नवीन लेखन...

सहकारमहर्षी कल्लाप्पा आवाडे

सहकारमहर्षी कल्लाप्पा आवाडे यांचा जन्म ५ जुलै १९३१ रोजी इचलकरंजी येथे झाला.

गेले अनेक वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात असलेले कल्लाप्पाण्णा आवाडे हे वजनदार नाव. राज्यासह देशाच्या सहकारातील दिग्गज नेतृत्व म्हणजे इचलकरंजी येथील कलाप्पा आवाडे. गेली ६० हून अधिक वर्षे सहकारात अविरत ते काम करीत आहेत.

कल्लाप्पा बाबूराव आवाडे यांचा जन्म इचलकरंजी येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना बालपणापासून खेळाची आवड होती. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील हुतुतूचे खेळाडू म्हणून नाव मिळविले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सेवादलातून सार्वजनिक क्षेत्रात कार्यास सुरुवात केली. सार्वजनिक बेंदूर (पोळा) आणि विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाशी त्यांची जवळीक निर्माण होत गेली व त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होत गेला. दत्ताजीराव कदम, बाबासाहेब खंजिरे, अनंत भिडे, आबासाहेब कुलकर्णी या सहकार व राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी आवाडे यांच्यावर १९६२ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविली. संघटनकौशल्य आणि झोकून देऊन कार्य करण्याची हातोटी यामुळे त्यांनी या बँकेस नावारूपास आणले.

आवाडे यांच्या कारकीर्दीत या बँकेचा राज्यभरात ३३ शाखांमध्ये विस्तार झाला असून, या बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झाला. कोअर बँकिंग प्रणालीसह आधुनिक बँकिंग सेवा देणारी महाराष्ट्रातील ही आघाडीची बँक आज बहुराज्यीय झाली. आवाडे यांनीच ८०० कोटींवरील ठेवी, वार्षिक १३०० कोटींची उलाढाल आणि ४१००० सभासद असलेल्या बँकेच्या प्रगतीचा पाया घातल्यामुळे या बँकेचे ‘कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक’ असे कृतज्ञतापूर्वक नामकरण करण्यात आले.

आवाडे यांनी १९६२ सालापासून नगरसेवक ते नगराध्यक्षपदापर्यंत इचलकरंजी नगरपरिषदेत प्रतिनिधित्व करून लोकमानसाचा विश्वास प्राप्त केला. त्यांनी १९७४ मध्ये इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिलची स्थापना केली. या गिरणीच्या सुतास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. आवाडे यांना अमाप लोकप्रियता लाभली आणि लोक त्यांना आदराने ‘आवाडे दादा’ म्हणू लागले. पुढे १९८० मध्ये त्यांची विधानसभेवर निवड होऊन, त्यांनी राज्याच्या उद्योग राज्यमंत्रिपदाची आणि नगरविकास खात्याची धुरा सांभाळली. त्यांनी १९८६ मध्ये नवमहाराष्ट्र सहकारी सूत गिरणी हा बाय-बॅक पद्धतीने उभारलेला देशातील पहिला १०० टक्के निर्याताभिमुख प्रकल्प उभारला व तो नावीन्यपूर्ण ठरला. १९९६ मध्ये त्यांची लोकसभेवर निवड झाली. त्यांनी संसदेतही एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून ठसा उमटविला. काँग्रेस पक्षाने वेळोवेळी निरीक्षक म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडून त्यांनी संघटनेच्या कार्यातही हिरीरीने भाग घेतला.

आशिया खंडातील संपूर्णपणे महिलांनी चालवलेली ‘इंदिरा गांधी सहकारी सूत गिरणी’ स्थापन करून आवाडे यांनी महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन दिले. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत १९९९ मध्ये झालेल्या या गिरणीच्या उद्घाटन सोहळ्यास ५ लाखांचा जनसमुदाय जमला होता आणि त्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती हा त्यांच्या लोकप्रियतेचा कळस होता.

हुपरी येथे १९९४ मध्ये उभारलेला जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आवाडे यांच्या सहकारी चळवळीचा महत्त्वपूर्ण टप्पा होता. दैनंदिन ८५०० मे. टन क्षमता आणि पावणे दोन लाख युनिट्स इतकी वीज महावितरण कंपनीला देणारा हा कारखाना उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल लौकिकप्राप्त ठरला आहे. शेतकऱ्यांना सतत समाधानकारक ऊसदर देण्याबरोबरच उच्चांकी गाळप करून कारखान्याने उत्तम तांत्रिक व्यवस्थापनाबद्दल व ऊस विकास योजनांबद्दल अनेक पारितोषिके मिळविली आहेत. याशिवाय आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लहानमोठ्या संस्था व उपक्रम इचलकरंजी परिसरात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.

आवाडे यांनी सहकार व राजकीय क्षेत्रातील आपले गुरू दत्ताजीराव कदम यांच्या नावे सुरू केलेल्या ‘दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’ (डीकेटीई) या शैक्षणिक संस्थेने अभियांत्रिकी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवले आहे. या संस्थेच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी जगभरातील नामवंत कंपन्यांतून अधिकारपदावर काम करीत आहेत. भारत सरकारने टेक्निकल टेक्स्टाईलच्या संशोधन केंद्रासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून संस्थेची निवड केली असून, त्यासाठी २५ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. याशिवाय बालवाडीपासून व्यवस्थापन शाखेपर्यंतचे अद्वितीय शैक्षणिक कार्य इचलकरंजी परिसरात या संस्थेमार्फत सुरू आहे.

आवाडे यांनी आजन्म यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा पाठपुरावा केला. तसेच त्यांनी वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ आणि विखे-पाटील यांना अभिप्रेत असलेली सहकार संस्कृती निष्ठेने जपून संस्थात्मक कार्यातून परिसर विकास घडवून आणला.

एक अल्पशिक्षित माणूस सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात एवढे कार्य उभारू शकला ही फार महत्त्वपूर्ण बाब आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दिवसांत आवाडे यांची त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली होती. त्यांच्या सहवासात आवाडे यांना मिळालेला स्नेह व जिव्हाळा ही त्यांच्यासाठी मर्मबंधातली ठेव ठरली. आवाडे दादांची कार्यतत्परता, प्रामाणिकपणा आणि संस्थात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव यांची यशवंतराव चव्हाण यांना प्रचिती आली. त्यामुळेच त्यांनी वेणुताई चव्हाण ट्रस्टचे संस्थापक सदस्य म्हणून आवाडे यांच्यावर जबाबदारी सोपविली. पुढे आवाडे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या स्थापनेतही मोठे योगदान दिले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कराडमध्ये चव्हाण यांचे चिरंतन स्मारक उभारण्यात आले.

आवाडे यांच्या या विविधांगी कार्यकर्तृत्वामुळेच त्यांना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, बाहुबली विद्यापीठ, लठ्ठे शिक्षण संस्था, देशभूषण शिक्षण संस्था या संस्थांच्या संचालनाची संधी मिळाली. त्यांनी वसंतदादा साखर कारखाना, दि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर मिल्स इत्यादी संस्थांमध्ये संचालक मंडळावर प्रतिनिधित्व केले. त्यांनी दक्षिण भारत जैन सभा या शतकमहोत्सवी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल फाय फाउंडेशन या संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार लाभला. कल्लाप्पाण्णांच्या पत्नी इंदुमती ऊर्फ आऊ या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नावाने महिला सहकारी सूत गिरणीच्या अध्यक्ष होत्या. त्या अध्यक्षा म्हणून काम करताना कधी मालकिणीच्या रुपात दिसल्या नाहीत. राजकारण आणि समाजकारण करण्याचा वारसा घेतलेल्या कल्लपा आवडे यांच्या पत्नी शोभत होत्या. इंदुमती यांचे गेल्या वर्षी करोना मुळे निधन झाले.

कल्लाप्पा आवाडे यांचे चिरंजीव प्रकाश आवाडे हे आमदार आहेत. २०१९ मध्येविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला रामराम केला. तेव्हा ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. विधानसभेला ते अपक्ष म्हणून निवडून आले. पण राज्यात भाजपची सत्ता येणार म्हणून त्यांनी त्या पक्षाला पाठिंबा दिला होता. कल्लाप्पा आवाडे यांच्या सूनबाई नगराध्यक्षा, तर मोठा नातू जिल्हा परिषदेचा सदस्य राहीला आहे. कल्लाप्पा आवाडे यांच्या जीवनाचा वेध घेणारा ‘शंभर धागे सुखाचे’ हा ग्रंथ सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..