नवीन लेखन...

सगळ्यांना पॅक करू!

हॉल म्हणविल्या जाणाऱया दहा बाय बाराच्या खोलीमध्ये मी संकोचून बसलो होतो. हो, घर माझेच होते; पण आलेले पाहुणे मला घरच्यासारखे वाटत नव्हते अन् ते मात्र स्वतचे घर असल्यासारखे विसावले होते. ही चहापाण्याच्या तयारीत गर्क होती. सोप्याच्या सिंगल सीटवर तो बसला होता. सावळा पण धडधाकट, आवाजात सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न तो करीत असला तरी त्यातली जरब जाणवण्यासारखी होती. एरवीही त्याला मी पाहिले होते; कधी चौकात.. तर कधी त्याच्या मोटरीत… त्याच्या गाडीतला स्पीकर इतका मोठा असे की सगळ्या चौकात आवाज जावा. हाताच्या चारही… म्हणजे आठही बोटांत अंगठ्या आणि गळ्यात मोठा गोफ. शर्टाचे एक बटन उघडे. अधूनमधून तो हातातल्या ब्रेसलेटशी चाळा करीत होता. माझा तो अंदाज घेत असावा, असे मला उगाचच वाटून जात होते. त्याच्याबरोबर दहा-बारा जणांचा ताफा होता. त्यांचेही सर्वसाधारण स्वरूप हे असेच… पण, अंगठ्यांची संख्या किंवा गोफाचा आकार लहान. बराच वेळ बहुधा शांततेत गेला असावा किंवा मला तसे वाटत असावे. अशा या प्रदीर्घ शांततेचा भंग करून तो म्हणाला, “भाऊ तुम्ही नाही म्हणू नका, वैनीला परवानगी द्या फक्त. बाकी सारं आपल्याकडं लागलं. वैनीला कायबी करायची गरज नाही. त्यांनी फक्त आम्ही म्हणू त्याला होय म्हणायचं बस्स.”

मी बसल्या जागेवरच्या कोपऱयातून ओरडल्यासारखा आवाज दिला… “अग ये.” बहुधा माझा आवाज नीटसा फुटला नसावा किंवा तो काहीतरी विचित्र झाला असावा. ती बाहेर आली, पण प्रश्नार्थक चेहरा घेऊन – `काय झालं?’ असे तिला विचारायचे होते. तेवढ्यात प्रयत्नपूर्वक विनम्र झालेल्या त्याने विचारले, “त्यात वैनीला काय विचारायचं. त्यांनी फक्त सही करायची.” आपण काही तरी मोठी चूक करतोय हे त्याच्याही लक्षात आले असावे. तसा तो म्हणाला, “तसं नाही. लोकशाही आहे अन् महिलांनाबी विचार असतोच की. बोला वैनी, या वेळी आपल्या वॉर्डातून तुम्ही उमेदवारी द्यायची.”

हिची प्रतिक्रिया मला नीट कळाली नाही. ती माझ्याकडे पाहात होती अन् आपल्याला कोणीतरी बहुमान देतोय, या भावनेने तिचा चेहरा फुलून गेला होता. मी काही बोलणार तेवढ्यात तो म्हणाला, “वैनी, आपला वॉर्ड राखीव झालाय. सुशिक्षितांचा वॉर्डय. म्हणलं तिथं तुमच्यासारख्या संभावित महिलेचीच निवड व्हायला हवी.” संभावित या शब्दाने मी हादरलोच होतो, पण त्याच्या एका त्यातल्या त्यात कमी उग्र किंवा अधिक सज्जन दिसणाऱया तरुणाने दुरुस्ती केली. तो म्हणाला, “सोज्वळ म्हणायचंय त्यांना.” हे होईतो त्याने फॉर्म कसा भरायचा, किती प्रती भरायच्या या तपशिलाची चर्चा सुरू केली. आपण अधिक कोपऱयात गेलो आहोत, असे मला वाटायला लागले. मी उठलो तसा तो म्हणाला, “वैनी, तुम्ही बसा. आता तुम्ही आमच्या लिडर. तुम्हाला तर भाषणंही देता येतात.” ही ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर आहे याची त्यांना माहिती असावी. एकूण काय सगळे ठरले असल्यासारखे वातावरण होते. मला आता बोलणे भाग होते. मी काहीतरी बोललेही; पण ते कोणाच्याच लक्षात नाही आले. मी उभा होतोच. घसा खाकरला.. छातीत श्वास भरून घेतला. अवसान आणले आणि म्हणालो, “हे बघा, तिची तयारी असेल तर माझी हरकत नाही.” लोकशाहीवर केवळ विश्वासच नव्हे, तर श्रद्धा आहे हे सिद्ध करण्यासाठी असे बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

“पण निवडणुका म्हटल्या की त्यात आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ, भ्रष्टाचार, जातीयता, फोडाफोडी, पैशाचं वाटप किंवा केवळ आश्वासनांची खैरात असं काही होणार असेल तर आम्ही बाजूलाच थांबू. लोकशाहीतलं कर्तव्य म्हणून मतदान मात्र करू. तेही आमच्या स्कूटरनं जाऊन..”

माझे हे निवेदन होईतो बहुधा मला धाप लागली. मी थांबलो, तेव्हा हिने हातात पाण्याचा ग्लास दिला. त्याची मला खरेच गरज होती. मी पाणी पित असतानाही त्या खोलीत दाटीवाटीने बसलेल्यांच्या नजरा माझ्यावर स्थिरावल्याचे मला जाणवत होते. काहींच्या चेहऱयावर माझ्याबद्दल कमालीची कणव तर काहींच्या चेहऱयावर `तरी आम्ही सांगतच होतो’ असा भाव मला वाचता येत होता. त्यालाही आता काय बोलावे हे कळत नव्हते. एवढ्यात संभावित आणि सोज्वळ या शब्दातला फरक जाणणारा तरुण पुढे आला. आता तो मला अधिक जवळचा वाटू लागला होता. तो म्हणाला, “लोकशाहीत निवडणुका हे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, असं बड्या नेत्यांना म्हटलेलं आहे.”

“कोणी?” एक चिरका, अस्पष्ट आवाज आला.

त्या दिशेनं पाहात तो म्हणाला, “सध्या तरी हे मीच म्हणतो आहे, असं समजा. त्यानं काही फरक पडत नाही, पण साहेब, वैनीसाहेब या लोकशिक्षणात सक्रिय सहभागी होऊन परिवर्तनाच्या गतीला वेग देणं हे आपल्यासारख्या सुशिक्षित वर्गाचं कर्तव्यच आहे. हा वॉर्ड महिला राखीव झाला. अन्यथा…” असे म्हणून तो थांबला. आपली चूक होतीय हे त्याच्याही लक्षात आले… “हा वॉर्ड राखीव झाला म्हणून आपल्यासारख्याचं नेतृत्व आम्हाला लाभत आहे.”

आता हा तरुण भाषण करणार असे वाटू लागले होते. तोपर्यंत चहाही झाला होता. माझी भीड आता चेपली होती. मी म्हणालो, “ते सगळं खरं आहे; पण आपली आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. निवडणूक आयोगाची तर पाळायलाच हवी.”

आता आणखी एक तरुण पुढे येऊन म्हणाला, “काका, तुम्ही त्याची काळजीच करू नका. आपली सगळी फिल्डिंग रेडी आहे. तुमच्या मार्गदर्शनानुसार पुन्हा प्लॅनिंग करू. शेवटी आपल्याला आपल्या विभागाचा विकास करायचाय. इथल्या माणसामाणसांचा, प्रत्येक बाईमाणसाचा विकास करायचा. हेच बघा काका, त्या पलीकडच्या वस्तीत बायकांना धड कपडा नाही. नळावरनं पाणी भरायचं तर हंडा नाही. त्यांचं हे दुःख आपलंच मानायला हवं का नको? त्याशिवाय त्यांना तरी आपल्याबद्दल विश्वास कसा वाटेल? दुसरा भाग सगळा सुशिक्षितांचा. तो तुम्ही बघा – बाकी गांधीबाबा आहेच.”

इथे गांधीबाबा कसे आले, हा प्रश्न माझ्या चेहऱयावर आला असावा. तसा तो म्हणाला, “गांधीबाबाची गांधीगिरी काही ठिकाणी प्रभावी ठरेल.” माझ्या चेहऱयावर समाधान पसरले. एका अर्थाने लोकशिक्षणाची संधी मिळणार होती. महिलांना त्यांच्या हक्काचा न्याय्य वाटा देण्यात माझा सक्रिय सहभाग राहणार होता अन् ही तर भाषणे काय करायची, याच्या तयारीला लागल्यासारखी वाटत होती.

झाले, आमच्या घरातली बैठक संपली आणि वैनीसाहेबांच्या उमेदवारीची बातमी सर्वत्र झाली.

आता घरात गर्दी असणार. आहे, नको पाहावे लागणार. मी तयारीला लागलो. संध्याकाळी अमिताभ बच्चनचा चित्रपट असूनही मी बाहेर पडलो. म्हटले तर तणाव होता. म्हटले तर आनंद. दुकानातून सामान घेतले अन् दोन झुरके मारायचे म्हणून थोडासा बाजूला थांबलो. माझ्यापासून थोड्याच अंतरावर दहा-बारा जणांचे टोळके गप्पा मारीत होते. विषय अर्थातच निवडणुका!

“तू इंदिरा वस्तीचं बघ. तिथं गांधीबाबाच चालेल, त्या साड्या संक्रांतीचं वाण म्हणून देता येतील अन् हे बघ बबन्या, त्या साल्या ƒƒƒचं तू बघ. सगळ्यांना पॅक करायला हवंय.”

“…अरे, पण त्या काकाचं काय?”

“…जाऊ दे रे, लोकशाहीत त्याचंही शिक्षण झालं तर काय बिघडतं?”

हाताला चटका बसला तेव्हा मला भान आलं. मी घराकडे वळलो. माझ्या लोकशाही शिक्षणाचा जांगळबुत्ता आता कोठे सुरू झाला होता.

—- `लोकमत’ मधून साभार पुनःप्रकाशित

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..