सकाळी सव्वासहाची बस उशीरा निघते. गंमत म्हणजे मी ऑन लाईन बुक करून निवडलेली ३९ क्रमांकाची सीट त्यात नसतेच (बस ३३ सीटर असते.) मग इथे -तिथे ऍडजस्ट करून मला बसविले जाते.
परतीची बस सव्वादोनची ! पण तिचा तीन वाजेपर्यंत पत्ताच नसतो. मग साडेतीनला एक बस लागते. यावेळी माझी आरक्षण केलेली सीट असते ३३ क्रमांकाची ! पण ऑन लाईनच्या चार्टप्रमाणे बसमधील सीट नसतात. पुन्हा मला ऍडजस्ट करून कुठेतरी बसविले जाते. पुढील दीड तासात, ठाणे ते पनवेल प्रवासात आठ ठिकाणी बस थांबवून प्रवासी घेतले जातात. विना वाहक असल्याने दरवेळी स्थानिक वाहक निवांत तिकीट विक्री करतो. मी बस च्या थांब्याबाबत ( वेबसाइट प्रमाणे नसल्याने ) निष्फळ तक्रार करतो. “अहो ही जादा बस आहे, तुमची टाईमची बस आली नाही म्हणून तुम्हाला इथे सीट दिली. ” असा वरचा आहेर ! मग फूडमॉलवरचा अधिकृत थांबा !
रावेतला बस येईपर्यंत सात वाजतात. मी घड्याळाकडे पाहणे सोडून देतो. रावेत ते स्वारगेट या अंतरात सुमारे वीस वेळा प्रवासी विनंतीवरून बस थांबविली जाते. इतकी customer -centricity पाहून मी गहिवरतो. एस टी किती सुधारली नाही असं स्वतःशी म्हणतो. वेळेवर बस पोहोचली नाही तरी चालेल, विनंती करणाऱ्या प्रत्येकासाठी मात्र ती थांबवायला हवी. साडे आठ वाजता एकदाचे स्वारगेट येते. घरी यायला पुढे आणखी एक तास ! वाटेत एका रिक्षावर स्वामी समर्थांचे वचन वाचून मी मुसमुसणे थांबवतो.
” या सर्वाला अंत आहे
म्हणून मी शांत आहे.”
हिंदीतल्या “सफर”ला इंग्रजीत “SUFFER “कां म्हणतात हे काल नव्याने कळलं !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply