अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात डोकावले तर अनेक मजेशीर गोष्टी लक्षात येतात. या संमेलनाच्या आयोजनातून अनेक योगायोगही जन्माला येत असतात. अशाच काही योगायोगांचा आढावा.
पहिली पाच संमेलने ग्रंथकार संमेलने या नावाने भरली. या संमेलनांना स्वागताध्यक्ष नव्हता. १९०८ च्या पुणे संमेलनाला प्रथमच स्वागताध्यक्ष लाभले आणि ते होते वा.गो.आपटे.
न्यायमूर्ती म.गो.रानडे १८७८ मध्ये पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते वयाने लहान असलेलेही पहिलेच अध्यक्ष होते. विश्राम बेडेकर यांना मात्र वयाच्या ऐंशीव्या वर्षी संमेलनाचे अध्यक्षपद लाभले. हे संमेलन भरले १९८६ साली.
१९३६ पूर्वी तीन संमेलनाध्यक्ष हे संस्थानिक होते. मिरज, बडोदा आणि औंध येथील राजांना हा मान मिळाला. सयाजीराव गायकवाड हे कोल्हापूरच्या १९३२ च्या साहित्य संमेलनाला हजरही नव्हते. त्यांचे भाषण विनोदाचार्य चि.वि.जोशी यांना वाचून दाखवावे लागले.
१९३८ चे मुंबई संमेलन दोन बॅरिस्टरांनी गाजविले. या संमेलनाचे अध्यक्ष होते बॅरिस्टर वि.दा.सावरकर. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष बॅरिस्टर मुकुंदराव जयकर होते. लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या हे सावरकरांचे भाषण फार खळबळजनक ठरले. त्यांनी भाषाशुध्दी आणि लिपीशुध्दीची मीमांसाही केली.
मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात आजवर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चारच महिला अध्यक्ष झाल्या तर स्वागताध्यक्षपदाचा मान तीन महिलांना मिळाला. आनंदीबाई शिकरे या जळगावमधील १९३८ सालच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या. शशिकला काकोडकर या १९९४ च्या पणजी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या तर खासदार सुमित्रा महाजन या १९९४ च्या इंदोर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या.
दलित समाजातील शंकरराव खरात आणि केशव मेश्राम हे दोन लेखक आणि मुस्लिम समाजातील यू.म. पठाण यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविले आहे. .
स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष होण्याचा मानही अनेकांना मिळाला. वि.मो.महाजनी, चिंतामणराव वैद्य, न.चिं.केळकर, मामा वरेरकर, न.वि.गाडगीळ आणि वि.स.खांडेकर या सात जणांना हे दोन्ही मान मिळाले.
पती-पत्नींना अध्यक्षपद मिळण्याचा दुर्मिळ मान अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांना मिळालेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने इतिहास घडवला. पण या समितीची मुळे १९४६ च्या बेळगाव साहित्य संमेलनात होती. त्यात झालेल्या ठरावामुळे आणि कार्यवाहक समितीमुळे हे घडू शकले.
१९०७ ते १९६४ पर्यंतची साहित्य संमेलने पुण्याच्या साहित्य परिषदेने भरवलेली आहेत. त्यानंतर १९६५ च्या हैदराबाद संमेनलापासून पुढील संमेलने अखिल भारतीय साहित्य महामंडळाने भरवली.
महाबळेश्वरला झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने हे संमेलन अध्यक्षांविनाच पार पडले.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply