊन रिक्षातून माझ्याकडे बघणार्या चिमण्यांकडे बघायचो. बहुतेक वेळा काका आमच्या अभिजीत वैद्य या मित्राची आठवण काढायचे. “अरे परवा आपला अभिजीत भेटला होता. विचारत होता तुझ्याबद्दल” असली वाक्य काका हमखास म्हणायचे. अमुक अमुक मुलगा तुझी आठवण काढत होता हे काका आठवणीने सांगायचे आणि आजही सांगतात. मला खरोखर आश्चर्य वाटतं. कारण आमचा ग्रुप आता विखुरलाय. फेसबुक, ऑर्कुट, मोबाईल सगळं हाताशी असूनही आम्ही एकमेकांची क्वचितच आठवण काढतो पण काका मात्र न विसरता आम्हा मित्रांची खबरबात सांगतात. बाकी अभिजीतची खास आठवण राहिली कारण आमच्या रिक्षा गँगमधे स्वतःच्या बाबांना ‘ए बाबा’ म्हणणारा तो एकटाच मुलगा होता आणि आम्हाला त्याच्या या शौर्याचं केव्हढं अप्रूप!! पण काकांना सगळ्याच मुलांच्या नाड्या आणि गोत्र पाठ होती. त्यांची परिस्थिती जरी गरीब असली तरी रिक्षातल्या त्यांच्या तुलनेने श्रीमंत असणार्या मुलांच्या पालकांकडे त्यांनी कधी मदत मागितल्याचं मला तरी स्मरत नाही. वाट्याला आलेल्या एका खोलीच्या घरात आयुष्य व्यतीत करताना काकांनी अतिशय नेमकेपणाने संसार केला. त्यांना संसारात अडचणी आल्या नाहीत हे होणं शक्यच नाही. पण त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या आणि आमच्
ा संबंधावर कधीच होऊ दिला नाही. आम्ही रिक्षात असताना काकांनी कधी चुकूनही विडी काडी ओढली नाही की नशापाणी केलं नाही. आजकाल गुटखा खाऊन रिक्षा चालवणारे इतर रिक्षावाले काका पाहिले की मला आमच्या काकांना पुरस्कार द्यावासा वाटतो. काका आम्हाला नुसतेच न्यायचे नाहीत तर आमच्यासोबत गाणी देखील म्हणायचे. कारण काका संध्याकाळी बॅंजोपार्टी मधे बॅंड वाजवायचे आणि सकाळी त्याच धुंदीत गाणी गुणगुणत आम्हाला शाळेत सोडायचे. परीक्षेच्या काळात ते मधूनच आमची उजळणीही घ्यायचे. कधीतरी आमच्या अभ्यासाच्या वह्याही पहायचे. कदाचित स्वतःचं शिक्षण अपुरं राहिल्याची उणीव ते आमच्या वह्या पाहून भरून काढत असावेत. त्यांच्या साध्या आणि मोकळ्या स्वभावला साजेसं जे जे काही होतं ते ते काकांनी केलं आणि आम्हाला भरभरून दिलंही.काकांनी दांडी मारली हेही फार क्वचितच व्हायचं. अगदी ताप अंगात घेऊनसुद्धा त्यांनी आम्हाला शाळेत सोडलं आहे. आज काकांनी पन्नाशी ओलांडली आहे. त्यांचे केस अनुभवाचे चटके सोसून पिकू लागले आहेत. त्यांची मुलं शिक्षणात अतिशय हुशार आहेत. काका अजूनही रिक्षा चालवतात.आमच्या सारख्या द्वाड मुलांना नियमित शाळेत सोडताना आणि आणताना बरेचदा दिसतात. पण त्यांची ती रिक्षा चालवणारी ध्यानस्थ मूर्ती कधी मला हाक मारून थांबवेल आणि कोण माझी आठवण काढत होता हे सांगेल हे वर्तवणं तर सटवाईच्याही आवाक्याबाहेरचं आहे. कुठल्या सुकृताचं फळं म्हणून ही सगळी मंडळी माझ्या नशिबात घर करून राहिली ते सटवाईच जाणे. पण जर सटवाईला भेटायचा कधी योग आलाच तर तिला एवढंच सांगेन की माझ्या पुढच्या जन्मात देखील मला मराठी मातीतला मुलगा करणार असशील तर माझ्या नशिबाच्या कागदावर सदूकाकांचं नाव पहिल्या तीन मानकर्यांमधेच लिही. – मकरंद केतकर माझा मित्र
— चेतन राजगुरु
Leave a Reply