१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री व. पु. काळे यांनी लिहिलेला लेख
अनेक सकाळींपैकी एक सकाळ.
बेल वाजली. दार उघडलं आणि समोर जेव्हां ठाण्याच्या निशिगंध प्रकाशनच्या जोशीबुवांना पाह्यलं तेव्हां म्हटलं ही सकाळ वेगळी आहे.
आगतस्वागत, चहापाणी झाल्यावर मी विचारलं,
‘सुप्रभाती येणे कैसे ”
‘काल रात्रीच आलोय.’
‘सांगता काय? मग रात्रभर बेलचं बटण शोधत होता काय? ”
‘इथं आत्ताच आलो. काल रविन्द्र थिएटरमध्ये होतो.’
का? ”
‘निशिगंध प्रकाशनसंस्थेची नाट्यशाखा काढली आहे. त्या शाखेतर्फे नाटक बसवलंयू, त्याची काल रात्री रंगीत तालीम होती, म्हणून.’
जोशीबुवा you are great ! पुस्तकाचं करून पुरेसं नुकसान झालेलं दिसत नाही.”
‘नाही ना तेवढ्यासाठी तुमचंसुद्धा पुस्तक काढून मलं तरी हवं तेवढं नुकसान नाही.’
मी त्यांना टाळी देत म्हणालो,
‘माझे नाटक बसवायला घ्या. म्हणजे समजेल. नुकसानच नुकसान.’ जोशांकडे कम्पाऊंडासारखी उत्तरं तयार असतात. ते लगेच म्हणाले, एवढा गर्व बरा नाही.
इतर नाटककार आहेत. प्रथम नेहमी इतरांना अशी व्हायची संधी द्यावी. दुसऱ्यांचे अपयश आपण असं हिरावून घ्यायचं नसतं.’
‘पण मग माझं नाटक.’
‘तुमचं नाटक मी संपूर्ण दिवाळं जाहीर करण्यासाठी राखून ठेवलंय.’
This is Joshi !
ह्या माणसाचं सगळंत्र अचाट, ह्यांनी ‘निशिगंध’ मासिक सुरु केलं. वार्षिक वर्गणी ठेवली दोन रुपये, अंक अड्ढावीस पानांचा. आणि नवल म्हणजे जोशीबुवांनी साडेतीन हजारांच्या वर वर्गणीदार मिळवले. हे मासिक त्यांनी तीन वर्ष चालवलं. ते तेव्हा अभिमानानं सांगायचे, दोन रुपयांची मनिऑर्डर करण्यासाठी वर्गणीदार पोस्टात येतात हे खूप आहे. आम्ही त्यांना जातायेता म्हणत असू. जोशीसाहेब वर्गणीचा जरा विचार करा. ते म्हणायचे, जो प्रयोग मी करतोय तो खरं तर किर्लोस्कर कंपनीनं करायला हवा. किर्लोस्करांनी मासिकातल्या जाहिराती जर पाहिल्या तर त्यांनी वर्गणीदारांना अंक फुकट द्यायला हवा.
आजही काहीतरी अफाट कल्पना त्यांच्या मनात असणार. चार सजन निर्मात्यांप्रमाणे सरळ सरळ संस्था काढून नाटक सादर करून ते बुडणार नाहीत.
‘एक योजना सांगतो.’
‘जरूर.’
‘तुमचं सहकार्य-‘
‘आहे.’
‘मी तुमचं जे पुस्तक प्रकाशित केलं आहे ते जर एका दिवसात तुम्हाला रेल्वेनं प्रवास करणाराच्या हातात, एखाद्या बसस्टॉपवर, दुकानात, थोडक्यात म्हणजे जिथं तिथं प्रत्येकाच्या हातात दिसलेलं आवडेल का? की सातआठ वर्ष आवृत्ती हलके हलके संपलेली आवडेल? ‘
‘मीच काय, कोणत्याही लेखकाला चार दिवसांत स्वतःच्या पुस्तकाची आवृत्ती खपलेली आवडेल. पण ते कसं जमणार?
‘जोशी म्हणाले’
“तीच योजना घेऊन आलोय.’
‘चर्चगेट स्टेशनवर फुकट वाटल्या तरच…’
‘वाटणारच आहे, पण स्टेशनवर नाही.’
‘आमच्या नाटकाच दहा रुपयाचं तिकीट घेणाऱ्याला यांचं पुस्तक भेट म्हणून
‘ही सवलत.’
पाच रुपये ते दहा रुपये तिकिटांसाठी, सर्व प्रेक्षकां करता माझ्याकडच्या प्रत्येक लेखकाची पाचशे-पाचशे पुस्तक दोन-तीन नाट्यप्रयोगांत संपून जातील तर ह्या तुमचं पुस्तक टाकायची परवानगी-‘
‘दिली.’
‘थॅँक्स !’
पण जोशी, निशिगंधला फायदा…’
पुस्तकांचे गठ्ठे जिथं ठेवले आहेत ते गोडाऊनचं भाडे वाचेल.’
जोशी, चेष्टा करू नका.’
नाही आणि खरं सांगयचं तर तुम्ही माझी चिंता करू नका. तिकीटांचे दर पुस्तकांच्या किंमती हे गणित मी बरोबर बसवलंय.
‘आपण आता प्रेक्षक काय काय म्हणतील त्याचा विचार करू.’
“ओ. के !”
प्रेक्षक असं म्हणतील, नाटक भिकार होतं पण पुस्तक चांगलं आहे. पुस्तक बंडल आहे पण नाटकात वेळ चांगला गेला. किंवा दोन्ही भिकार आहेत किंवा दोन्हीत दम नाही. त्याच्या पलीकडे काही म्हणतील का? काहीही झाले तरी प्रेक्षकांचं नुकसान कशातच नाही
‘ मग मी विचारलं,
पण हे सगळं का करायचं? ”
मराठी माणसांसाठी.’
माझा चेहरा पाहून ते पुढे म्हणाले,
मराठी माणसाची वृत्ती अशी आहे की एक काही फुकट मिळत असेल तर दुसऱ्या गोष्टीसाठी तो पैसे करायला तयार होतो. ‘
‘तरीसुद्धा…’
‘थांबा, आणखी एक पॉईण्ट सांगतो. ह्या प्रकारचे उपद्व्याप प्रत्येक धंदेवाल्याला करावे लागतात. ह्यातून टाटाची पण सुटका नाही.’
‘कशी? ”
‘टाटा विकतो तो पाचशे एकचा साबण, तो वाईट आहे का?
‘मुळीच नाही.’
‘तीन बार एकदम घेणाऱ्याला टाटा कधी कधी छोटी प्लॅस्टिकची बादली देतो. किंवा एक बादली घेणाऱ्याला तो बार देत असेल. ती बादली वाईट असते का? ”
‘नाही ना ! दोन्ही चांगलं असतं.’
‘मग जे टाटाला चुकलं नाही ते जोशींना कसं चुकवता येणार? मग परवानगी ?”
‘ती तर प्रथमच दिली. आणि आमच्या परवानगीला तसा अर्थ नाही. तुम्ही आमची रॉयल्टी प्रथमच दिलीत. नफा-तोटा ह्याचा भार उचलणार तुम्ही. आम्ही टाळ्या वाजवणारे. तरीही वाटतं…’
‘तुम्ही काय म्हणणार आहात ह्याची कल्पना आहे. तरी एक सांगतो पुस्तकं अशीच घराघरातून घुसवावी लागतात. माणसं सुगंधासाठी खर्च करतात, पण…’
‘हे विधान बरोबर नाही. मुद्दाम अत्तर, परफ्यूम्स विकत घेणाऱ्याचं प्रमाण किती असेल? ’
जोशी पटकन् म्हणाले.
‘मुद्दाम अत्तराच्या बाटल्या विकत घेण्याची गरज नाही. साधा अंगाचा साबण घेताना तुम्ही वडी नाकाला लावून बघता. उदबत्ती घेताना तसंच करता. टाल्कम पावडर, दाढीचा साबण, आफ्टर शेव्ह लोशन म्हणजे ह्या ना त्या स्वरूपात तुमचं सुगंधाशी नातं जमतं. तसं साहित्य तुमच्या घरात सुगंधासारखं घुसायला हवं. त्या दिशेनं एक प्रयत्न.
‘ नंतर जोशी इतर योजना सांगत राह्यले.
ही घटना एकोणीसशे एकाहत्तर सालातली.
पण आजही चिंतामण जोशींचं, ‘साहित्य सुगंधा-सारखं घरात घुसलं पाहिजे’ ह्या वाक्याचा दरवळ माझ्या मनात रेंगाळतो आहे.
(‘रंगपंचमी’ मधून)
– व. पु. काळे
१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री व. पु. काळे यांनी लिहिलेला लेख
Leave a Reply