तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळी मी नागपूरला होतो. भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन हैदराबादला आयोजित करण्यात आलेलं होतं. यापूर्वी पुण्याला असताना या पक्षाचं मुंबईचं अधिवेशन पाहिलं, अनुभवलेलं होतं. त्या वेळी पक्ष सत्तेत नव्हता. हरियाणातल्या आघाडी सरकारचे अनुभव त्यांना त्या वेळी येत होते. या वेळी हैदराबादेतलं अधिवेशन सत्तेतल्या पक्षाचं होतं. निवडणुकीआधीचं, फील गुडचं. विचार केला या अधिवेशनाला जावं. मुंबईतल्या अधिवेशनातही वृत्तपत्र प्रतिनिधींची विशेष काळजी घेण्यात आलेली होती. इथंही त्यापेक्षा वेगळा अनुभव नव्हता. अर्थात, या वेळी पत्रकारांमध्येही इलेक्ट्राॅनिक्स मीडियाला विशेष स्थान मिळत होतं. प्रिन्ट मीडिया दुय्यम ठरला होता. ते काहीही असो, व्यवस्था उत्तम होती, शहर छान सजलं होतं. चंद्राबाबू हा एक आकर्षणाचा विषय होता. काही लोक मात्र हा विकास केवळ शहरात, खेड्यात काय आहे? असा सवाल हळू आवाजात करीत होती. हे सारं असलं तरी आंध्रातल्या बचत गटाबद्दल मी बरंच एकलं होतं. या भागात अन् विशेषतः ग्रामीण भागात बचत गटांनी महिलांच्या संघटन क्षमतांचा साक्षात्कार घडविला होता. वाटत होतं, एखादा दिवस काढावा अन् राज्यात थोडं आत जाऊन यावं. वीज, पाणीव्यवस्था पाहून यावी. दारूड्या नवर्यांना वठणीवर आणणार्या एखाद्या महिलेची भेट व्हावी; पण तसं नियोजन काही होईना. पत्रकारांनाही ग्रामीण भागातल्या दौर्यापेक्षा सायबराबादमध्ये अधिक रस असल्याचं दिसत होतं. अर्थात, तेही पाहण्यासारखं होतंच; पण ग्रामीण भागात जायचा माझा इरादा मला पूर्ण नाही करता आला.
दुपारची वेळ होती. आता ब्रीफिंग चारलाच होणार होतं. काही मुद्दे काढले होते. त्यावर शांतपणे लिहावं म्हणून हॉटेलवर आलो. रूममध्ये मी एकटाच. थोडं लिहावं म्हणून बसलो. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं तर एक मध्यमवयीन महिला उभी होती.
‘‘सर, रूम तयार करायचीय.’’ तिनं
हिदीत सांगितलं. मी म्हटलं, ‘‘मी काम
करतोय. मला अन् तुम्हाला त्रास होणार नसाल तर करा.’’
ती महिला आत आली. सरावलेल्या हातानं दरवाजा लोटला अन् सफाईदारपणे काम करू लागली. झाडणं, स्वच्छतागृहाची साफसुफ, नवीन टॉवेल ठेवणं अशी तिची कामं सुरू होती. माझ्या लेखनात माझं लक्ष नव्हतं.
मी सहज विचारलं, ‘‘किती वर्षं काम करता आहात?’’ तीन वर्षे उत्तर आलं. पगार काय मिळतो? माझा दुसरा प्रश्न. अडीच-तीन हजार पडतात- पुन्हा निर्विकार उत्तर अन् हातातलं काम सुरू. नवरा काय करतो? माझे प्रश्न थांबेनात. ‘‘इथंच, या हॉटेलमध्येच काम करतो.’’ मुलं-मुली किती? करतात काय? दोन मुली आहेत साहेब. संगळं ठीक चाललंय देवदयेनं. मी इथं अर्धवेळच काम करते… आता ती बोलू लागली होती… इतर वेळा माझ्यासारख्या इतर बायकांसाठी काम करत्येय मी. बचत गट माहितीय का? तिनं प्रश्न केला. मी ‘हो’ म्हटलं. आमचा मोठा ग्रुप आहे. माझा ८५० बायकांचा गट आहे. रोज दोन तास आम्ही एकत्र येतो आणि इतर वेळी गटागटानं दिलेलं काम करतो. पहिल्यांदा फक्त बचत गट असंच स्वरूप होतं; पण आता बचतीबरोबरच भरपूर कामं करायला लागलो आहोत आम्ही. गेल्याच महिन्यात चारशे महिलना प्रत्येकी दहा ते पन्नास हजारांची कर्जे मिळवून दिली. प्रत्येक महिला काही ना काही काम करत्येच आहे. उत्पन्न मिळविते आहे. पहिल्यांदा मी इथं हॉटेलमध्ये पूर्णवेळ काम करायची. सर्वांचा विश्वास आहे माझ्यावर म्हणून सगळं महत्त्वाचं काम माझ्याकडे होतं; पण बचत गटाचं काम वाढत गेलं तसं ओढाताण होऊ लागली. नवर्यालाही कामधंदा नव्हता. त्याची सोय झाली. इथं दोन्ही मुली शाळेत जातात. एक आता इंग्रजी शाळेत जातेय. एकदा वाटलं काम सोडावं; पण हॉटेलनं सांगितलं, काम नाही सोडायचं. मला पण वाटत होतं. ज्या कामानं दोन वेळाला जेवण दिलं ते काम सोडायचं नाही. आता इथं मी माझ्या सोईच्या वेळानं येते. काम करते अन् पुन्हा आपलं बायकांचं काम… ती बोलत असतांना तिचे हात चालू होते. रूमला छान आकार आला. थँक्यू म्हणत तिनं दरवाजा उघडला आणि बाहेर पडलीही!
पंधरा-वीस मिनिटांमध्येच तिनं रूम तर साफ केलीच होती; पण बचत गटाच्या कामाचा आवाका काय, त्याच्या क्षमता काय, एखाद्या किवा अनेक महिलांमध्ये त्यातून काय स्थित्यंतरं होतात, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढतो, या सार्याचा पटच माझ्यापुढं उभा केला होता. मी हैदराबाद सोडून कुठे जाऊ शकलेलो नव्हतो; पण कुठंही न जाताही तिनं मला माहितीपूर्ण केलं होतं. ‘फील गुड’च्या गप्पात मात्र असं उदाहरण, अशी माणसं किवा अशा कथा पुढं आलेल्या नव्हत्या. माझ्यापुढं कागद होते.
भाजपच्या राजकीय दक्षिण मंथनाची दिशा काय, अशा स्वरूपाचं काही लिहायचं म्हणून टिपण तयार होतं… ते लिहावं म्हणून मी
पेन उचलला. लिहू लागलो. तासभराच्या लेखनानंतर थांबलो तेव्हा लक्षात आलं मी भाजपवर काही लिहिलेलं नव्हतं, होती ती
हॉटेलमध्ये साफसफाई करणार्या त्या महिलेची कथा… यशाचा, बळाचा, विकासाचा, विश्वासाचा मार्ग दाखविणारी कथा!
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply