साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचा जन्म २४ ऑगस्ट १८७२ रोजी झाला.
ज्या काळात ‘धर्म सम्राट’, ‘कार्य सम्राट’ अशा उपाधी कुणाला सर्रास देण्याची पद्धत मराठी समाजात नव्हती, त्या काळात जनता ज्यांना आदराने ‘साहित्य सम्राट’ अशा शब्दांत गौरवत होती, ते म्हणजे नरसिंह चिंतामण केळकर. त्यांचे वडील मिरज संस्थानात कारकून, फौजदार,मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मिरजेच्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिख्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झाले. १८८७ साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले.
डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला. सरकारी कारकुनी नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते लोकमान्य टिळकांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७ सालापासून संपादक झाले.
१९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे तात्यासाहेबांच्या हातात आली. १९१८ मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली पुणे (मध्य) भागातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदे मंडळाचे सदस्य झाले. ते केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त सुद्धा होते.
केळकर १९२१ मध्ये बडोदे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे व १९०६ मधील नाशिकच्या दुसऱ्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तात्यासाहेबांचे जीवन बहुरंगी, बहुढंगी होते. ते कुशाग्र पंडित होते पण त्यामुळे त्यांचे बोलणे-वागणे-लिहिणे बोजड झाले नाही. त्यामुळेच ते ‘हास्य विनोद मिमांसा’ हा ललित संग्रह, ‘तोतयाचे बंड’, ‘वीर विडंबन’ अशी नाटके लिहू शकले. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्या आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत.
न.चिं.केळकर यांचे १४ ऑक्टोबर १९४७ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. न.चिं.केळकर यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply