माझ्या ७५०व्या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली. डॉ. आशा मंडपे यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘कोहिनूर ऑफ थाने’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्या स्वतः उत्तम व्हायोलिन वादक असल्याने त्यांना गाण्याची उत्तम जाण आहे. अशा व्यक्तीने पाठ थोपटल्यास विशेष आनंद होतो. या कार्यक्रमानंतर आठ दिवस विश्रांती घेतली आणि पुढील एका महिन्यात मुंबईत महालक्ष्मी, विलेपार्ले, ग्रँटरोड आणि भिवंडी येथे कार्यक्रम केले.
त्यानंतर शिरीष आणि धनश्री केळकर यांच्या करिअर केयरसाठी हिंदी गझलचा कार्यक्रम केला. याच सुमारास डॉ. महादेव भिडे हा माझा लंडनमध्ये स्थायिक झालेला मित्र मला येऊन भेटला. त्याने लंडनमध्ये एक गोल्फकोर्स विकत घेतला होता. त्याच्या उद्घाटनानिमित्त गाण्याच्या कार्यक्रमासाठी त्याने मला लंडनला आमंत्रित केले. आमच्या डॉ. विजय बेडेकरांनीही एक कार्यक्रम वायएमसीए लंडन येथे आयोजित केला आणि माझा इंग्लंडचा दौरा नक्की झाला. या कार्यक्रमांपूर्वी मी विद्या प्रसारक मंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी डॉ. आगरकर आणि डॉ. विजय बेडेकर यांच्यासह लंडनला रवाना झालो. आमच्याबरोबर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होत्या. ऑक्सफर्ड आणि केंब्रीज येथील अनेक कॉलेजेसना भेट देऊन आम्ही लंडनमध्ये पोहोचलो. लंडनमध्येही आम्ही अनेक म्युझियम्स आणि महाविद्यालये पाहिली. या दोन्ही डॉक्टरांनी आखलेला हा अभ्यास दौरा अतिशय छान झाला. पण माझ्या दृष्टीने या दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. लंडनमधील थंडीमुळे मला भरपूर सर्दी झाली आणि माझी दाढही दुखायला लागली. यापुढे माझ्या गाण्याच्या कार्यक्रमांना सुरवात होणार होती. जेव्हा आपली तब्येत ठीक नसते, तेव्हा एक गाणे सादर करणेही अवघड असते. मला तर संपूर्ण कार्यक्रम सादर करायचा होता. पण निरनिराळ्या देशात वातावरण वेगळे असते. त्यामुळेच परदेशात कार्यक्रम सादर करणे गायक कलाकारांना नेहमीच अडचणीचे ठरते. केवळ वातावरणच वेगळे नाही तर रसिक श्रोतेही निराळे असतात. त्यांची आवड निराळी असू शकते. ही आवड लक्षात घेऊनच कार्यक्रमातील गाणी ठरवावी लागतात. बऱ्याच वेळा ती बदलावीही लागतात. त्यात आवाज ठीक नसणे म्हणजे सगळ्यात अवघड काम! सुदैवाने माझ्याबरोबर डॉ. विजय बेडेकर होते. तेच आमचे फॅमिली डॉक्टर होते. लगेचच त्यांनी औषधे सुरू केली. १५ मे २००७ रोजी महात्मा गांधी हॉल, वायएमसीए, लंडन येथे इंग्लंडमधील पहिला कार्यक्रम मी सादर केला. या कार्यक्रमात माझ्याबरोबर रूचा आगाशे ही विद्यार्थिंनीही छान गायली. या कार्यक्रमाला लंडन महाराष्ट्र मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते. पुढील कार्यक्रम लीव्हर पूल, मँचेस्टर, इंग्लंड येथे होता. डॉ. मुकुल आचार्य या माझ्या मित्राने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुकुल हा उत्तम कीबोर्डवादक आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील बडोदा येथील माझ्या पहिल्या कार्यक्रमाला मुकुलने मला साथ केली होती. कित्येक वर्षांनी त्याच्या संगीतसाथीचा योग पुन्हा येत होता. यानंतरचा कार्यक्रम डॉ. महादेव भिडे याच्या गोल्फ कोर्स उद्घाटनानिमित्त नॉरथोल्ट, लंडन येथे २६ मे २००६ रोजी झाला. डॉ. विजय बेडेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. दुसऱ्याच दिवशी २७ मे २००७ रोजी डॉ. महादेव भिडे याने साऊथ केलसिंगटन, लंडन येथे एक कार्यक्रम आयोजित केला. असे चार कार्यक्रम करून माझा इंग्लंड दौरा संपवून ३ मे, २००७ रोजी मी मुंबईला परतलो.
पंचवीस दिवसांच्या या दौऱ्यात मी ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि मँचेस्टरला गेलो. माझे मामा डॉ. राम करंदीकर आणि डॉ. सुलभा करंदीकर यांच्या घरी बर्मिंगहॅमला गेलो. तसेच माझे मित्र डॉ. प्रकाश परांजपे आणि शुभदा परांजपे यांच्याकडे केंटला गेलो. लंडनमध्ये तर अगदी मनसोक्त हिंडलो. हा दौरा डॉ. विजय बेडेकर आणि डॉ. महादेव भिडे यांच्यामुळेच शक्य झाला. हे दोघेही जण अतिशय जवळचे असल्याने मी आभार मानलेले त्यांना आवडणार नाही हे मी जाणून आहे. त्यामुळे त्यांच्या ऋणात रहाणेच मी पसंत करतो. ७५०व्या कार्यक्रमानंतर अवघ्या दोन महिन्यात माझा इंग्लंड दौरा पूर्ण झाला. त्यामुळे माझा उत्साह वाढला आणि मी पुढील कार्यक्रमांच्या तयारीला लागलो.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply